जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार : तानाजी सावंत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 June 2019
  • जलयुक्त शिवारच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी लाचलुचपत विभागाला तत्कालीन कृषी आयुक्तांनी विरोध केल्याचे वृत्त ‘ॲग्रोवन’ने प्रसिद्ध केले होते

मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आढळून आल्याची कबुली जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनीच विधान परिषदेत दिली.

जलयुक्त शिवारच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी लाचलुचपत विभागाला तत्कालीन कृषी आयुक्तांनी विरोध केल्याचे वृत्त ‘ॲग्रोवन’ने प्रसिद्ध केले होते. याची दखल विधान परिषदेत तारांकित प्रश्नोत्तरामध्ये घेण्यात आली.

‘जलयुक्त’च्या कामांमध्ये गैरव्यवहाराच्या तक्रारी होत्या. या प्रकरणांची विभागीय चौकशी सुरू असून, याबाबतचा तांत्रिक अहवाल आल्यानंतरच लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री तानाजी सावंत यांनी सोमवारी दिली. मात्र, त्यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आक्षेप घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीची मागणी लावून धरल्याने हा प्रश्न सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राखून ठेवला.

जलयुक्त शिवार अभियानात गैरव्यवहार झाल्याबाबतचा तारांकित प्रश्‍न धनंजय मुंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. या गैरव्यवहाराच्या ‘एसीबी’मार्फत चौकशीस कृषी आयुक्तांनी लेखी विरोध केला होता. जलसंधारण विभागाने या गैरव्यवहारांची चौकशी केली का, असा प्रश्न त्यांनी विचारला. तर, सर्वच प्रकरणांची ‘एसीबी’कडून खुली चौकशी करण्याची मागणी मुंडे यांनी केली.

या वेळी मंत्री सावंत म्हणाले, ‘‘जलयुक्त शिवारातील कामांबाबत तक्रारी आल्या. या तक्रारींची दखल घेत विभागीय चौकशी करण्यात आली. चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी जिल्ह्याबाहेरील अधिकाऱ्यांमार्फत ही चौकशी केली. आतापर्यंत चार कामांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. उर्वरित कामांचा अहवाल पुढील आठवड्यात येईल. त्यानंतरच आवश्‍यकता भासल्यास एसीबी अथवा पोलिसांमार्फत खुली चौकशी करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.’’

‘मगनलाल’च्या मालकास साडेसात लाखांचा दंड
लोणावळा येथील मगनलाल फूड प्रॉडक्‍ट्‌स या चिक्की उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या मालकावर सुमारे साडेसात लाख रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. भेसळ आढळली नसली, तरी गुणवत्ता नसल्याबाबत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

प्रश्‍न राखीव
विरोधकांनी ‘एसीबी’ चौकशीची आग्रही मागणी केली. ‘एसीबी’ला तांत्रिक बाजू समजणार नाही म्हणून विभागीय चौकशी करण्यात आली. तांत्रिक अहवालापूर्वी कारवाईचे आदेश दिल्यास कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची होईल, असा दावाही मंत्री तानाजी सावंत यांनी केला. यावरून मंत्री आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही मंत्री सावंत यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच, हा प्रश्न राखून ठेवण्याचीही घोषणा केली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News