घट विसर्जनानंतर तलावात हजारो प्लास्टिक कॅरिबॅग 

परशुराम कोकणे
Monday, 14 October 2019
  • घरच्या बागेतच घटांचे विसर्जन करण्याचे पर्यावरणप्रेमींचे आवाहन 

सोलापूर: नऊ दिवस देवीच्या नावाने पूजा केल्या जाणाऱ्या घटांचे प्लास्टिक कॅरिबॅगत घालून संभाजी तलावातील पाण्यात विसर्जन केले जात आहे. हे चित्र दरवर्षीचेच असून यामुळे संभाजी तलाव परिसरात वाढ होत आहे. गणेश विसर्जनप्रमाणे घटांच्या विसर्जनासाठी, प्लास्टिक कॅरिबॅग संकलनासाठी संभाजी तलाव परिसरात महापालिकेने स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे. 

मातीच्या घटांमुळे पाण्याचे प्रदूषण होत नसले तरी घटांसोबत येणाऱ्या प्लास्टिक कॅरिबॅग आणि अन्य कचऱ्याचे काय? तलावाच्या ठिकाणी घटांपेक्षा प्लास्टिक कॅरिबॅग जास्त आहेत. गणेश विसर्जनावेळी महापालिकेकडून विर्सजन कुंड आणि निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते. तशी वेगळी व्यवस्था घटांच्या विसर्जनावेळी करणे गरजेचे आहे. देवीच्या नावाने पूजा केलेल्या घटांचे प्रदूषित पाण्यात विसर्जन करण्यापेक्षा, घराच्या बागेतही घटांचे विर्सजन करता येऊ शकते, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. 

सोलापूरकरांना जलाशये प्रदूषित करायची सवय लागली आहे. आपले घर स्वच्छ ठेवायचे आणि सार्वजनिक ठिकाणी घाण करायचे प्रकार वाढले आहेत. या प्रबोधनासोबत कडक कारवाई आवश्‍यक आहे. 
- राजश्री सुतार, चित्रकार 

आता हिंदूसह सर्व धर्मातील नागरिकांनी आपला देव आपल्या उंबऱ्याच्या आत ठेवावा. आपल्या सण-उत्सवाकरिता जलाशये किंवा कोणतेही सार्वजनिक ठिकाण प्रदूषण करण्याचा आपल्याला अधिकार नाही. 
- सुभाष बडवे, पर्यावरणप्रेमी 

आम्ही गणेश विसर्जनाप्रमाणे देवीचे घटही घराच्या बागेतच विसर्जित करतो. घटांची माती झाडांना घालता येते किंवा मग घटात वाढलेली धन्याची रोप बागेत लावून मोठी करता येतात. स्मार्ट सिटी होत असताना आपण सर्वांनी बदलायला हवे. 
- मनोज बिडकर, प्राचार्य, आयटीआय 

संभाजी तलाव परिसरात जाताना घटांसोबत हजारो प्लास्टिकच्या पिशव्या पाहून वाईट वाटले. हे चित्र दरवर्षीचे आहे. सोलापूर स्मार्ट सिटी होत असताना प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी यायला हवे. 
- संजय भोईटे, पर्यावरणप्रेमी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News