'ही' विद्यापीठे आहेत जगात अव्वल

प्रथमेश आडविलकर
Monday, 6 May 2019

२०१९ सालच्या क्‍यूएस वर्ल्ड आंतरराष्ट्रीय क्रमवारीनुसार जागतिक क्रमवारीतील पाच अग्रगण्य विद्यापीठांची ओळख गेल्या लेखामध्ये आपण करून घेतली. आजच्या लेखामध्ये पुढील पाच जागतिक विद्यापीठांबद्दल माहिती घेऊ.

केम्ब्रिज विद्यापीठ
२०१९ सालच्या क्‍यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंगनुसार केम्ब्रिज हे जगातले सहाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. १२०९ साली स्थापन झालेल्या विद्यापीठांपैकी जगातले चौथ्या क्रमांकाचे तर इंग्रजी भाषेमध्ये सर्व अभ्यासक्रम चालणाऱ्या विद्यापीठांपैकी दुसरे जुने विद्यापीठ असणारे विद्यापीठ म्हणजेच केम्ब्रिज विद्यापीठ होय. ऑक्‍सफर्डसारखीच या विद्यापीठालादेखील स्वतंत्र ओळखीची गरज नाही. ऑक्‍सफर्डमधील काही विद्वानांनी झालेल्या तत्कालीन वादामुळे बाहेर पडून स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले, ते विद्यापीठ म्हणजेच केम्ब्रिज. इंग्लंडमध्ये असलेल्या ऑक्‍सफर्ड आणि केम्ब्रिज या दोन्ही प्राचीन विद्यापीठांमध्ये कित्येक समान धागे आहेत. म्हणूनच अनेकदा या दोन्ही विद्यापीठांना ‘ऑक्‍सब्रिज’ असे संबोधण्यात येते. केम्ब्रिज हे शासकीय विद्यापीठ आहे. साहित्य व इंग्रही भाषा यासाठी जसे ऑक्‍सफर्डला ओळखले जाते; तसेच विज्ञान व तंत्रज्ञान यासाठी केम्ब्रिज विद्यापीठ ओळखले जाते आणि म्हणूनच जगभरातील महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये केम्ब्रिजला समाविष्ट करण्यात आले आहे. ‘फ्रॉम हिअर लाईट ॲण्ड सेक्रेड ड्रॉट्‌स’ हे केम्ब्रिज विद्यापीठाचे ब्रीदवाक्‍य आहे. केम्ब्रिज विद्यापीठ ३१ घटक महाविद्यालये आणि सहा प्रमुख शैक्षणिक विभाग मिळून बनलेले आहे. विद्यापीठातील ही सर्व महाविद्यालये स्वयं-शासित असून प्रत्येक महाविद्यालय स्वत:च्या अंतर्गत शैक्षणिक व संशोधन रचना नियंत्रित करते. इंग्लंडमध्ये असलेला केम्ब्रिज युनिव्हर्सिटी टाऊन हा विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस साधारणपणे सातशे एकर परिसरात पसरलेला आहे. याशिवाय इतर कॅम्पसमध्येदेखील, विद्यापीठाचे प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग, महाविद्यालये, निवासी व्यवस्था इत्यादी गोष्टी आहेत. सध्या केम्ब्रिजमध्ये जवळपास आठ हजार तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून जवळपास वीस हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत.

