शासकीय वैद्यकीय रुग्णालयासाठी दहा डायलिसीस मशीन मंजूर

समीर मगरे
Wednesday, 17 July 2019
  • मेड इन जर्मनी कंपनीची ही डायलिसीस मशीन असून एका मशीनची किंमत 5 लक्ष 54 हजार 400 रुपये आहे.
  • यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 55 लक्ष 44 हजार रुपयांत या दहा मशीन लावण्यात येणार आहे.
  • पुरवठादार कंपनीने 12 आठवड्यांच्या आत या मशीनचा पुरवठा वैद्यकीय महाविद्यालयात करायचा आहे.

यवतमाळ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात किडनीच्या आजारासाठी आवश्यक असलेला डायलिसीस मशीनचा प्रश्न निकाली निघाला आहे. तीन महिन्यापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन डायलिसीस मशीन लावण्यात आल्या होत्या. आता या रुग्णालयासाठी दहा मशीन मंजूर झाल्या असून पालकमंत्री मदन येरावार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील किडनीच्या आजाराच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डायलिसीस मशीनची मागणी गत वीस वर्षांपासून प्रलंबित होती. जिल्ह्यातील किडनीच्या आजाराचे रुग्ण सावंगी, सेवाग्राम, अमरावती आणि नागपूर येथे डायलिसीसकरीता जात होते. यात रुग्णांना आर्थिक भुर्दंड पडत होता. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी 2018 – 19 मध्ये जिल्हा नियोजन समितीमधून दहा डायलिसीस मशीनकरीता निधी उपलब्ध करून दिला. यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सदर प्रस्ताव शासनाकडे तसेच हापकिन इन्स्टिट्युटकडे सादर केला. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अखेर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी हापकिन बायो फार्माक्युटीकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडने यवतमाळ जिल्ह्यासाठी दहा डायलिसीस मशीन मंजूर केल्या. याबाबत हापकिनचे व्यवस्थापकीस संचालक डॉ. राजेश देशमुख यांनी दि.16 जुलै रोजी दिल्ली येथील फ्रेसिनिअस मेडीकल केअर इंडिया प्रा. लिमिटेड यांना मशीन पुरवठा करण्याबाबत वर्क ऑर्डर दिली. 

मेड इन जर्मनी कंपनीची ही डायलिसीस मशीन असून एका मशीनची किंमत 5 लक्ष 54 हजार 400 रुपये आहे. यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 55 लक्ष 44 हजार रुपयांत या दहा मशीन लावण्यात येणार आहे. पुरवठादार कंपनीने 12 आठवड्यांच्या आत या मशीनचा पुरवठा वैद्यकीय महाविद्यालयात करायचा आहे. सद्यस्थितीत येथे कार्यरत असलेल्या दोन मशीनद्वारे दिवसाला चार ते पाच किडनी आजारग्रस्त रुग्णांचे डायलिसीस करण्यात येते. डायलिसीसकरीता दोन प्रकारचे रुग्ण येत असून नवीन डायलिसीस करणारे आणि जे सुरवातीपासून डायलिसीसवर आहेत, अशा रुग्णांचा यात समावेश आहे. जुन्या रुग्णांना डायलिसीसकरीता आठवड्यातून दोन-तीन वेळा यावे लागते. त्यामुळे दोन मशीन अपु-या पडत होत्या. आता दहा मशीन मंजूर झाल्यामुळे दिवसाला किमान 20 ते 25 रुग्णांचे डायलिसीस करता येईल. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्पेशल डायलिसीस युनीट तयार करण्यात आले आहे. तसेच त्यासाठी वेगळा स्टाफ ठेवण्यात आला आहे. 

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना डायलिसीसची सुविधा पुर्णपणे मोफत आहे. तर इतरांना शासनाच्या नियमाप्रमाणे अत्यल्प दरात ही सुविधा देण्यात येते. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सदर युनिटचा समावेश झाला तर या योजनेच्या लाभार्थ्यांना ही सुविधा मोफत उपलब्ध होईल. 

जिल्हा रुग्णालय सर्वोतोपरी सुसज्ज करण्याला प्राधान्य : पालकमंत्री मदन येरावार जिल्ह्यातील किडनीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना यापूर्वी खाजगी रुग्णालयात डायलिसीस करावे लागत होते. यासाठी रुग्णांना आर्थिक भुर्दंड पडत होता. त्यामुळे तात्काळ नियोजन समितीतून डायलिसीस युनिटकरीता निधी मंजूर केला. यापूर्वी दोन मशीन लावण्यात आल्या असून आता दहा मशीनमुळे जिल्ह्यातील रुग्णांना त्याचा लाभ होईल. एवढेच नव्हे तर शिर्डी येथील साई संस्थानने जिल्हा रुग्णालयासाठी मंजूर केलेल्या 13 कोटींच्या एमआरआय मशीकरीता खनीज विकास निधीतून अतिरिक्त 1 कोटी 31 लक्ष रुपये देण्यात आले आहे. आता कोणत्याही रुग्णाला बाहेर जावे लागणार नाही. रुग्णांच्या सेवेकरीता येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय अत्याधुनिक व सुसज्ज करण्याला आपले प्राधान्य आहे. त्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू, असे पालकमंत्री म्हणाले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News