छत्री!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 June 2019

नको मला नवी छत्री
चटकदार चायना माल
तीन घड्या, नाजूक मूठ
नाजूक बटण, गोरे गाल

कालपरवाच लक्षात आले की
आपली छत्री हरवली आहे...

दोन दिवस शोधून शोधून
थकलो, ओलाचिंब झालो
कोण जाणे कुठे गेली
कुठे केले तोंड काळे
बेकारीच्या उन्हाळ्यात
कोणी चोरली, कुणा कळे

गरज सरो, वैद्य मरो,
माझी छत्री मला मिळो
ज्याने नेली, त्याला पुन्हा
परत करण्याची बुद्धी मिळो

नको मला नवी छत्री
चटकदार चायना माल
तीन घड्या, नाजूक मूठ
नाजूक बटण, गोरे गाल

असल्या पावसात उसनी छत्री
कोण आपल्याला देतं हल्ली?
नाकासमोर जगता जगता
आपण बरे, छत्री आपली!

चार पावसाळे पाहिलेली
छत्री असते अनुभवी
जुनाट म्हणून हिणवू नका
अश्‍शीच छत्री आम्हाला हवी!

आमची छत्री जुनी तरी  
नाकीडोळी नीटस होती
पसरेल होती ऐसपैस
तीन घड्यांची नखरेल नव्हती.

नव्हती तिच्यावर नक्षी काही,
चटकदार काही 
लिहिलेले नव्हते
आतल्या बाजूला 
दिसेल-न दिसेल
असे आमचेच इनिशियल होते

वारा पाहून उलटेल अशी
नव्हती बिचारी अप्पलपोटी
चिमट्यात बोट अडकून कधी 
शिव्या खायची सुटून खिट्टी!

आजकाल दिसतात तसे
नव्हते तिचे रंग गहिरे
ढगांची माळ, कार्टून, चित्र,
किंवा एखादी कविता वगैरे

दांड्यासमोर सरळ चाले
झड पाहून होई तिरकी
भरवश्‍याच्या छत्रीची मग
वाराच घेई कधी फिरकी

रंग नाही, रूप नाही, 
नव्हती तिला कुठली झालर
कसनुसं हसून म्हणायची
‘‘आम्ही कुठले छत्रचामर?’’

उघड्यावरती चालताना 
अडवत होती पाऊसधार
ओलीचिंब होऊनही 
तिला न झाले पडसे फार

काडीच्या आधाराने 
क्‍वचित कधी
गळे पाणी, भिजे कॉलर
पाठीच्या पन्हळीत गार ओला
ओहळ जाई वाहात थिल्लर

पाऊसपाणी संपले तेव्हा
धरणं भरली टाकोटाक
गरज सरली, छत्री मेली
गेली माळ्यावर मग मुकाट

कढत उकाड्याचे उष्ण उसासे 
सोडत सोडत जगत राहिलो
चार पावसाळे पाहिलेली छत्री
जाणूनबुजून विसरत राहिलो

पहिल्या पावसानं
 रस्त्यात गाठलं
तेव्हा कुठे पटली खात्री
तेव्हापासून शोधतोय अशी
माझी छत्री...मेरी छत्री!

तुम्ही म्हणाल, असे कसे 
हो विपरीत झाले?
छत्री म्हंजे काँग्रेस का?
 आणि तुम्ही काँग्रेसवाले?

    
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News