'फुलां'ना समजून घेताना...

संदीप काळे
Sunday, 7 July 2019

स्त्री आणि पुरुष यांनी खांद्याला खांदा लावून काम करण्याची संस्कृती आता आपल्याकडं चांगलीच रुळलेली आहे; पण मुलांचं संगोपन योग्य पद्धतीनं झालं पाहिजे, ही संस्कृती मात्र पाहिजे तशी अद्याप रुळलेली नाही. जर "आनंदघर'सारख्या "घरां' संख्या आणखी वाढली तर पालकांकडून लहान मुलांवर होणारा अन्याय टाळता येईल.

स्त्री आणि पुरुष यांनी खांद्याला खांदा लावून काम करण्याची संस्कृती आता आपल्याकडं चांगलीच रुळलेली आहे; पण मुलांचं संगोपन योग्य पद्धतीनं झालं पाहिजे, ही संस्कृती मात्र पाहिजे तशी अद्याप रुळलेली नाही. जर "आनंदघर'सारख्या "घरां' संख्या आणखी वाढली तर पालकांकडून लहान मुलांवर होणारा अन्याय टाळता येईल.

शिल्पा खेर यांच्यावरचा या सदरातला लेख वाचून वाचून माझे बंधू, चित्रकार नयन बारहाते यांचा मला फोन आला. ते म्हणाले ः ""असंच काम पुण्यात ऍड. छाया गोलटगावकर या करत आहेत. ते काम जरा या कामापेक्षा वेगळं आहे. तुम्ही एकदा त्यांना भेटा. त्यांचं काम तुम्हाला खूप आवडेल. मी दोन वेळा त्यांच्या शिबिरात लहान मुलांसोबत सहभागी झालो होतो, वेगळा आनंद देणारा त्यांचा उपक्रम आहे.''

पुढच्या आठवड्यात मी कार्यालयीन कामानिमित्त पुण्याला जाणार होतोच. त्याच भेटीत दुपारी ऑफिसातलं काम आटोपलं आणि मी ऍड. छाया गोलटगावकर (मोबाईल क्रमांक : 94219 94405, मेल आयडी :Chhaya.golatgaonkar@gmail.com) यांच्या "आनंदघर'चा रस्ता धरला.

कोथरूड परिसरातल्या शिवतीर्थनगर भागात "आनंदघर' उभं आहे. टवटवीत फुलांसारखी गोंडस मुलं पाहून खूप आनंद झाला. मन प्रसन्न झालं. "मुलं म्हणजे देवाघरची फुलं', या उक्तीची प्रचीती आली. "आनंदघर' तसं छोटंसं; पण मला समजून घ्यायला खूप वेळ लागला. एक वेगळा आणि सध्याच्या जगाला खूप गरजेचा असा हा उपक्रम. छायाताई पुण्यात वकिली करतात. त्यांनी अनुभवांतून आणि छंदातून हे "आनंदघर' उभारलं आहे. आता त्यांनी याच सर्व मुलांभोवती आपली सामाजिक "प्रॅक्‍टिस' आनंदानं सुरू ठेवली आहे. छायाताई हे काम कसं चालवतात हे समजून घेण्यासाठी आलेली अनेक जिल्ह्यांतली माणसं मी तिथं असताना मला दिसली.

"आम्हीही आमच्या शहरात असं काम उभं करू. त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करा,' असं आलेले सगळेजण छायाताईंना म्हणत होते.

"आनंदघर'च्या कामाचे सर्व अल्बम पाहताना माझं लक्ष तेव्हाच्या छाया यांच्याकडं जात होतं. सध्याच्या छायाताई काही वेगळ्या होत्या. कुठलाही संकोच मनामध्ये न ठेवता मी छायाताईंना थेट विचारलं ः ""तुमचे केस...? काय झालं नेमकं...?''
छायाताई हसल्या आणि म्हणाल्या ः ""अहो, तुम्ही समजता तसं काहीही नाही. मला कुठलाही आजार नाही. कॅन्सरशी संबंधित काम करणाऱ्या एका संस्थेला मी माझे लांबसडक केस दिले आहेत आणि त्या संस्थेनं ते एका गरजू महिलेला दिले.'' छायाताई वेगळा विचार करणाऱ्या आहेत हे जाणवलं.