स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (ईटीएच झुरिक)  
स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी अर्थात ईटीएच झुरिक हे स्वित्झर्लंडमधील विज्ञान-तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांमध्ये संशोधन-अध्यापन करणारे एक प्रथितयश विद्यापीठ आहे. २०१९ सालच्या क्‍यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंगनुसार ईटीएच झुरिक हे जगातले सातव्या क्रमांकाचे तर युरोप खंडातील तिसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील जगातील अग्रगण्य विद्यापीठांमध्ये ईटीएच झुरिक या विद्यापीठाचा समावेश आहे. ईटीएच झुरिक त्याच्या अत्याधुनिक संशोधन आणि व त्यातील अभिनव कल्पनांसाठी सर्वत्र ज्ञात आहे. १८५४ मध्ये स्विस फेडरल पॉलिटेक्‍निक स्कूल म्हणून स्थापना झालेल्या संस्थेचे रूपांतर कालांतराने विद्यापीठामध्ये झाले. ईटीएच झुरिक हे स्वित्झर्लंडमधील सर्वांत प्रतिष्ठित आणि अग्रगण्य विद्यापीठ आहे. ईटीएच झुरिक विद्यापीठ एकूण दोन कॅम्पसमध्ये विभागले गेले आहे. यामध्ये झुरिक झेन्त्रम परिसरातील मुख्य वास्तू व हाँगर्बर्ग परिसराचा समावेश आहे. विद्यापीठाच्या १५० व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने हाँगर्बर्ग परिसरात ‘सायन्स सिटी’ या प्रमुख प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्यात आले. विद्यापीठाच्या या कॅम्पसमध्ये प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग, कार्यालये, सायन्स सिटी, ईटीएच लॅबोरेटरी ऑफ आयन बीम फिजिक्‍स, ग्रंथालय यांसारखे महत्त्वाचे विभाग वा स्कूल्स आहेत. आज ईटीएच झुरिकमध्ये सुमारे साडेसहा हजारच्या आसपास एवढा प्राध्यापक-संशोधकवर्ग आपले अध्यापन-
संशोधनाचे कार्य करत असून, जवळपास दहा हजार पदवीधर तर सहा हजारांहून अधिक पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत.

इम्पिरियल कॉलेज 
इंग्लंडमधील लंडन येथे स्थित असलेले इम्पिरियल कॉलेज ऑफ सायन्स, टेक्‍नॉलॉजी ॲण्ड मेडिसिन हे एक शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ ‘इम्पिरियल कॉलेज’ या नावाने सर्वत्र ओळखले जाते. या विद्यापीठाची स्थापना १९०७ साली झाली आहे. २०१९ सालच्या क्‍यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंगनुसार इम्पिरियल कॉलेज हे जगातले आठव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. १८५१ मध्ये प्रिन्स अल्बर्टने ‘व्हिक्‍टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियम’, ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’, ‘रॉयल अल्बर्ट हॉल’, ‘रॉयल कॉलेज’ आणि ‘इम्पिरियल इन्स्टिट्यूट’ या सर्व छोट्या संस्थांना एकत्रित आणून एक मोठे सांस्कृतिक केंद्र तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार मग १९०७ मध्ये रॉयल चार्टरच्या माध्यमातून रॉयल कॉलेज, रॉयल स्कूल ऑफ माईन्स आणि सिटी ॲण्ड गिल्डस्‌ कॉलेज व इतर काही संस्थांना एकत्र आणून इम्पिरियल कॉलेजची स्थापना केली गेली. तीस वर्षांपूर्वी १९८८ मध्ये इम्पिरियल कॉलेज स्कूल ऑफ मेडिसिनची स्थापना सेंट मेरीज हॉस्पिटल मेडिकल स्कूलमध्ये विलीनीकरणाद्वारे करण्यात आली. अलीकडे २००४ मध्ये, राणी एलिझाबेथ यांच्या पुढाकाराने इम्पिरियल कॉलेज बिझिनेस स्कूलची स्थापना झाली. इम्पिरियल कॉलेज हे मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवसाय अभ्यासक्रमाचे शिक्षण विद्यार्थ्यांना देते. तरीही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या व्यावहारिक वापरावर विद्यापीठाचा भर अधिक आहे. ‘सायंटिफिक नॉलेज-द क्राऊनिंग ग्लोरी ॲण्ड द सेफगार्ड ऑफ द एम्पायर’ हे इम्पिरियल कॉलेज विद्यापीठाचे ब्रीदवाक्‍य विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे. विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस दक्षिण केन्सिंग्टनमध्ये स्थित आहे तर व्हाईट सिटीमध्ये विद्यापीठाचा नूतनीकरण केलेला नवीन परिसर आहे. इम्पिरियल कॉलेजचे सील्वूड पार्क येथे संशोधन केंद्र आहे तर लंडनमधील हॉस्पिटल्स व आरोग्य केंद्रांमधून वैद्यकीय शिक्षणासाठी सहाय्य घेतले जाते. विद्यापीठाच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी जवळपास साठ टक्के विद्यार्थी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहेत आणि ते जगभरातील एकूण १५० पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधित्व या एकाच कॅम्पसमध्ये करतात. कॅम्पसमध्ये विद्यापीठाचे प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग आणि निवासी व्यवस्था आहेत. सध्या इम्पिरियल कॉलेजमध्ये जवळपास चार हजार तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून, जवळपास अठरा हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत.

