बेळगावात बसच्या पाससाठी झूंबड, पण पासचा पत्ताच नाही...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019
  • तीस हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ
  • बेळगाव परिवहन विभागातील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांना या नव्या आदेशाचा लाभ होणार आहे.

बेळगाव -  परिवहन महामंडळातर्फे यंदा बस पास वितरण करण्यासाठी ३० जून उजाडणार आहे. या प्रक्रियेला महिना शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांना जुन्याच बसपासवर प्रवास करता येणार आहे. त्यानुसार बेळगाव परिवहन विभागातील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांना या नव्या आदेशाचा लाभ होणार आहे.

जुने बसपास असलेल्या विद्यार्थ्यांना महिनाभराची सूट देण्यात आली आहे; मात्र अकरावी किंवा इतर वर्गात प्रवेश घेतलेल्या तसेच जुना पास नसलेल्या विद्यार्थ्यांना तिकीट घेऊन प्रवास करावा लागणार आहे. यासंबंधी परिवहन महामंडळाने आदेश देईपर्यंत व त्यांना नवीन बसपास मिळेपर्यंत आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. गतवर्षी परिवहन महामंडळातर्फे ५० हजारांहून अधिक बसपासचे वितरण झाले होते. यंदाही इतक्‍या बसपासचे वितरण करण्याचे परिवहन महामंडळाचे उद्दिष्ट असणार आहे. यंदाही शाळांतूनच बसपास असणार.  दरवर्षीप्रमाणे यंदाही परिवहन महामंडळातर्फे शाळांतूनच बसपास उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
 

यासाठी शाळांमधून अर्ज करण्याच्या सूचना परिवहन महामंडळाने दिल्या आहेत.शहरातील महाविद्यालये २० मेपासून सुरू झाली आहेत. तसेच प्राथमिक, माध्यमिक शाळा २९ मेपासून सुरू झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थी पैसे देऊनच शाळा, महाविद्यालयांत येत होते. मात्र, आज (ता. ४) पासून हा आर्थिक भुर्दंड थांबला आहे. अकरावीसह इतर वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही यातून सवलत देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, बसपासचे छापील कागद नसल्याने यंदा बसपास वितरणास विलंब होणार आहे. विद्यार्थ्यांच्या हातात बसपास येईपर्यंत ३० जून उजाडणार असल्याने जुन्या बसपासची मुदत वाढविली आहे. जुन्या बसपासबरोबर यंदा शाळा, महाविद्यालयांत प्रवेश घेतलेली शुल्क पावती व शाळेचे ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे.

यंदा ३० जूनपर्यंत विद्यार्थ्यांचा जुना पास चालणार आहे. शाळेत नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारचा आदेश येईपर्यंत तिकिटावरच प्रवास करावा लागणार आहे. जुन्या बसपासचा लाभ तीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना होईल. - एम. आर. मुंजी, विभागीय नियंत्रणाधिकारी, परिवहन महामंडळ.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News