पावसाळ्यात या भावना उद्भवतात

मयूरी चव्हाण-काकडे
Tuesday, 11 June 2019

गरमागरम मसालेदार पदार्थ, टपरीवरचा चहा, पावसाळी पिकनिक असे एक ना अनेक नियोजन तरुणाईने पाऊस येईल या आशेने करून ठेवले आहे. मात्र अद्याप तो आलाच नसल्याने पावसाची त्यांची प्रतीक्षा सुरू आहे. 

पावसाळ्याच्या आगमनास सर्वच उत्सुक असतात; परंतु विशेषत: तरुणाईचा उत्साह सळसळून वाहत असतो. पावसाळी पिकनिकचा आनंद कसा आणि कुठे लुटायचा, याचे नियोजन कॉलेज कट्ट्यापासून ते अगदी सोशल नेटवर्किंग वेबसाईट्‌सवरही सुरू असते. यंदा मात्र, वरुणराजा अद्याप प्रतीक्षाच करायला लावत, असल्याने तरुणाईच्या मनातले मनसोक्त भिजण्याचे स्वप्न लांबणीवर जात आहे. पावसात निसर्गाच्या सान्निध्यात मित्र-मैत्रिणींसोबत धमाल मजा करायला तरुणाईला आवडते. 

मुंबई ठाण्यातील तरुणाईला रोजच्या धकाधकीच्या जीवनातून दोन क्षण विसाव्याचे, आनंदाचे हवे असतात. त्यामुळेच पावसाच्या आगमनाची चाहूल लागताच येथील युवांचे पिकनिकचे असंख्य प्लॅन आणि त्यावर दीर्घ चर्चा रंगत असते. त्यात मुंबईचे हवामान उष्ण आणि दमट असल्याने उन्हाळ्यात जीव कासावीस झालेला असतो. पावसाळी पिकनिकच्या शिडकाव्याने मन ताजेतवाने, प्रसन्न होते. 

सिमेंटचे जंगल, कर्कश्‍श आवाज, प्रदूषण, ताणतणाव आणि नेहमीचीच दिनचर्या याला कंटाळलेल्या मुंबई-ठाणेकर तरुणाईला निसर्गाचा सहवास नेहमीच हवाहवासा वाटत असतो. झेनिथ आणि भगीरथ धबधबा, भुशी डॅम, माळशेज घाट, आशाणे-कोशाणे धबधबा असे स्पॉट मुंबई-ठाण्यातील युवांना पावसाळ्यात आकर्षित करत असतात. सुट्ट्या संपत आल्या; पण पावसानेच लांबच लांब सुट्टी घेतली असल्याने सध्या तरी तरुणाईचे प्लॅनिंग हे केवळ प्लॅनिंगच राहिले आहे.  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News