"जजमेंट" चित्रपटाचे 'हे' आहे खरे सत्य

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 May 2019

माधव अभ्यंकर, शलाका आपटे, सतीश सलागरे, महेंद्र तेरेदेसाई, विजय भानू आदी कलाकारांनी आपापली कामगिरी चोख पार पाडली आहे. चित्रपटात कोर्ट ड्रामा चांगल्या पद्धतीने मांडण्यात आला आहे.

आज आपण कितीही आधुनिकतेच्या गप्पा मारत असलो आणि मुलींनी कितीही प्रगती केली असली तरी मुलगी नको मुलगाच हवा... अशी संकुचित विचार करणारी माणसे समाजात आहेत. जजमेंट या चित्रपटातील अग्निवेश साटम (मंगेश देसाई) हा असाच विचार करतो. खरे तर तो शिकलासवरलेला असतो. थोडक्‍यात आयएएस अधिकारी असतो, तरीही तो मुलगाच हवा असा आग्रह आपल्या पत्नीकडे करीत असतो. तो, त्याची पत्नी आणि दोन छोट्या मुली असे त्याचे कुटुंब.

ऋतुजा (तेजश्री प्रधान) आणि अनादिता (शलाका आपटे) ही मुलींची नावे. परंतु, अग्निवेशला मुलगी नाही तर मुलगाच हवा असतो आणि त्याकरिता तो आपल्या पत्नीला सतत मारझोड करीत असतो. कारण त्याचा स्वभाव विक्षिप्त आणि विचित्र असतो. 

एके दिवशी पत्नीला मारहाण करीत असताना तिचा मृत्यू होतो आणि ही घटना त्याची मोठी मुलगी ऋतुजाने पाहिलेली असते. आपल्या वडिलांचा असा विक्षिप्त स्वभाव पाहून या दोन लहान मुलीही घाबरलेल्या असतात आणि आपल्या आजोबांना (माधव अभ्यंकर) येथून आपल्याला न्यायला सांगतात.

मग आजोबा या दोन्ही मुलींचे पालनपोषण करतात. मोठी मुलगी वकील बनते, तर छोटी मुलगी मानसोपचारतज्ज्ञ. मग मुलगी आपल्या आईच्या खुनाचा बदला घेण्यासाठी स्वतःच्याच बापाविरुद्ध कसा लढा देते याची ही कथा. 

अभिनेता मंगेश देसाईने आतापर्यंत विविध भूमिका केल्या. विनोदी, गंभीर अशा सर्वच भूमिकांमध्ये तो भाव खाऊन गेला. परंतु, या चित्रपटात प्रथमच खलनायकाची भूमिका त्याने साकारली आहे. खरे तर ही भूमिका म्हणजे त्याच्यासाठी मोठे आव्हान होते; पण त्याने ते आव्हान लीलया पेललेले आहे, हे चित्रपट पाहिल्यानंतर नक्कीच जाणवते.

विक्षिप्त आणि विचित्र स्वभावाची तसेच अंगावर शहारे आणणारी ही भूमिका आहे. त्याच्या तोडीस तोड अभिनय तेजश्री प्रधानने केला आहे. आपल्या वडिलांविरुद्ध खंबीरपणे उभी राहणारी... त्यांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध-अत्याचाराविरुद्ध लढणारी ऋतुजा ही व्यक्तिरेखा तिने या चित्रपटात साकारली आहे. तिच्या व्यक्तिरेखेला भावनिक किनारदेखील आहे. धाडसी, तितकाच आत्मविश्‍वास असलेल्या वकिलाची भूमिका तिने छान रंगविली आहे.

तेजश्रीला यापेक्षाही चांगल्या स्क्रीप्टची आवश्‍यकता आहे. ती नक्कीच मोठी भरारी घेईल असे वाटते. माधव अभ्यंकर, शलाका आपटे, सतीश सलागरे, महेंद्र तेरेदेसाई, विजय भानू आदी कलाकारांनी आपापली कामगिरी चोख पार पाडली आहे. चित्रपटात कोर्ट ड्रामा चांगल्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. निवृत्त सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या ‘ऋण’ या कादंबरीवर बेतलेला चित्रपट आहे. या कथेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक समीर सुर्वे यांनी केला आहे.

परंतु, चित्रपटाचे संगीत म्हणावे तसे काही जमलेले नाही. पूर्वार्धापेक्षा उत्तरार्धात चित्रपट अधिक रंगतो. एकूणच महिलांमध्ये आत्मविश्‍वास जागविणारा... त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देणारा असा हा चित्रपट आहे. ही कथा रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News