पाल्यांच्या अभ्यासाठी दशा आणि दिशा

डॉ. श्रीराम गीत
Thursday, 17 October 2019

क्‍लासच महत्त्वाचा, शाळेचा अभ्यास, शाळेतील चाचण्या, शाळेच्या परीक्षा याकडे दुर्लक्ष हा दुसरा दुष्परिणाम सुरू होतो. मात्र दहावीचा निकाल लागेपर्यंत अनेकांची मूठ झाकली राहते.

गेली पाच-सहा वर्षे इयत्ता आठवीपासूनच अनेक पालक अस्वस्थ होऊन आयआयटीची तयारी या विषयावर अडकतात. ती करून घेणारे अर्थातच गावोगावी क्‍लासेस आहेतच. ते क्‍लास लावले तर निदानपक्षी दहावीचा अभ्यास बरा जमतो. अन्यथा दहावीचा मार्कांचा पाऊस अकरावीत ओसरतो व मार्कांचा दुष्काळ येतोच येतो. पण, इथे एक फार मोठ्ठी गल्लत सुरू होते. मुलांच्या मनात ती रुजते व पालकांच्या अवास्तव अपेक्षा वाढत जातात. आयआयटीचा क्‍लास लावला म्हणजे मी इतरांपेक्षा खूप वेगळा आहे ही फार मोठ्ठी गल्लत मुलांच्या मनात रुजते. मग दैनंदिनदृष्ट्या त्याचे परिणाम दिसू लागतात. 

क्‍लासच महत्त्वाचा, शाळेचा अभ्यास, शाळेतील चाचण्या, शाळेच्या परीक्षा याकडे दुर्लक्ष हा दुसरा दुष्परिणाम सुरू होतो. मात्र दहावीचा निकाल लागेपर्यंत अनेकांची मूठ झाकली राहते. आयआयटीचा क्‍लास न लावलेला विद्यार्थी आपल्यापेक्षा छानसे मार्क मिळवून दहावी झाला आहे हे पचवणे विद्यार्थी व पालक यांना खूप जड जाते. छोट्या गावातील, मध्यम शहरातील अशा अपेक्षांनी भारलेली असंख्य उदाहरणे मी दरवर्षी पाहत आहे. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद या मोठ्या शहरांतील पालकांना शालेय जीवनातील तीव्र स्पर्धेचे अन्य मार्ग निदान माहिती असतात, उपलब्ध असतात. 

उदा. : एमटीएस, एनटीएस, केव्हीपीआय, ऑलिंपियाड इ. अपेक्षा कितीही ठेवून या खऱ्या कस पाहणाऱ्या पर्यायांचा मार्ग चोखाळला तर विद्यार्थी व पालकांना आपली यत्ता कंची? याचा बोध नक्की होतो. अन्यथा चुकीच्या अपेक्षा, अवाजवीपेक्षा यांचे दडपण घेऊन अनेक कोवळे जीव १२ ते १५ वयोगटात अक्षरशः भरडले जातात. मग या साऱ्यामागचे वास्तव थोडेसे समजून घ्यायचे असेल तर? गणित सोडवणे हा निकष पूर्णतः बाजूला ठेवून या गणिताला हीच रीत का वापरली, अन्य एखादी पद्धती वापरता येईल काय? अशा पद्धतीत विचार करणारा विद्यार्थी तर हवा, पण त्याच वेळी त्याची चौफेर चौकसबुद्धी जागृत हवी. 

गेल्याच महिन्यात नोकरी न मिळालेला फर्स्टक्‍लासवाला सिव्हिल इंजिनिअर भेटला तेव्हा त्याला मुळा-मुठेच्या पुराबद्दल विचारले. त्याचे उत्तर होते धरणातून पाणी सोडले म्हणून पूर आला. त्याच दिवशी यंदा अकरावीत गेलेला एक विद्यार्थी याच प्रश्‍नाला उत्तर देताना सांगत होता, तीन धरणे शंभर टक्के भरली व तीस हजार क्‍युसेक्‍सने विसर्ग सुरू झाला, तेव्हा नदीपात्र संपूर्ण दुथडी भरून वाहू लागले. पहिला फक्त इंजिनिअर झाला, तर दुसरा चांगला उपयुक्त इंजिनिअर तर होईलच; पण कदाचित आयआयटीच्या स्पर्धेत उतरू शकेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News