गेल्या 10-11 वर्षांपासून त्या कायदा, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र यांचा अभ्यास करत आहेत. शिक्षणव्यवस्था व बालसंगोपनातली हेळसांड, अस्वस्थता पाहून आपणही बालसंगोपनासंदर्भात व शिक्षणासंदर्भात काम करावं असं त्यांना वाटू लागलं. कायदा व शिक्षण यांच्या एकत्रित, व्यापक अभ्यासाचा एक भाग यातून "आनंदघर बालसंगोपन केंद्र ः लर्निंग अँड रिसर्च सेंटर'ची सुरवात नोव्हेंबर 2015 मध्ये झाली. "आनंदघर' हे काही केवळ "पाळणाघर' या गोंडस संबोधनापुरतंच सीमित नाही, तर इथं "आनंदघर'ला "बालसंगोपनकेंद्र' असं म्हटलं जातं. कारण, ही एक व्यापक संकल्पना आहे. मुलांची निगा राखण्याबरोबरच त्यांची शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, बौद्धिक वाढ व विकास या टप्प्यांबाबत इथं अभ्यास केला जातो. त्यावर काम केलं जातं. कुटुंबासाठीची, समाजासाठीची एक सशक्त अशी "सपोर्टिंग सिस्टिम', भावनिक स्थिरता, गुणवत्तापूर्ण बालसंगोपन व शिक्षणासाठी प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं विचार करून "आनंदघर'ची जागा निश्‍चित करण्यात आलेली दिसली. "आनंदघर'ला अंगण असणं, बाग असणं, मुलांना माती-वाळू-पाणी यांच्याशी मनसोक्त खेळता येणं, आजूबाजूच्या परिसराशी त्यांना नातं ठेवता येणं, ती जागा स्वच्छ, सुंदर व सुरक्षित असणं अशा अनेक बाबींचा विचार "आनंदघर'ची निर्मिती करण्यापूर्वी करण्यात आलेला दिसला. इथं मुक्त खेळाला विशेष महत्त्व आहे. मुलांची सृजनशीलता, त्यांची क्रिएटिव्हिटी मुक्त खेळात फुलते.

त्यानुसार वर्षभराच्या विविध उपक्रमांचं नियोजन इथं केलं जातं. सण-उत्सव हे आजच्या संदर्भात साजरे केले जातात. ते साजरे करताना निसर्गाशी असलेली जवळीक यासंदर्भात मुलांशी बोलणं होतं. "आनंदघर'मध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक-शिक्षिकांना सातत्यपूर्ण प्रशिक्षण दिलं जातं. मूल समजून कसं घ्यायचं, मूल हाताळायचं कसं हा एक अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे त्यासंबंधीच्या प्रशिक्षणावर भर दिला जातो.

मुलांच्या कुटुंबीयांशी जोपर्यंत संवाद साधला जात नाही तोपर्यंत मुलांच्या संदर्भात करावयाच्या कामाला परिपूर्णता येऊ शकत नाही. या हेतूनं "आनंदघर'मधलं काम चालतं. महिला आज मोठ्या संख्येनं कामानिमित्त घराबाहेर पडत असतात. त्यांची तारेवरची कसरत सुरू असते. एकीकडं कुटुंब व मूल, तर दुसरीकडं स्वतःचा विकास यात ताळमेळ घालण्यासाठी व महिलांना अपराधीपणाची भावना न येऊ देता स्व-विकासाची संधी घेण्यासाठी एक भक्कम "सपोर्टिंग सिस्टिम' म्हणून "आनंदघर' काम करतं. खरं तर अशी "आनंदघरं' मोठ्या शहरांच्या सर्व वस्त्यांमध्ये असणं गरजेचं आहे.

