ट्रक अडकले; भाज्यांचे भाव भडकले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 9 August 2019
  • पूरस्थितीमुळे मुंबईतील आवक निम्म्यावर

मुंबई - अतिवृष्टीमुळे रस्ते पाण्याखाली गेल्याने नाशिक, कोल्हापूर, सोलापूर आदी ठिकाणांहून मुंबईत भाजीपाला घेऊन येणारे ट्रक अडकले आहेत. त्यामुळे मुंबईला होणारी भाजीपाल्याची आवक निम्म्यावर आली आहे. अशा स्थितीत विक्रेत्यांना कल्याण, पालघर, पनवेल आणि पुण्याहून होणाऱ्या भाजीपाला पुरवठ्याचा आधार घ्यावा लागला. 

वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज ७०० ते ८०० ट्रक भाजीपाला येतो. बुधवारपासून त्याची संख्या निम्म्यावर आली आहे. गुरुवारी फक्त ४०० ट्रक भाजीपाला घेऊन आले, असे भायखळा भाजीपाला मंडईचे अध्यक्ष किरण झोडगे यांनी सांगितले. दादर-भायखळा परिसरात जवळच्या भागातून भाजीपाल्याचे १० ते १२ ट्रक येतात. त्या भाजीपाल्याचाच आधार मंडईला घ्यावा लागत आहे. 

दक्षिणेकडील राज्ये व शहरांतून मुंबईत मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. सध्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील महामार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे त्या मार्गाने भाजीपाल्याचे ट्रक मुंबईत येऊ शकत नाहीत. अन्य मार्गांनी येणाऱ्या ट्रकच्या संख्येत ५० टक्के घट झाली आहे. आवक कमी झाल्यामुळे भाज्यांचे भाव दुप्पट आणि तिप्पट वाढले आहेत, अशी माहिती झोडगे यांनी दिली. पुणे आणि नाशिक भागातून भाज्यांची आवक घटली आहे. माल खराब होत असल्याने व्यापारीही मालाची खरेदी करत नाहीत; त्यामुळे आवक अर्धीअधिक घटल्याचे ठाण्याचे व्यापारी किसन दांगट यांनी सांगितले.

पाव किलोसाठी २५ ते ३० रुपये!
फरसबी आणि तोंडली भाज्यांची आवक अत्यंत कमी आहे. अशीच स्थिती आणखी काही दिवस राहिल्यास अशा भाज्या मंडईत दिसणार नाहीत, असे दादरमधील प्लाझा भाजी मंडईतील विक्रेते संदीप भुजबळ म्हणाले. घाऊक बाजारात भाज्यांचे दर ४० ते ७० किलो रुपये असले, तरी किरकोळ बाजारात पाव किलोला २५ ते ३० रुपये मोजावे लागत आहेत. टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, फ्लॉवर, कोबी, फरसबी आदी भाज्या महागल्या असून, भेंडी, गवार व वांगीचे भाव स्थिर आहेत. 

भाज्यांचे भाव (किलो/रुपये)
टोमॅटो : ६० ते ७०      कोबी : ६० 
फ्लॉवर : ८०             मटार : ८०
वांगी : ५०               मिरची : ८०
गवार : ७०                 भेंडी : ६०
तोंडली : १००          फरसबी : १५०
गाजर : ४०             काकडी : ६०

ठाण्यात टोमॅटो शंभरीपार
ठाण्यातील किरकोळ बाजारात टोमॅटोने शंभरी गाठली असून कोबी, भेंडी, गवार, फरसबी आदी भाज्यांनीही ८० रुपये किलोचा टप्पा गाठला आहे. श्रावणात भाज्यांना मागणी जास्त असतानाच पावसामुळे भाजीपाल्यावर परिणाम झाल्याने घाऊक व किरकोळ बाजारातही भाज्यांचे दर चढेच आहेत. नाशिक, पुणे आदी जिल्ह्यांत सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटोची आवक मंदावली आहे. उत्तर महाराष्ट्रातूनही माल येत नसल्याने टोमॅटो १०० रुपये किलोने विकला जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News