गोष्ट! टेबलावरून फाईल फिरवणाऱ्या नवऱ्याची

विनय उपासनी
Sunday, 13 October 2019

मुंबईतील एका सरकारी कार्यालयात आपला नवरा फाइली या टेबलावरून त्या टेबलावर फिरवत राहतो, कधी त्याचे दिल्लीतील वरिष्ठ मुंबईत आले की तो दोन-चार दिवस घरी न येता सतत ऑफिसच्या बैठकांमध्ये व्यस्त राहतो,

देशात एखादा दहशतवादी हल्ला झाला की, आपण ‘गुप्तचर यंत्रणांच्या हलगर्जीमुळे हा हल्ला झाला’ किंवा ‘आपल्या गुप्तचर यंत्रणा झोपल्या होत्या का, हे सर्व होत असताना’, असं वाक्‍य फेकून अपयशाचं खापर गुप्तचर यंत्रणांवर फोडून त्यांना सरळसरळ आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं करून टाकतो. मग आपल्या सुरक्षा यंत्रणांना गुप्तचर यंत्रणांनी कसं वेळीच सावध करायला हवं होतं, हा हल्ला कसा टळला असता किंवा अमकं झालं असतं तर हा हल्ला टाळता आला असता, वगैरेवर चर्चा सुरू होतात. पण घटना घडून गेल्यानंतर या चर्चांना फारसा काही अर्थ उरत नसतो. क्वचितप्रसंगी आपण वृत्तपत्राच्या एखाद्या कोपऱ्यात ‘दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला’ किंवा ‘दहशतवाद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त’, या आशयाच्या बातम्या वाचतो. साधारणतः एखाद-दोन कॉलमात संपवण्यात आलेल्या या बातम्यांकडे तसं फारसं कोणाचं लक्ष जात नाही. पण म्हणून त्यांचं महत्त्व कमी होतं, असं नाही.

दहशतवादी हल्ल्याचा कट कसा उधळला जातो, मुळात असा काही दहशतवादी हल्ला होणार आहे, याचा सुगावा गुप्तचर यंत्रणांना लागतोच कसा, त्यांना कसं कळतं की अमक्‍या ठिकाणी दहशतवादी लपले आहेत, तमक्‍या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याचा कट शिजतो आहे वगैरे. हे सर्व करण्यासाठी गुप्तचर यंत्रणांना कसं काम करावं लागतं, किती माहिती गोळा करावी लागते, माहितीचे तुकडे जोडतजोडत माहितीच्या स्रोतापर्यंत कसं पोहोचता येतं, या सर्व प्रक्रियेत कोणती माणसं सहभागी असतात, त्यांना त्यांचं वैयक्तिक आयुष्य असतं तरी का, असलं तरी ते कुटुंबवत्सल असतात का, की सतत देशाचाच विचार ते करत असतात, त्यांना चेहरा असतो का, गुप्तचर यंत्रणांमध्ये काम करणाऱ्यांची कार्यपद्धती कशी असते, इतर क्षेत्रात असतं तसं इथेही वरिष्ठांचं राजकारण असतं का... या सर्व प्रश्नांची उत्तरं ही वेब मालिका आपल्याला देण्याचा प्रयत्न करते.  

नॅशनल इन्व्हिस्टिगेशन एजन्सी (एनआयए) या तपास यंत्रणेच्या विशेष कक्षात अधिकारी पदावर काम करणाऱ्या श्रीकांत तिवारीच्या (मनोज बाजपेयी) चौकोनी कुटुंबात सुविद्य पत्नी सुचित्रा (प्रियामणी) आणि एक मुलगी व एक मुलगा यांचा समावेश आहे. मुंबईतील एका सरकारी कार्यालयात आपला नवरा फाइली या टेबलावरून त्या टेबलावर फिरवत राहतो, कधी त्याचे दिल्लीतील वरिष्ठ मुंबईत आले की तो दोन-चार दिवस घरी न येता सतत ऑफिसच्या बैठकांमध्ये व्यस्त राहतो, त्यामुळे वैतागलेली सुचित्रा त्याला ही सरकारी नोकरी सोडून अन्यत्र कुठेतरी नोकरी स्वीकार, असा सतत आग्रह करत असते. परंतु कुटुंबाइतकंच आपल्या कामावरही प्रेम करणारा श्रीकांत ‘बघू नंतर’ असं सांगत तिचं बोलणं मनावर घेत नसतो. कधी मुलांना शाळेत सोडणं, त्यांना घरी घेऊन येणं, मंडईत जाऊन भाज्या आणणं ही कामं श्रीकांत बायकोच्या आग्रहास्तव करतोही. पण त्याचं मन सतत फील्डवरच्या घडामोडींभोवती पिंगा घालत असतं.

