उदयनराजेंच पक्षांतर 'तळ्यात-मळ्यात' !

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 10 September 2019
  • खासदार उदयनराजेंची ‘तारीख पे तारीख!’
  • भाजप प्रवेश पुन्हा लांबणीवर;
  • आज निर्णय शक्य
  • दोन दिवसांत भाजप निर्णय घेणार

सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेंचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश वारंवार लांबणीवर पडत आहे. पुण्यात आज होणारी बैठक रद्द करून उदयनराजे मुंबईला रवाना झाले. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश लांबण्याची चर्चा आहे.

काही कार्यकर्त्यांनी भाजपत जाण्यास विरोध केल्याने उदयनराजेंनी थांबण्याची भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपने आणखी दोन दिवस थांबण्याची भूमिका घेतल्याचे पक्षातील संपर्क सूत्रांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाविषयी उद्या  निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

उदयनराजेंनी भाजपमध्ये जाऊ नये, यासाठी अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांची मनधरणी केली होती. मात्र, त्याला फारसे यश आलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर उदयनराजेंनी आज पुण्यात काही कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. मात्र, ही बैठक अचानक रद्द करण्यात आली. उदयनराजेंची तब्येत बरी नसल्याचे सांगण्यात आले.

खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपच्या तिकिटावर पुन्हा पोटनिवडणुकीला सामोरे जाण्यात काही कार्यकर्त्यांना धोका वाटत आहे.

दोन दिवसांत भाजप निर्णय घेणार
उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले व रामराजे नाईक-निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्या काळात रामराजे व उदयनराजे, तसेच शिवेंद्रसिंहराजे व उदयनराजे यांच्यात मतभेद होते.

हे सर्व जण भाजपत आल्यानंतर तिथेही त्यांच्यात मतभेद होणार नाहीत, याची खात्री कोण देणार, असा विचार करणारा एक गट भाजपत आहे. त्यामुळे उदयनराजेंच्या प्रवेशाचे काय होणार याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्‍यता असल्याचे भाजपतील सूत्रांकडून सांगण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News