दुबळ्या युपीकडून यू मुम्बा पराभूत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 1 August 2019
  • यूपी योद्धाकडून स्वीकारावी लागली २३-२७ अशी हार
  • बचावात वारंवार केलेल्या चुका मुळावर

मुंबई : सर्वोत्तम बचावपटू असले तरी ताळमेळ अजून जमलेला नाही, असे मुंबईच्या प्रशिक्षकांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. एक दिवसाच्या विश्रांतीनंतरही त्यात फरक पडला नाही, यू मुम्बाला प्रो कबड्डीतील आजच्या सामन्यात यूपी योद्धाकडून २३-२७ अशी हार स्वीकारावी लागली.

यूपीचा संघ कमजोर समजला जात आहे; पण त्यांच्यविरुद्धही मुंबई जिंकू शकले नाहीत. बचावात केलेल्या चुकांमुळे मध्यांतराला स्वीकारलेली १२-१४ अशी दोन गुणांची पिछाडी शेवटपर्यंत कायम राहिली. अंतिम क्षणी २३-२५ अशा पिछाडीनंतरही त्याच चुका पुन्हा केल्या. या सामन्यात महत्त्वाच्या वेळी सुरिंदरने केलेल्या चुकाही मुंबईस भोवल्या. 

प्रो कबड्डीच्या इतिहासात सर्वाधिक रक्कम मिळालेल्या मोनू गोयतची पकड करून मुंबई संघाने यशस्वी सुरुवात केली. त्यानंतर २-० अशी आघाडीही घेतली. सामना चुरशीने पुढे जात असला तरी मुंबईकडे तीन-तीनच खेळाडू शिल्लक असायचे; पण या तिघांत दोनदा सुपर टॅकल करण्याचा पराक्रम केला. अखेर मध्यंतराला खेळ थांबला तेव्हा लोण स्वीकारण्याची वेळ मुंबईवर आली.

जयपूरचा सलग तिसरा विजय
फॉर्मात असलेल्या जयपूर पिंक पॅंथरने आत्मविश्वास हरपलेल्या हरियाना स्टिलर्सला ३७-२१ असे हरवले. चढाया-पकडींचा लयबद्ध खेळ करत जयपूरने राकेश कुमार मार्गदर्शन करत असलेल्या हरियानाला प्रतिकाराची संधी दिली नाही. जयपूरचा कर्णधार दीपक हुडाने चढायांत १४ गुण मिळवले. सुरुवातीला १०-८ अशी चुरस झाली होती; मात्र त्यानंतर जयपूरने मागे वळून पाहिले नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News