डेस्क जॉबला कंटाळलेल्या श्रीकांतवर त्याचे वरिष्ठ एक कामगिरी सोपवतात. लक्षद्वीपनजीकच्या समुद्रात तटरक्षक दलाने पकडलेल्या तिघा आयसिसच्या हस्तकांची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचं हे काम श्रीकांत, त्याचा सहकारी जेके तळपदे (शरीब हाश्‍मी) आणि प्रशिक्षणार्थी उमेदवार झोया (श्रेया धन्वंतरी) आनंदानं स्वीकारतात. तटरक्षक दलाकडून हस्तांतरित झालेल्या आयसिसच्या या तीनही हस्तकांना मुंबई विमानतळावर दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवलं जातं. तिघेही हस्तक एटीएसच्या जाळ्यातून सुटण्याचा प्रयत्न करतात. त्यात त्यांचा एक साथीदार मारला जातो; तर दुसरा दहशतवादी (आसिफ) गंभीर जखमी होतो. तिसरा दहशतवादी मूसा जीव वाचवण्यासाठी एका प्रार्थनास्थळाचा आश्रय घेतो. एटीएसकडून परवानगी घेत श्रीकांत मूसाला अभय देत त्याची सुटका करतो. मूसा आणि आसिफ या दोघांनाही हॉस्पिटलात दाखल करून त्यांच्यावर श्रीकांतची टीम नजर ठेवते. गुजरात दंगलीत कुटुंबाच्या झालेल्या वाताहतीचा बदला घेण्यासाठी आयसिसमध्ये दाखल झालेला मूसा केरळात असलेल्या आईला भेटण्यासाठी कासावीस झालेला असतो. आपण दहशतवादी झाल्याचे आईला समजले तर ती त्या धक्‍क्‍यानेच मरेल, असे सांगून मूसा श्रीकांतची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो. कोमात गेलेला मूसाचा साथीदार आसिफ हा भारतात मोठा घातपात करण्यासाठी आला होता, अशी माहिती श्रीकांतला मिळते. त्यामुळे आसिफला शुद्धीवर आणून त्याच्याकडून कटाची इत्थंभूत माहिती मिळवण्याचा त्याचा इरादा असतो.

दरम्यान, एका चकमकीदरम्यान दहशतवादी म्हणून तीन निरपराध तरुणांना ठार मारल्याचा वहीम श्रीकांत आणि त्याच्या सहकाऱ्यांवर येतो. श्रीकांत या सगळ्याची जबाबदारी स्वीकारून झालेल्या चुकीचे प्रायश्‍चित्त घेण्याची तयारी दाखवतो. पूर्वीचे बॉस कुळकर्णी (दलीप ताहील) यांच्या मध्यस्थीमुळे श्रीकांतचे निलंबन टळून त्याची श्रीनगरला बदली केली जाते. इकडे हॉस्पिटलात दाखल असलेला मूसा बरा होतो. नर्सची सहानुभूती मिळवून दुसऱ्या वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या आसिफला तो रसायनाची अतिमात्रा देऊन ठार मारत हॉस्पिटलमधून फरार होतो. भारतात घातपात घडविण्याच्या मोठ्या कटाचा खरा सूत्रधार आसिफ नसून मूसा हाच आहे, हे लक्षात येताच चिडलेला श्रीकांत तिवारी या कटाची पाळेमुळे खणून काढण्याचा निर्धार करतो. त्यातूनच त्याला आयसिस आणि आयएसआय यांनी संयुक्तपणे आखलेल्या ‘मिशन जुल्फिकार’चा सुगावा लागतो. काय असते ‘मिशन जुल्फिकार’, त्याचं स्वरूप काय असतं, कोण असतो त्याचा सूत्रधार, हे मिशन रोखण्यात श्रीकांत तिवारी यशस्वी ठरतो का, मूसाचा ठावठिकाणा त्याला लागतो का, मूसा आपल्या आईला भेटू शकतो का, या सर्व गदारोळात श्रीकांत आणि सुचित्रा यांच्या वैयक्तिक जीवनात वादळ येतं, काय असतं ते वादळ, श्रीकांत-सुचित्राचा संसार टिकतो का... या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी दहा भागांची ही वेब मालिका पाहायलाच हवी. ४४० मिनिटांची ही वेब मालिका दहा भागांची आहे.

स्त्री, शोर इन द सिटी, नाइन्टी नाइन यांसारखे वेगळी कथाबीजे असलेले चित्रपट देणाऱ्या राज निदिमोरू आणि कृष्णा डीके या जोडगोळीने या वेब मालिकेवर आपला ठसा उमटवला आहे. उत्कृष्ट छायाचित्रण, त्याच्या जोडीला समर्पक पार्श्वसंगीत, चित्रीकरणाची ठिकाणं, प्रत्येक दृश्‍याची फ्रेम या सगळ्यांत दोघांनीही कसलीच कसूर ठेवलेली नाही. अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मनोज बाजपेयीने त्याच्या नेहमीच्या स्टाईलने श्रीकांतच्या व्यक्तिरेखेत जान ओतली आहे. एकीकडे आपल्या पती व मुलांवर निरतिशय प्रेम करणारी; परंतु करिअरलाही तेवढंच महत्त्व देणाऱ्या सुचित्राच्या भूमिकेला दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणीने पुरेपूर न्याय दिला आहे. या सर्व वेब मालिकेत खऱ्या अर्थाने भाव खाल्ला असेल तर तो मूसाच्या व्यक्तिरेखेने मल्याळी अभिनेता नीरज माधव ही व्यक्तिरेखा अक्षरशः जगला आहे. थंड डोक्‍याचा; परंतु तेवढाच क्रूर आणि आपल्या मिशनला ‘अंजाम’ देऊन गुजरात दंगलीचा बदला घेण्यासाठी उतावीळ झालेला, आपल्या अम्मीला आपलं खरं रूप समजू नये यासाठी तळमळणारा मूसा नीरजने अत्यंत संयतपणे उभा केला आहे. श्रीकांतचा ज्युनियर जेके तळपदे म्हणून वावरलेला शरीब हाश्‍मी खास लक्षात राहतो. झोया, पाशा (किशोर कुमार जी.), श्रीकांतचा ‘मेंटॉर’ कुळकर्णी (दलीप ताहील), साजिद (शहाब अली), सलोनी (गुल पनाग), मेजर समीर (दर्शन कुमार) यांनी त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News