ठाणे जिल्हयात युतीसमोर आघाडीला घामच! 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 5 August 2019
  • शहरी आणि ग्रामीण भागांत युतीचे बळ वाढले
  • डोंबिवलीत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा मार्ग सुकर
  • तुलनेने युतीची स्थिती बळकट आहे

नेतृत्वाची कमतरता, परिणामी कार्यकर्त्यांचा घटलेला संच, भाजप आणि शिवसेनेचे लोकसभा निवडणुकीवेळी वाढलेले बळ, यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उमेदवार निवडीपासून ते प्रचारयंत्रणा राबवण्यापर्यंत अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. तुलनेने युतीची स्थिती बळकट आहे. 

२०१४ च्या विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढूनही ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांपैकी भाजपचे सात आणि शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले होते. राष्ट्रवादीला चार जागांवर समाधान मानावे लागले, तर एका अपक्षाने मोदी लाटेतही बाजी मारली होती. काही महिन्यांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीतील गणिते पाहता शहरी आणि ग्रामीण भागांत युतीचे बळ वाढले आहे. अशातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे जिल्हास्तरावरील नेतृत्वाची वानवा असल्याने युतीला टक्कर देताना आघाडीच्या उमेदवारांना निश्‍चितच घाम फुटेल, अशी स्थिती आहे. 

जिल्ह्यात शिवसेनेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे एकहाती किल्ला लढवत आहेत; तर भाजपकडे खासदार कपिल पाटील जिल्हा स्तरावरील हुकमी एक्का मानला जातो. त्या तुलनेत काँग्रेसकडे एकही नेता नाही. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचा प्रभावही मर्यादीत आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील आमदार संदीप नाईक यांनी भाजपची वाट धरली आहे. राष्ट्रवादीचे ५७ नगरसेवकही त्याच वाटेने जातील, असे दिसते. त्यामुळे गणेश नाईक राष्ट्रवादीमध्ये किती दिवस राहतील, याबाबत साशंकता आहे. आव्हाड यांचा कळवा-मुंब्रा व्यतिरिक्त आघाडीच्या दृष्टिक्षेपात एकही मतदारसंघ दिसत नाही. 
ठाणे मतदारसंघात भाजपचे आमदार संजय केळकर यांनी २०१४ मध्ये शिवसेनेचे रवींद्र फाटक यांचा पराभव केला होता. त्यामुळे यंदा जागावाटपात वादाची शक्‍यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीला मात्र येथे उमेदवार शोधावा लागेल. ओवळा माजिवडामध्ये शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश यंदा रिंगणात उतरणार आहेत. राष्ट्रवादीकडून हणमंत जगदाळे यांचे नाव चर्चेत आहे; मात्र त्यांनी अनुत्सुकता दाखवल्याचे कळते. कोपरी पाचपाखाडी हा शिवसेनेसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्याचे नेतृत्व एकनाथ शिंदे करतात. त्यांच्यासमोर उमेदवार देतानाच आघाडीची दमछाक होणार आहे. मीरा-भाईंदरमध्ये मोजक्‍या पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलून आमदार नरेंद्र मेहता यांनाच भाजपची उमेदवारी दिली जाईल. येथे हिंदी भाषकांचे प्राबल्य असल्याने आघाडीतील नेत्यांच्या डोकेदुखीत भर पडणार आहे. ऐरोली आणि बेलापूर गणेश नाईकांचा बालेकिल्ला होता. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत त्यांचा विधानसभेत पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत तर शिवसेनेच्या राजन विचारे यांना येथे ५० हजारांवर मताधिक्‍य मिळाले. 

भिवंडी पूर्व, पश्‍चिम किंवा ग्रामीण मतदारसंघात जातीय समीकरणांवर राजकारण फिरते. पूर्वेत शिवसेनेचे रूपेश म्हात्रे, पश्‍चिमेला भाजपचे महेश चौगुले; तर ग्रामीणमध्ये शिवसेनेचे शांताराम मोरे आमदार आहेत. अबू आझमी यांचे पुत्र फरहान आझमी यांनी पूर्वेत म्हात्रेंना टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता. पण यश मिळाले नाही. त्यामुळे यंदाही युतीपुढे आघाडीला लढाई कठीणच दिसते. कल्याण ग्रामीणमध्ये सुभाष भोईर यांच्या लोकसभेतील कामाबाबत नाराजी असल्याने शिवसेनेकडून उमेदवार बदलण्याची शक्‍यता आहे. येथे मनसेकडून त्यांना कडवी झुंज दिली जाण्याची शक्‍यता आहे. कल्याण पूर्वेत मागील निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांचा अपक्ष गणपत गायकवाड यांनी पराभव केला होता. यंदाही येथे कडवी झुंज होऊ शकते. युतीमुळे डोंबिवलीत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा मार्ग सुकर झाला आहे. कल्याण पश्‍चिममधून आमदार नरेंद्र पवार यांनाच भाजपकडून पुन्हा संधी मिळेल. त्यांच्यासमोर मनसेचे आव्हान असेल. येथे शिवसेनेला अंतर्गत नाराजी त्रासदायक ठरू शकते. अंबरनाथमधून शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर यांनाच पुन्हा संधीची शक्‍यता आहे. इथे आघाडीचे महेश तपासे रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जाते.

उल्हासनगरमधून राष्ट्रवादीच्या आमदार ज्योती कलानी यांचे पुत्र भाजपकडून रिंगणात उतरण्याची शक्‍यता असल्याने, आघाडीला उमेदवाराची चणचण भासेल. शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुंरग बरोरा यांनी नुकतेच हातावर ‘शिवबंधन’ बांधले. त्यांच्या प्रवेशानंतर शिवसैनिकांमध्ये नाराजी व्यक्त केली असली, तरी बरोरा हेच शिवसेनेचे उमेदवार असतील. त्यांच्यासमोर काँग्रेसचे पद्माकर केवारी लढत देण्याची शक्‍यता आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News