अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मदतीसाठी ‘दहा बाय दहा’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 June 2019
  • लातूरच्या जानाई प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम 
     

लातूर -  येथील श्री जानाई प्रतिष्ठान विद्यार्थी मंडळाच्या वतीने अभियांत्रिकीच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘दहा बाय दहा’ नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाटकातून मिळणाऱ्या निधीतून गरीब विद्यार्थ्यांची अभियांत्रिकीच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च केला जाणार आहे. येथील श्री जानाई प्रतिष्ठानचा हा १९ वा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. जानाई प्रतिष्ठानने मागील १८ वर्षांत १८ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. यातून जमा झालेल्या निधीतून गरजू, हुशार, होतकरू १२५ विद्यार्थ्यांनी आपले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आहे व ते अभियंते झाले आहेत.

यावर्षी देखील या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. या निधीतून गरीब विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकीच्या शिक्षणाची सोय केली जाणार आहे. हे नाटक ता. तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता बाजार समितीच्या सभागृहात होणार आहे. या नाटकात विनोदी सिने कलाकार विजय पाटकर, सुप्रिया पाठारे, प्रथमेश परब यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘दहा बाय दहा’ हे कौटुंबिक विनोदी नाटक आहे. प्रतिष्ठानच्या एका शिष्टमंडळाने पुण्यात जाऊन नाटकाचे कलाकार विजय पाटकर, सुप्रिया पाठारे, प्रथमेश परब, विदिशा म्हसकर, आमीर तडवळकर, गौरव मालवणकर यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाचे डॉ. अभिजित मुगळीकर यांनी नेतृत्व केले. कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन श्री जानाई प्रतिष्ठान संस्थेची माहिती दिले. सर्व कलावंतांनी श्री.जानाई प्रतिष्ठानचे माहिती ऐकून नाटकाचे आमंत्रण स्वीकारले आहे.

यावेळी संस्थापक अध्यक्ष अतुल ठोंबरे, सचिव डॉ.पंकज तेरकर, जानाई विद्यार्थी मंडळाची अध्यक्ष कांचन इस्लामपुरे, भिकाजी पाटील, अक्षय कुलकर्णी, अमृता कदम, चैतन्य सारंग, प्रणव प्रयाग, प्रियांका पांचाळ, गौरी ठोंबरे, ज्ञानोबा कुलकर्णी उपस्थित होते. या नाटकाचा जास्ती जास्त रसिकांनी लाभ घेऊन या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष डॉ.अभिजित मुगळीकर, कार्याध्यक्ष राजेश मित्तल, सचिव डॉ.पंकज तेरकर यांनी केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News