छायाताई म्हणाल्या ः ""अनेक ठिकाणी पालक, विशेषतः मुलांची आई नोकरी सोडण्याच्या विचारात होती. मात्र, "आम्ही तुमच्या सोबत आहोत,' असा विश्वास ज्या वेळी आम्ही त्यांना दिला त्या वेळी त्यांना नोकरीच्या कठीण काळात तग धरण्याचं बळ मिळालं. "आनंदघर'मध्ये आम्ही मुलांचं पर्यायी पालकत्व स्वीकारलं आहे. मूल काही एकट्या स्त्रीचं नसतं; तर ते त्या सगळ्या कुटुंबाचं व समाजाचं असतं, म्हणूनच सामाजिक पालकत्व गरजेचं आहे. मूल समाजाचं आहे असं म्हटलं की ती जबाबदारीदेखील समाजाची आहे. "आनंदघर'मध्ये मुलांच्या भावनिक स्थिरतेवर मुख्यत्वे काम केलं जातं. पालकांशी बोलून, मुलांचं निरीक्षण करून नोंदी घेतल्या जातात व हळूहळू पालकांच्या मदतीनं त्यावर काम केलं जातं. तीन वर्षांचं एक मूल झोपेत शू करायचं. त्या मुलाला असुरक्षित वाटतंय, असं लक्षात आलं. यावर उपाय काय, तर मग मुलाला सुरक्षित वाटावं म्हणून काही गोष्टी आम्ही करू लागलो. मुलाला जवळ घेऊन थोपटणं, त्याला काय हवं आहे ते प्राधान्यानं करणं, मुलाला झोपवतानाही त्याच्याजवळ बसणं, त्याला थोपटवून झोपवणं, गाणी-गोष्टी सांगणं असे विविध उपाय आम्ही केले. नक्की कुठल्या पद्धतीनं ते सांगता येणार नाही; परंतु काही काळानं मुलाला विश्वास वाटू लागला, सुरक्षित वाटू लागलं आणि काही काळानंतर त्याला झोपेत शू होणं बंद झालं. हे एक उदाहरण झालं. अशी कितीतरी उदाहरणं आहेत.''

छायाताईंनी या अनुभवासह इतरही काही आजवरचे अनुभव मला सांगितले. समाजातला एकंदर बदल बघता गुणवत्तापूर्ण बालसंगोपन व शिक्षण ही काळाची गरज आहे. विभक्त कुटुंबांचं प्रमाण विविध कारणांमुळे वाढत आहे. अशा वातावरणात मुलांच्या निकोप वाढीसाठी उत्तम दर्जाची बालसंगोपन केंद्रं आज हवी आहेत. समाजाची ही गरज "आनंदघर' भागवत आहे.

"एक मूल वाढवायला सारं गाव लागतं,' अशी एक आफ्रिकी म्हणी आहे. ती खरीही आहे. मुलांवरचे ताण, त्यांची निराशा, त्यांचं एकटेपण, अतिरिक्त स्क्रीन टाईम, सोशल मीडिया हे सर्व टाळण्यासाठी उत्तम दर्जाची बालसंगोपन केंद्रं भरपूर प्रमाणात हवी आहेत. यापुढच्या काळात त्यांची गरज जास्त भासणार आहे.

मी गेलो असताना "आनंदघर'मध्ये शिबिर सुरू होतं. त्यात सहा ते 14 या वयोगटातली मुलं सहभागी होती. या शिबिरात मुलांना विविध गोष्टींचं "एक्‍स्पोजर' मिळत होतं. गेल्या तीन वर्षांत एकूण दीड हजारपेक्षा जास्त मुलांना, भविष्यात उत्तम माणूस म्हणून उभं राहण्यासाठीचं बळ "आनंदघर'नं दिलं आहे.

"आनंदघर'चं काम बघून "आनंदवन'मध्येदेखील बालसंगोपनाचं असंच काम व्हावं यासाठी छायाताईंना बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांनी "आनंदवन'हून आमंत्रित केलं होतं. छायाताईंनी त्यांना मदत केली. अनेक देशांत जाऊन छायाताईंनी तिथल्या मुलांच्या संगोपनाविषयीचा, बालशास्त्राचा अभ्यास केला आहे. "आनंदघर'च्या उभारणीसाठी त्यांना या सगळ्याचा खूप उपयोग झाला.

भारतात लहान मुलांच्या शिक्षणाविषयी खूप मोठं काम झालं आहे; परंतु त्याचं सार्वत्रिकीकरण झालेलं नाही. जेव्हा मी "आनंदघर'मधलं काम पाहत होतो, तेव्हा लक्षात आलं की "आनंदघर'चं काम सोपं नाही. ही एक संघर्षाची वाट आहे. हे काम करताना बऱ्याच संघर्षांना सामोरं जावं लागतं. आर्थिक ताळमेळ बसवणं खूप कसरतीचं असतं.

