सोलापूरात थकलेल्या अंध आजोबांना युवकाने दिला आधार

परशुराम कोकणे
Wednesday, 15 May 2019
  • 85 वर्षीय अंध आजोबाला युवकाने दिला मदतीचा हात 
  • पत्ता शोधून नेवून सोडले घरी 
  • देखभाल करण्यासाठी कोणीच नाही

सोलापूर - थकलेल्या शरीराने तळपत्या उन्हात रस्त्यावर पडलेल्या 85 वर्षीय अंध आजोबाला युवकाने मदतीचा हात दिला. घराचा पत्ता शोधला, पण घरी देखभाल करण्यास कोणीच नसल्याने बाळीवेस परिसरातील श्री मल्लिकार्जुन मंदिरात त्यांना सोडले. 

सामाजिक कार्यकर्ता हर्षल प्रधाने हे मंगळवारी सकाळी घरातून निघाले. सकाळी अकराच्या सुमारास सरस्वती चौकात 85 वर्षाचे विश्‍वनाथ आहेरवाडी (रा. बाळीवेस परिसर, सोलापूर) हे उन्हात पडून होते. आजोबांना पाहताच हर्षल यांनी आपली कार थांबविली. जवळ जाऊन त्यांची विचारपूस केली. "बाळा मी दोन्ही डोळ्यांनी अंध आहे असे सांगून त्यांनी पाणी मागितले.

पाणी दिल्यानंतर हर्षल यांनी आजोबांना कारमध्ये बसवले. प्राथमिक चौकशी केली. त्यांना 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे, पण ते आजोबांना संभाळत नसल्याचे समजले. आजोबांची कहाणी ऐकून हर्षल यांचे मन सुन्न झाले. 

हर्षल यांनी स्माईल प्लस फाउंडेशनचे योगेश मालखरे यांच्याशी संपर्क केला. सर्व घटना सांगितली. मालखरे यांनी जवळच्या पोलिस ठाण्यात जावून मदत घेण्याचे सुचविले. फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गेल्यानंतर हर्षल यांना मदत मिळण्याऐवजी दुसऱ्याच प्रश्नांना सामोरे जावे लागले. त्यामुळे ते आजोबांना घेऊन तेथून निघाले. हॉटेलमध्ये नेवून जेवण खाऊ घातले.

थोड्यावेळाने परत मालखरे यांचा फोन आला. मालखरे यांनी "सकाळ'च्या प्रतिनिधीची भेट घेण्यास सुचविले. त्यानंतर काही वेळातच आजोबांचा पत्ता शोधून काढला. अंध आजोबांनी बॅंकेत घेवून जाण्याचा आग्रह केला. हर्षल यांनी आजोबांना बॅंकेत नेले. तिथे पेन्शनचे एक हजार रुपये काढून आजोबांना दिले. त्यानंतर आजोबांना बाळीवेस येथील घरी नेले. घरी कोणीच नसल्याने शेजाऱ्यांना सांगून आजोबांना मल्लीकार्जुन मंदिरात सोडले.

आजोंबाना घराकडे नेवून सोडले खरे पण या घटनेने मन अवस्थ झाले आहे. त्यांना दोन मुले व परिवार असूनही या अवस्थेत भटकावे लागत आहे. त्यांची देखभाल करण्यासाठी कोणीच नाही. माझ्यापरीने जमेल तेवढी मदत मी केली आहे. अशा निराधारांचा सांभाळ करण्यासाठी शासनाकडून व्यवस्था असणे आवश्‍यक आहे. 
हर्षल प्रधाने, सामाजिक कार्यकर्ता

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News