मोडी लिपीच्या माध्यमातून ऐतिहासिक कागदपत्रांचे संशोधन वाढण्यासाठी प्रशिक्षण

सुशांत सांगवे
Sunday, 14 July 2019

लातूर : मोडी लिपीतील ऐतिहासिक कागदपत्रांचे संशोधन करण्यासाठी मोडी जाणकारांची कमतरता पडत आहे, अशी खंत आजवर अनेक अभ्यासकांनी व्यक्त केली आहे; पण अशी खंत पून्हा व्यक्त होऊ नये आणि ऐतिहासिक कागदपत्रांचे संशोधनही वाढावे यासाठी शहरात मोडीचे युवा अभ्यासक घडवले जात आहेत. त्यांना मोडी लिपीतील बाराखड्यांपासून ऐतिहासिक कागदपत्रांचे वाचन कसे करायचे इथपर्यंत धडे दिले जात आहेत.

लातूर : मोडी लिपीतील ऐतिहासिक कागदपत्रांचे संशोधन करण्यासाठी मोडी जाणकारांची कमतरता पडत आहे, अशी खंत आजवर अनेक अभ्यासकांनी व्यक्त केली आहे; पण अशी खंत पून्हा व्यक्त होऊ नये आणि ऐतिहासिक कागदपत्रांचे संशोधनही वाढावे यासाठी शहरात मोडीचे युवा अभ्यासक घडवले जात आहेत. त्यांना मोडी लिपीतील बाराखड्यांपासून ऐतिहासिक कागदपत्रांचे वाचन कसे करायचे इथपर्यंत धडे दिले जात आहेत.

राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग आयोजित केले होते. ज्यांना मोडीची आवड आहे, त्यांनी यात सहभागी व्हावे, असे महाविद्यालयाने आवाहन केल्यानंतर केवळ कला शाखेच्या नव्हे तर विज्ञान, वाणिज्य शाखेच्या अकरावी-बारावी आणि पदवीच्या विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षण वर्गात उर्त्स्फूतपणे सहभाग घेतला. त्यांना औरंगाबाद येथील पुरातत्व विभागातील समन्वयक, प्रशिक्षक डॉ. कामाजी डक यांनी प्रशिक्षण दिले. चार दिवसांच्या प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोडी लिपीची गोडी वाढताना दिसत आहे. मुलांनी स्वतंत्र वाचनही करायला सुरवात केली आहे.

डॉ. डक म्हणाले, पूर्वी मोडी लिपी शाळांमधून शिकवली जात असे; पण १९६० नंतर मोडी शिकवणे बंद झाले. त्यामुळे मोडीचे जाणकर कमी झाले. पण ऐतिहासिक कागदपत्रे तशीच राहिली. उलट दुर्मिळ कागदपत्रे मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागली. म्हणून सरकारने पुरातत्व विभागाकडे मोडीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी सोपवली. त्यानूसार आम्ही ठिकठिकाणी जाऊन मुलांना प्रशिक्षण देत आहोत. मोडीचे अभ्यासक वाढावे, हा या मागील मुख्य हेतू आहे. लातूरमध्ये झालेल्या प्रशिक्षणात विविध विद्या शाखांच्या १८८ मुलांनी सहभाग घेऊन मोडी लिपी शिकून घेतली. महाविद्यालयाच्या इतिहासाच्या विभागप्रमुख डॉ. अर्चना टाक म्हणाल्या, याआधी आम्ही २०१६मध्ये असा प्रशिक्षण वर्ग घेतला होता. त्यावेळपेक्षा यंदा विद्यार्थ्यांचा दुप्पट प्रतिसाद मिळाला आहे.

मोडी लिपी शिकल्याने मुलांना न्यायालय, भूमिअभिलेख अशा विभागात रोजगारसुद्धा मिळतो. शिवाय, ऐतिहासिक कागदपत्रांचे वाचन करून संशोधनही करता येते. पुणे, मुंबई, कोल्हापूरच नव्हे तर मराठवाड्यातही मोडी लिपीतील कागदपत्रांचा मोठा खजिना आहे. तो वाचकांची वाट पहात आहे.
- डॉ. कामाजी डक, प्रशिक्षक

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News