शिकागो विद्यापीठ 
यू शिकागो किंवा यू ऑफ सी या नावाने सर्वत्र परिचित असलेले आणि अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील शिकागो या शहरात वसलेले शिकागो विद्यापीठ हे क्‍यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंगनुसार जगातले नवव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. तत्कालीन अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक जॉन रॉकफेलर यांच्या पुढाकाराने या विद्यापीठाची स्थापना १८९० साली झाली. शिकागो विद्यापीठाचे अर्थशास्त्र व व्यवसाय शिक्षण विभाग हे जगातील नामांकित शैक्षणिक केंद्र असून, जागतिक अर्थकारणावर असलेल्या त्याच्या प्रभावामुळे शिकागो हे जगातील सर्वांत प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक आहे. शिकागो विद्यापीठ हे खासगी मात्र ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालणारे संशोधन विद्यापीठ आहे. ‘लेट नॉलेज ग्रो फ्रॉम मोअर टू मोअर ॲण्ड सो बी ह्युमन लाइफ एनरिच्ड’ हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्‍य आहे. शिकागो विद्यापीठ एकूण २१७ एकरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे. विद्यापीठाच्या या कॅम्पसमध्ये विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पाच शैक्षणिक संशोधन विभाग आणि सात व्यावसायिक विभागांद्वारे चालतात. आज शिकागोमध्ये सुमारे तीन हजार प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून, जवळपास पंधरा हजारांहून अधिक पदवी-पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत.

युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन 
२०१९ सालच्या क्‍यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंगनुसार जगातल्या दहाव्या क्रमांकाचे असलेले विद्यापीठ म्हणजे युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन. अठराव्या शतकातील ग्रेट ब्रिटनमधील विचारवंत व समाजसुधारक जेरेमी बेंथहॅम यांच्या विचारांनी प्रवृत्त होऊन या विद्यापीठाची स्थापना १८२६ साली करण्यात आली. तत्कालीन इंग्लंडमध्ये महिलांना शिक्षणासाठी विद्यापीठांमध्ये प्रवेश नाकारला जात असे. इंग्लंडमधील महिलांसाठी यूसीएल विद्यापीठाने सर्वप्रथम शिक्षणाचे द्वार खुले केले. स्थापनेवेळी विद्यापीठाचे नाव ‘लंडन युनिव्हर्सिटी’ असे होते. नंतर ते ‘युनिव्हर्सिटी कॉलेज’ असे करण्यात आले. १९७७ मध्ये विद्यापीठास सध्याचे नाव बहाल करण्यात आले.

यूसीएल विद्यापीठ हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. ‘लेट ऑल कम हू बाय मेरिट डिझर्व्ह द मोस्ट रिवार्ड’ हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्‍य आहे. लंडनच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या ब्लुम्स्बेरी परिसरात यूसीएल विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस आहे. तसेच शहरात इतर ठिकाणी विद्यापीठाचे प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग, महाविद्यालये आणि शैक्षणिक रुग्णालये इत्यादी गोष्टी पसरलेल्या आहेत. सध्या यूसीएलमध्ये सात हजारपेक्षाही अधिक तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून, जवळपास चाळीस हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम ११ शैक्षणिक-संशोधन विभागांद्वारे चालतात.
itsprathamesh@gmail.com

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News