प्रशिक्षित मनुष्यबळ मिळणं आणि ते टिकणं हेही आव्हानात्मकच असतं. हे आव्हान इथंही आहेच. अचानक काही समस्या निर्माण होतात. त्या सोडवताना मुख्य कामाकडं काही वेळा दुर्लक्ष होतं. समाजात एकीकडं गुणवत्तापूर्ण बालसंगोपन केंद्रे उभारण्याची गरज असतानाच दुसरीकडं ज्या समस्या आणि अडचणी उद्भवतात त्यांच्यासाठी समाजातल्या काही लोकांनी पुढाकार घेऊन ही केंद्रे समर्थपणे चालतील याची काळजी घ्यायला हवी. नुसतंच भाबडेपणाने "गोड गोड, आनंददायी बालपण', असंही म्हणायला नको. संपूर्ण व्यवस्थेमागचं राजकारण, अर्थकारण, समाजकारण समजून घेऊन बालहक्कांसाठी जागरूक राहायला हवं. ही जागरूकता "आनंदघर'मध्ये पाहायला मिळाली.

भारतीय राज्यघटनेत बालकांसाठी अनेक कायदे व धोरणं आहेत, त्यांच्या अंमलबजावणीसाठी कृतीतून कार्यरत राहायला हवं. बालकांच्या हिताचं रक्षण मोठ्यांच्या हाती आहे, याचं भान व जबाबदारी सर्वांनी बाळगायला हवी.

"आनंदघर'ची पुढची वाटचाल ही गुणवत्तापूर्ण बालसंगोपनासाठीची व शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण व्हायला हवं यासाठी आहे. ही बालहक्काची व्यापक चळवळ आहे. शिक्षक-पालक व मुलांसोबत काम करणाऱ्या सर्वांसाठी उत्तम दर्जाचं संशोधन, प्रशिक्षणकेंद्र स्थापन करणं, पालक-शिक्षक संवादगट सुरू करणं, या कामात अभ्यासपूर्ण सहभागासाठी ज्यांना ज्या प्रकारे शक्‍य आहे - म्हणजे आर्थिक, स्वतः काम करणं, पूर्णवेळ, अर्धवेळ - त्या त्या प्रकारे त्यांनी सहभागी होणं गरजेचं आहे.

"आनंदघर'ला भेट दिल्यानंतर मी नयन बारहाते यांना फोन करून त्यांचे आभार मानले. आपल्या राज्यातला एक यशस्वी प्रयोग मला त्यांच्यामुळे पाहता आला. "मीसुद्धा माझ्या मुलाला समजून न घेणारा पालक आहे,' याची जाणीव मला छायाताईंचा हा उपक्राम पाहिल्यावर झाली. मुलं कमी पडत नाहीत; आपण कमी पडतो त्यांना समजून घ्यायला. आपण त्यांना मारतो, त्यांच्यावर चिडचिड करतो. इथं त्यांचा दोष नसतो, तर त्यांना समजून घेण्याच्या आपल्या कक्षांच्या मर्यादा इथं स्पष्ट होतात. आपण कमी पडतो. किती तरी प्रश्नांची उत्तरं मला इथं मिळाली. "आनंदघर'मधून बाहेर पडताना एका गोंडस मुलाला मी उचलून घेतलं होतं. त्याला खाली ठेवताना तो माझा अंगठा सोडायला तयार नव्हता. या चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावं, असा कदाचित त्याचा आग्रह असावा!
घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूँ कर लें
किसी रोते हुए बच्चे को हॅंसाया जाए ।

निदा फाजली यांच्या या ओळी "आनंदघर'संदर्भात समर्पक वाटतात. स्त्री आणि पुरुष यांनी खांद्याला खांदा लावून काम करण्याची संस्कृती आता आपल्याकडं चांगलीच रुळली आहे; पण मुलांचं संगोपन योग्य पद्धतीनं झालं पाहिजे, ही संस्कृती मात्र पाहिजे तशी अद्याप रुळलेली नाही. जर "आनंदघर'सारखी "घरं' अजून वाढली तर पालकांकडून लहान मुलांवर होणारा अन्याय टाळता येईल. ही एक चळवळ आहे. या चळवळीला गरज आहे तुम्हा-आम्हा सर्वांच्या मदतीची, आर्थिक आणि सामाजिकसुद्धा...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News