ममता सरकारचा नागरिकांसाठी असाही उपक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 June 2019
  • दर सोमवारी भरणाऱ्या जनता दरबारात जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित राहणार असून, ते नागरिकांचे प्रश्‍न जाणून घेणार आहेत
  • या उपक्रमाची सुरुवात येत्या जुलैपासून होणार आहे​

कोलकता : पश्‍चिम बंगाल सरकारच्या वतीने नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आता प्रत्येक सोमवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे. यापूर्वीही नागरिकांच्या तक्रारी प्रशासकीय पातळीवर ऐकून घेतल्या जात असत; मात्र ममता बॅनर्जी सरकारने प्रथमच सोमवार हा दिवस निश्‍चित केला आहे. 

या उपक्रमाची सुरुवात येत्या जुलैपासून होणार आहे. राज्यात केंद्र आणि राज्याची योजना राबवताना दलाली घेणाऱ्या काही नेत्यांमुळे तृणमूल काँग्रेसला लोकसभेत पराभव पत्करावा लागल्याने ममता बॅनर्जी सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. 

दर सोमवारी भरणाऱ्या जनता दरबारात जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित राहणार असून, ते नागरिकांचे प्रश्‍न जाणून घेणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचत नसल्याच्या तक्रारीत वाढ झाली असून, तसेच काही राजकीय नेत्यांकडून दलाली घेतली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

विशेषत: तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून पंतप्रधान गृहकुल योजना आणि निर्मल मिशन योजना तसेच राज्य सरकारच्या योजनेचा लाभार्थ्यांना संपूर्ण लाभ दिला जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बैठक घेतली आणि त्यात हप्तेखोरी करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधींना तंबी देत कमिशनपोटी लाभार्थ्यांकडून घेतलेले पैसे परत देण्यास सांगितले होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News