बी.ई., बी.फार्म प्रवेशाला आज मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 June 2019
  • पुन्हा फॅसिलीटेशन सेंटरच्या माध्यमातून राबविली जाणार प्रक्रिया
     

नाशिक - प्रवेशप्रक्रियेत घोळाची परंपरा कायम ठेवत यंदाही प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमात प्रचंड गोंधळ निर्माण केल्यानंतर सोमवार (ता. २४)पासून प्रवेशाच्या प्रक्रियेला मुहूर्त लागणार आहे. यंदा राबविलेला सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून प्रवेशप्रक्रियेचा प्रयोग फसल्यानंतर यापुढील प्रवेशाची प्रक्रिया पूर्वीप्रमाणे फॅसिलीटेशन सेंटरच्या माध्यमातून होणार आहे. अभियांत्रिकीतील बी.ई., औषधनिर्माणशास्त्र शाखेतील बी. फार्म, डी. फार्म यांसह आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचे वेळापत्रक सोमवारी (ता. २४) जाहीर होणार असल्याची शक्‍यता आहे.

सामूहिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांना पुढील प्रवेशप्रक्रियेची प्रतीक्षा होती; मात्र सार (SAAR) पोर्टलच्या माध्यमातून प्रवेशप्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न फसल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा लिंकद्वारे सीईटी सेलच्या संकेतस्थळावर वळविण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा वैयक्‍तिक माहिती भरावी लागली होती. इतके परिश्रम घेऊनही सर्व मेहनतीवर पाणी फेरले गेले असून, सीईटी सेलमार्फत सूचना जारी करत सोमवार (ता. २४)पासून नव्याने प्रवेशप्रक्रिया राबविणार असल्याचे स्पष्ट केले होते. यादरम्यान नव्याने राबविलेली संकल्पना असलेल्या सेतू सुविधा केंद्रातून विद्यार्थी व पालकांच्या संयमाची प्रतीक्षा घेतली जात होती.

दरम्यान, सेतू सुविधा केंद्राची संकल्पनेचा मोह सोडून आता पूर्वीप्रमाणे फॅसिलीटेशन सेंटर (एफसी)द्वारे प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. सीईटी सेलमार्फत विविध अभ्यासक्रमांसाठी असलेल्या फॅसिलीटेशन सेंटरची यादी संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. या केंद्रांवर भेट देत विद्यार्थी-पालक पुढील प्रक्रिया राबवू शकणार आहेत.
एकच सूचना दोन-तीनदा अपलोड

सीईटी सेलमार्फत फॅसिलीटेशन सेंटरसंदर्भातील सूचना (नोटिफिकेशन) संकेतस्थळावर एकापेक्षा जास्त वेळा अपलोड केला गेल्याने पुन्हा गोंधळ निर्माण झाला आहे. यात बी.ई. / बी. टेक. करिताची सूचना तीनदा अपलोड केलेली आहे. तर बी.फार्मशी निगडित सूचना दोनदा अपलोड केलेली आहे. असा गोंधळ पुढील प्रक्रियेत तरी होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जाते आहे.

अभियांत्रिकीसाठी ४५, फार्मसीसाठी ४० केंद्रे
फॅसिलीटेशन सेंटरची यादी जारी केली असून, बी.फार्मकरिता राज्यात १७३ केंद्र असून, त्यापैकी नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नाशिक विभागात ४० केंद्रे आहेत. तर अभियांत्रिकी अभ्यासक्रम बी.ई./बी.टेक.करिता राज्यात तीनशे केंद्रे असून, त्यापैकी नाशिक विभागात ४५ केंद्रांच्या माध्यमातून प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News