शेतकऱ्यांना नडणाऱ्यांना धडा शिकवणार; उद्धव ठाकरेंचा विमा कंपन्यांना इशारा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019
  • उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा बीकेसी मैदानावर येऊन पोहचला, त्यावेळी ते बोलत होते.
  • त्यांच्याबरोबर सेनेचे सर्व पदाधिकारी, मंत्री कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमाप्रश्नी शिवसेनेच्या वतीने मुंबईत मोर्चा काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांवर वाढलेले कर्ज आणि विमा कंपन्यांकडून केली जाणारी फसवणूक यासाठी शिवसेनेच्या वतीने मुंबईत मोठ्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर उतरले. 

शेतकर्‍यांना नडणार्‍यांना धडा शिकवल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. सरकारच्या योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत. सगळ्या कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांची नावे बँकांनी लावली पाहिजेच, अशी मागणी त्यांनी केली. काही ठिकाणी कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले गेले, मात्र कर्जमाफी झालीच नाही. हे सगळे प्रकार टाळण्यासाठी ही मागणी आम्ही केली आहे, असे ते म्हणाले. 

 

पंतप्रधानांनी पीक विमा योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे. ही रक्कम विमा कंपन्या किंवा बँकांच्या बोडक्यावर घालण्यासाठी आणलेली नाही, त्यामुळे मी हात जोडून विनंती करतो की शेतकऱ्यांची फसवणूक करु नका. १५ दिवसांत शेतकऱ्यांची लटकलेली विमा प्रकरणे निकाली काढली नाही तर १६ व्या दिवशी मोर्चा बोलायला लागेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्यांना दिला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा बीकेसी मैदानावर येऊन पोहचला, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्याबरोबर सेनेचे सर्व पदाधिकारी, मंत्री कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. तत्पूर्वी, हा मोर्चा शेतकऱ्यांचा नसून शेतकऱ्यांसाठी आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्यांना धमकी वजा इशारा दिला होता. 

शिवसेना कायम शेतकर्‍यांसोबत आहे, असेही सांगत उद्धव ठाकरे यांनी जी काही प्रकरणे आहे, ती १५ दिवसांत निकाली काढा असे सांगितले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News