आज नागपंचमीचा सण, करा सापाचे रक्षण!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 5 August 2019
  • हिंदू संस्कृतीमधील शेतकऱ्यांचा पारंपरिक सण म्हणून ग्रामीण भागात नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात येतो. खेडेगावात  नागोबाच्या पाटीचे पूजन करण्यासाठी आरबळे एकवटून गावाबाहेरील वारुळाला जातात. वाजत गाजत गावातून ही पाटी फिरवली जाते आणि मोठ्या भक्तीभावाने नागोबाचे (सापाचे) पूजन केले जाते.

अकोला - हिंदू संस्कृतीमधील शेतकऱ्यांचा पारंपरिक सण म्हणून ग्रामीण भागात नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात येतो. खेडेगावात  नागोबाच्या पाटीचे पूजन करण्यासाठी आरबळे एकवटून गावाबाहेरील वारुळाला जातात. वाजत गाजत गावातून ही पाटी फिरवली जाते आणि मोठ्या भक्तीभावाने नागोबाचे (सापाचे) पूजन केले जाते.

पूर्वी नागपंचमीला अनेक ठिकाणी गारुड्यांकडून जिवंत नागांना दूध पाजण्याची प्रथा होती. आता सुधारकांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकार कमी झाला आहे. परंतु सापाला किंवा नागाला दूध पाजू नये, त्यांची शरीर रचना दूध पचवण्यासाठी योग्य नसते आणि यामुळेच नागपंचमीला अनेक नाग मृत्यूमुखी पडतात. तेव्हा हा सण आपल्या क्षेत्रपालाला त्रास न देता त्याच्या प्रतिमेसोबतच साजरा करावा, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.आपल्याला लहानपणापसून शिकवण्यात येते की, साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. इतकेच नव्हे तर हिंदू संस्कृतीत महादेवाने गळ्यात नाग परिधान केला आहे. तर भगवान विष्णू हे नागावरच आरुढ असतात. या सणानिमित्ताने  लोक  नागाची पूजा करताना दिसतात.

शेती हा आपल्या देशाचा प्रमुख व्यवसाय आहे आणि साप शेतीच्या कार्यात फारच महत्त्वाचा कार्यभाग सांभाळतो. शेतातील उंदीर व अन्य हानिकारक जीवावर उदरनिर्वाह करून तो शेताची एकाप्रकारे निगा करतो. क्षेत्र (शेत) पाल (रक्षक) असे सापाचे क्षेत्रपाल असेही नाव आहे.

स्त्रियांसाठी आनंदाची पर्वणी
“आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे”. श्रावण महिना, सणांचा, उत्सवांचा, आनंदाचा महिना. या महिन्यात निसर्ग सुद्धा हिरवा शालू पांघरून मिरवत असतो. मनुष्य, प्राणी, पक्षी व झाडे सर्वच या महिन्यात आनंदाने बहरून जातात. हा महिना सणांचा महिना आहे व त्याची सुरुवात नागपंचमीने होते. या दिवशी गावातील मुली व स्त्रिया देवळात व वारुळाजवळ जाऊन त्याची पूजा करतात. झिम्मा, फुगडी व झोका असे खेळ खेळतात. यामुळे हा सण स्त्रियांसाठी एक आनंदाची पर्वणीच म्हणावी लागेल.

ग्रामीण भागात नागोबाच्या पाटीचे पूजन
विशेष म्हणजे, नागोबाची पाटी मोठ्या हस्तकलेतून चंदनाच्या लाकडापासून बनवलेली असते. आजही नागपंचमीची परंपरा मोठ्या श्रद्धेने खेडेगावात जपली जात आहे. यामध्ये पाटी पूजन केल्यानंतर त्या पाटीची स्थापना गावातील मंदिरात करण्यात येते व रात्रीचेवेळी पाच दिवस गावातील आराधना करणारे अरबळे ठाव्याचे म्हणजे भजनाचे कार्यक्रम करतात. साप म्हटले की, ज्या प्राण्यांची भीती बाळगली जाते. त्याच सापाची नागपंचमीच्या दिवसापासून तर पाच दिवस (पंचमीपर्यत) आराधना केली जाते.

या प्रक्रियेत असणारे अरबळे काही पथ्यही पाळताना दिसतात. ते पाच दिवस बैल जुंपत नाहीत, जमीन खुरपणी करत नाहीत. तव्यावरची पोळी ,भात ,डाळ,जेवणात घेत नाहीत. या सर्व बाबी सापाचे प्रतीकात्मक अवयव मानण्याची त्यांची प्राचीन प्रथा आहे. नागपंचमीच्या दिवशी काहीही कापू नये, चुलीवर तवा ठेऊ नये असे पथ्य ग्रामीण भागातील लोक पाळतात. गंध, हळद कुंकू व इतर पूजेच्या सामाग्रींनी पाटावर व घराच्या भिंतीवर ५ फण्यांच्या नागाचे चित्र काढले जाते. व त्याची पूजा केली जाते. ही परंपरा आजतागायत खेडे गावात जपली जात आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील मळसूर, डिग्रस याठिकाणी सोपिनाथ महाराजांचे ठाणे असून तेथे यात्राही भरते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News