शहीद जवानांच्या वीरपत्नींना ठाणे महापालिकेचा सलाम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 June 2019
  • शहीद कुटुंबीयांच्या पाठीशी उभी राहणारी ठाणे महापालिका देशातील पहिली

ठाणे : जम्मू-काश्‍मीर येथील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील संजय भिकमसिंग राजपूत व नितीन शिवाजी राठोड यांच्या कुटुंबीयांना शुक्रवारी (ता.१४) ठाणे महापालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांच्या एक महिन्याच्या मानधनाची प्रत्येकी दहा लाख रुपयांची रक्कम पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.

या वेळी शहीद जवान संजय भिकमसिंग राजपूत यांच्या वीरपत्नी सुषमाबाई राजपूत व शहीद जवान नितीन शिवाजी राठोड यांच्या वीरपत्नी वंदना नितीन राठोड व वीरमाता सावित्रीबाई राठोड यांनी धनादेश स्वीकारले. आज शहीदांच्या प्रती कृतज्ञता म्हणून जो पुढाकार घेतला आहे, तो निश्‍चितच प्रेरणादायी आहे. आज संपूर्ण देशभरामध्ये शहिदांप्रती आत्मीयतेने पुढे येणारी ठाणे ही देशातील पहिली महापालिका आहे, असे सुतोवाच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

प्रत्येक सदस्याचे एक महिन्याचे १५ हजार रुपये मानधन याप्रमाणे १३१ नगरसेवक व ४ स्वीकृत नगरसेवक अशा १३५ नगरसेवकांच्या मानधनाची एकूण २० लाख २५ हजार इतकी रक्कम जमा झाली होती. ही रक्कम शहीद जवानांच्या कायदेशीर वारसदारास प्रत्येकी १० लाख १२ हजार ५०० याप्रमाणे पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाच्या माध्यमातून देण्यात आली.

देशसेवेत कार्यरत असताना काही वेळेला अनेक जवानांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागते. त्यांचे बलिदान आपल्याला विसरून चालणार नाही. शहीद जवानांच्या कुटुंबीयांबरोबर सदैव राहणे, हे आपले कर्तव्यच आहे व भविष्यातदेखील या कुटुंबीयांना आपले सहकार्य मिळत राहील, अशी ग्वाही शिंदे यांनी या वेळी दिली.

या वेळी महापौर मीनाक्षी शिंदे, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृहनेते नरेश म्हस्के, भाजप गटनेते नारायण पवार; तसेच सर्वपक्षीय नगरसेवक व महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News