धावत्या बसमधून पळवले तीन लाखाचे दागिने

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019
  • पुण्याहून लातूरला येताना झाली चोरी; पोलिस स्टेशनमध्ये प्रवाशांची झाडाझडती, चोर पसार

लातूर : आजारी आजीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खासगी बसने पुण्याहून लातूरला येणाऱ्या महिलेच्या पर्समधील तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख ९० हजार रुपये चोरट्याने पळवून नेल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर महिलेने आणि तिच्या वडिलांनी बस पोलिस स्टेशनमध्ये उभी करायला लावली. प्रवाशांची झाडाझडती घेण्यात आली; पण त्याआधीच चोर पसार झाल्याचे निदर्शनास आले.

बालाजी वैजनाथ चिडबुले (वय ६०, रा. बसवेश्वर कॉलनी, परळी) हे आपल्या पुण्यातील मुलीसह राधीका ट्रॅव्हल्सने (एमएच १८ एए ९७६३) लातूरला येत होते. पुण्यातून रात्री साडेआठ वाजता बस निघाली. बस पुण्याबाहेर पडल्यानंतर चिडबुले यांना झोप लागली. काही वेळाने मुलीलाही झोप लागली. वाटेत त्यांना एक-दोन वेळा जागही आली. सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान बस लातूरमध्ये आली. पाण्याची टाकी परिसरात त्यांना उतरायचे होते. म्हणून त्यांनी बॅगाची आवराआवर करायला सुरवात केली. तेव्हा पर्स उघडी असल्याचे दिसले. त्यानंतर चोरीचा प्रकार समोर आला.

त्यामुळे चिडबुले यांनी बस थेट एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये थांबवायला सांगितली. त्यानूसार चालकाने बस पोलिस स्टेशनमध्ये नेली. पोलिसांनी सर्व प्रवाशांची झाडाझडती घेतली. बसचीही पाहणी केली. पण हाती काहीही सापडले नाही. ही बस लातूरच्या आधी बार्शी आणि मुरूडमध्ये थांबली होती. बसमधील प्रवासी तेथे उतरले होते. त्यामुळे पोलिसांनी बसमधील सर्व प्रवाशांची यादी घेऊन चौकशी करायला सुरवात केली आहे. ही घटना रविवारी पहाटे घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News