अकरावी प्रवेशासाठी उद्या अंतिम मुदत, २ जुलैला जाहीर होणार पहिली गुणवत्ता यादी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 June 2019

दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत.

मुंबई -  दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी शुक्रवार हा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर अर्जांची छाननी होऊन २ जुलैला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

शहर व जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेशाची लगबग सुरू आहे. शुक्रवारी प्रवेश अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे पुढील एक-दोन दिवस गर्दी होण्याची शक्‍यता आहे. २८ ते ३० जून या कालावधीत विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या अर्जांची महाविद्यालय स्तरावर छाननी केली जाणार आहे. त्यानंतर २ जुलैला सकाळी १० वाजता प्रत्येक महाविद्यालयात पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा नंबर पहिल्या यादीमध्ये आला आहे, त्या विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे.

त्यावेळी मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला व जातीचा दाखला असणे आवश्‍यक आहे. ८ जुलैला दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्या यादीमध्ये नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांना १० जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. दोन गुणवत्ता याद्या जाहीर झाल्यानंतरही महाविद्यालयातील जागा रिक्त राहिल्यास तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्धी केली जाणार आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना १३ जुलैपर्यंत प्रवेश घेता येतील.

अकरावीचे वर्ग १५ जुलैपासून
अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ जुलैपासून महाविद्यालयातील अकरावीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. त्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. त्याचबरोबर १७ जुलैपासून बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News