तीन तरुणांनी आणले प्रस्थापितांच्या नाकी नऊ

गजेंद्र बडे
Thursday, 25 April 2019

 

  • करिअरसाठी पुण्यात युवक उतरले लोकसभेच्या आखाड्यात

पुणे : राजकीय क्षेत्रात करिअर करण्याच्या उद्देशाने पुणे
जिल्ह्यातील बारामती, मावळ आणि शिरुर या तीन लोकसभा मतदारसंघात तीन तरूण चेहरे यंदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. विशेष म्हणजे या तिघांनाही कोणत्या ना कोणत्या राष्ट्रीय पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे.यामध्ये एका युवतीचा आणि दोन युवकांचा समावेश आहे. या तीनही नव्या
चेहऱ्यांनी प्रस्थापितांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. योगायोग म्हणजे हे तिघेही जण त्या त्या मतदारसंघाच्या विद्यमान खासदारांच्या विरोधात
निवडणूक लढवत आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत महाआघाडीच्यावतीने विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने याच लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या दौंड विधानसभा मतदारसंघातील रासपचे आमदार ऍड. राहूल कुल यांच्या
पत्नी कांचन कुल यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. कांचन कुल यांचे वय 34 वर्षे आहे. कुल यांच्यामागे भाजपने पुर्ण शक्ती उभी केल्याने, बारामतीची निवडणूक देशभरात प्रतिष्ठेची बनली आहे.

मावळचे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आहे. बारणे हे सलग दुसऱ्यांदा
मावळच्या लोकसभा आखाड्यात उतरले असून पार्थ पवार यांनी याच निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्यांदाच राजकारणात पाऊल ठेवले आहे. पार्थ पवार यांनी परदेशात उच्च शिक्षण पुर्ण केले असून, सध्या ते अवघ्या 29 वर्षाचे आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून लोकप्रिय अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांनी या मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. आढळराव हे सलग चौथ्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांनी वैद्यकीय शास्त्रात पदवी शिक्षण (एम.बी. बी. एस.) पुर्ण केली आहे. सध्या कोल्हे यांचे वय 38 वर्षे आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News