अप्सरा ते हिरकणी सोनाली कुलकर्णीचा प्रवास 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 18 October 2019

शरीरयष्टी आणि बांधा व्यवस्थित दिसण्यासाठी व्यायामही केला. नाक टोचून घेतले, शिवाय कासाराकडून दीड-दोन महिन्यांसाठी चुडा भरून घेतला.

यश हे आज आहे तर उद्या नाही. पण माझ्या बाबतीत यशाचे गणित फारच वेगळे आहे. मी चित्रपटसृष्टीत १२ वर्षांपासून काम करतेय, पण यश मिळाले म्हणून माझ्या आयुष्यातील, चित्रपटसृष्टीतील संघर्ष कधीच मी थांबवला नाही. ‘हिरकणी’ चित्रपटातून बऱ्याच गोष्टी मला नव्याने शिकायल्या मिळाल्या.

काही वर्षांपूर्वी मी ‘अजिंठा’ नावाच्या चित्रपटादरम्यान प्रताप गंगावणे या लेखकाला भेटले. त्या वेळी त्यांनी मला ‘हिरकणी’वर एक चित्रपट होऊ शकतो, याबाबत कल्पना दिली होती. त्या वेळी त्यांनी मला सांगितले, की ‘अजिंठा’ चित्रपटातील चारू हे पात्र तू साकारतेस तर हिरकणी या पात्राचाही तू विचार केला पाहिजे. पण त्या वेळी ही कथा, ही कल्पना पुढे चालली नाही. मात्र सात-आठ वर्षांनंतर हीच कथा माझ्याजवळ फिरून आली.

‘हिरकणी’ चित्रपट करताना सुरवातीला प्रचंड आव्हाने होती. मात्र टीममधील प्रत्येकाचा एकमेकांवर असलेल्या विश्‍वासामुळे चित्रपट यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकला. या चित्रपटामुळे प्रसाद ओक, राजेश म्हापुस्कर, संजय मेमाणे यांच्याबाबत माझ्या मनात आपुलकी वाढली आहे. तीन वर्षांच्या तयारीनंतर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या काळात अभ्यास, रिसर्च अशा बऱ्याच गोष्टी केल्या. मी माझ्या दिसण्यावर फार मेहनत घेतली.

खेडेगावातील स्त्रीची भूमिका साकारणे कठीण वाटले. या भूमिकेसाठी मी वजनही कमी केले. शरीरयष्टी आणि बांधा व्यवस्थित दिसण्यासाठी व्यायामही केला. नाक टोचून घेतले, शिवाय कासाराकडून दीड-दोन महिन्यांसाठी चुडा भरून घेतला. गायीचे दूध कसे काढायचे, शेण कसे सारवायचे, चुलीवर भाकरी कशी बनवायची या सर्वच गोष्टी मी नव्याने शिकले.

चित्रपटात बाळासोबत असलेले नातेसंबंध वाढविण्यासाठी मी त्याच्याबरोबर बराचकाळ एकत्र घालवला. आता बाळाची अन्‌ माझी छान केमिस्ट्री निर्माण झाली. चित्रपटातील भाषा भूमिकेजवळची वाटायला हवी म्हणून एक वर्ष फक्त स्क्रिप्टचे वाचन केले. सोनाली कुलकर्णी न वाटता मी ‘हिरकणी’ वाटण्यासाठी फारच मेहनत घेतली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News