उमेश यादव! भन्नाट असला तरी 'वर्ल्ड कप'मध्ये खेळणार?

yinbuzz
Thursday, 24 January 2019

नागपूर : प्रचंड गुणवान असूनही उमेश यादव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजूनही स्वत:चं संघातील स्थान भक्कम करू शकलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत स्थान न मिळाल्यानंतर उमेश देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला आणि रणजी स्पर्धेत स्वत:ची उपयुक्तता पुन्हा सिद्ध करून दाखविली.

नागपूर : प्रचंड गुणवान असूनही उमेश यादव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजूनही स्वत:चं संघातील स्थान भक्कम करू शकलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत स्थान न मिळाल्यानंतर उमेश देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला आणि रणजी स्पर्धेत स्वत:ची उपयुक्तता पुन्हा सिद्ध करून दाखविली.

रणजी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात विदर्भाने उत्तराखंडवर एक डाव आणि 115 धावांनी दणदणीत विजय मिळवित उपांत्य फेरी गाठली. या विजयात उमेशच्या भेदक गोलंदाजीचाही मोठा वाटा होता. त्याने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पाच गडी बाद केले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उमेशने आतापर्यंत 79 सामन्यांमध्ये 250 विकेट्‌स घेतल्या आहेत.

2008-09 मध्ये उमेशने रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केले. सातत्याने 140 किमीप्रति तास वेगाने मारा करण्याची क्षमता,दोन्ही बाजूंना चेंडू स्विंग करण्याची हातोटी आणि अचूक उसळते चेंडू टाकण्याची कला असे उमेशचे 'प्लस पॉईंट्‌स' आहेत. याच जोरावर त्याने पहिल्या रणजी स्पर्धेत चार सामन्यांत 20 गडी बाद करून क्षमतेची चुणूक दाखविली होती. त्यानंतर 'आयपीएल'आणि तिथून आंतरराष्ट्रीय क्रिकेट असा प्रवास त्याने केला. 2014 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेशला संघात स्थान मिळाले आणि पुढे 2015 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेमध्ये तो भारताचा प्रमुख गोलंदाज होता.

जसप्रित बुमराचा उदय, ईशांत शर्माला नव्याने गवसलेला सूर, फलंदाजांना जखडून ठेवणारा महंमद शमी आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणारा भुवनेश्‍वर कुमार यांच्या तुलनेत उमेशचे सातत्य आणि नावीन्य कमी पडल्याने त्याला बहुतांश वेळ संघाबाहेर बसावे लागले. आगामी विश्‍वकरंडक स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार आहे. तेथील वातावरण उमेशसारख्या वेगवान गोलंदाजाला पोषक आहे. त्यामुळे त्या संघात स्थान मिळविण्यासाठी उमेशला देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुन्हा सिद्ध करून दाखवावे लागणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News