माझ्या खऱ्या आयुष्यात इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठीही बरेच जुगाड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 19 October 2019

अभिनेता राजकुमार रावने बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. बॉलीवूडमध्येही स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करण्यात तो यशस्वी ठरला. त्याचा ‘मेड इन चायना’ हा चित्रपट २५ ऑक्‍टोबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने राजकुमार रावने ‘मेड इन चायना’तील सांगितलेला जुगाड...

एक अभिनेता म्हणून मी कलाक्षेत्रामध्ये अगदी कमी कालावधीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्याचबरोबर ‘क्वीन’, ‘स्त्री’, ‘जजमेंटल है क्‍या’, ‘बरेली की बर्फी’ यांसारख्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या. माझे हे चित्रपटही बरेच गाजले. बऱ्याच हिंदी चित्रपटात मी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. आता लवकरच मी ‘मेड इन चायना’ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटात माझी भूमिका एका गुजराती व्यावसायिकाची आहे. ‘काय पो छे’ चित्रपटात काम करताना मी थोडीफार गुजराती भाषा शिकलो होतो; परंतु ‘मेड इन चायना’ या चित्रपटातील भाषेसाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. भाषा बोलणे सोप्पे आहे मात्र ती भाषा समजून घेऊन त्यातील भाव ज्ञात करून बोलणे माझ्यासाठी फारच कठीण होते. या चित्रपटाच्या टीममधील पन्नास टक्के लोक गुजराती भाषिक आहेत. त्यामुळे त्यांच्या सान्निध्यात राहून राहून कुठेतरी गुजराती भाषा शिकण्यासाठी मलाही त्याचा उपयोग झाला. ही भूमिका पडद्यावर जिवंत वाटावी यासाठी मी बरीच मेहनत घेतली आहे.

चित्रपटाची कथा फारच मजेदार आहे. त्यामुळेच माझ्यासमोर या चित्रपटाच्या निमित्ताने उभी ठाकलेली आव्हाने मला तितकीच मजेदार वाटली. या चित्रपटात मी रघू हे पात्र साकारत आहे. एका अयशस्वी वसायिकापासून यशस्वी व्यावसायिक होण्यापर्यंतचा रघूचा प्रवास या चित्रपटात आहे. मला ही भूमिका करताना फार मज्जा आली. मी माझ्या कामातून लोकांना शंभर टक्के मनोरंजन देण्याचा प्रयत्न केला आहे.

‘इंडिया का जुगाड’ असा या चित्रपटात एक डायलॉग आहे, या डायलॉगप्रणाने मी माझ्या खऱ्या आयुष्यात इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठीही बरेच जुगाड केलेत. आणि त्या केलेल्या जुगाडमुळेच मी आज इथवर पोहोचलो आहे.
प्रत्येक दहा वर्षांत चित्रपटांच्या कथेचे स्वरूप बदलते. सध्या हिंदीमध्ये छोट्या गावातील कथा रुपेरी पडद्यावर आणण्याचा ट्रेण्ड आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांची बॉक्‍स ऑफिसवर अधिक चलती आहे. खरं तर याचे सर्व श्रेय प्रेक्षकांना जाते. प्रेक्षकांनाही खऱ्या आयुष्यावर आधारित कथा बघायला आवडतात. खऱ्या आयुष्यावर म्हणा वा छोट्या गावातील कथांवर येणाऱ्या चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता चित्रपटाच्या निर्मितीचे स्वरूप बदलले आहे, असे मला वाटते.
या चित्रपटासाठी मी दहा दिवस चीनमध्ये चित्रीकरण केले. मुंबईप्रमाणे तिथेही जिद्दीने काम करणारे लोक पाहायला मिळाले. या चित्रपटातील जसा रघू आपल्या प्रवासासाठी निघाला आहे; तसेच चीनमध्येही भरपूर रघू आहेत जे आपल्या सुखकर आयुष्यासाठी, काम मिळवण्यासाठी धडपड करत आहेत, हे प्रत्यक्षात अनुभवायला मला मिळाले.

आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू तुम्ही पाहाल तर चीनमधूनच आलेल्या असतात. त्या वस्तूंच्या मागे ‘मेड इन चायना’ असे लिहिलेले असते आणि या चित्रपटातील रघू यशस्वी होण्यासाठीची सुरुवातही चायनामधूनच होते म्हणून या चित्रपटाचे नाव ‘मेड इन चायना’ असे आहे. मात्र चित्रपटाचे नाव जरी ‘मेड इन चायना’ असले तरी यात जुगाड मात्र इंडियाचाच आहे आणि हा जुगाड पाहायला प्रेक्षकांना नक्की आवडेल, असा मला विश्‍वास आहे.

इंडस्ट्रीमध्ये काम करताना मला नव्या कलाकारांसोबत म्हणा वा नव्या लोकांसोबत म्हणा; काम करायला जास्त आवडते, याचे कारण असे की, नवे कलाकार, नवे लोक पहिल्यांदाच काम करत असल्याने खूप जिद्दीने आणि काहीतरी करून दाखवायचं या उद्देशाने काम करतात. ते घेऊन आलेली नवी पद्धत आपल्यालाही शिकायला मिळते. आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन काही काम केले तरीही आपल्याला बरेच काही नव्याने अनुभवता येते.

अभिनेता बनल्यानंतर मी खरंच नव्याने जगायला शिकलो. बरेच काही मला नव्याने मिळत गेले. ‘स्त्री’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जेव्हा मला मिळाला तेव्हाच मला माझ्या कामाची पोचपावती मिळाली. मला वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट आणि भूमिका साकारायल्या फार आवडतात आणि यापुढेही मी अशा भूमिका साकारत राहीन. एकूणच या चित्रपटाचा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News