शिकवण

माधुरी दातार
Tuesday, 13 August 2019

परदेशात राहणाऱ्या आपल्या मुलाला उद्देशून आईने लिहिलेली कविता...

 

आठवतंय मला
खूप लहान होतास तू
तेंव्हा शाळेत जाताना
तुझं दप्तर तुलाच
घ्यायला लावत असे मी
स्वतःचं ओझं स्वतःचं
उचलण्याची सवय लागावी म्हणून

काही वर्ष अभ्यास घेतल्यानंतर
तुला शिकवलं मी
आपला आपण अभ्यास 
कसा करायचा ते
दुसऱ्यांवर अवलंबून राहु 
नये म्हणून

आंघोळ करणं , जेवण करणं
शाळेत जाणं , मित्र निवडणं
चांगलं काय वाईट काय
सारं सारं मी सांगितलं
अन् ऐकत गेलास तू
माझ्यावर खूप विश्वास म्हणून
अणि मुळातच तू समजुतदार म्हणून

एकदा बाहेर गेले मी कामासाठी
तुला घरी ठेवून 
रडून आकांत केलास तू माझ्यासाठी
मी आल्यावर रागावले तुला
माझ्याशिवाय राहता यायला हवं तुला
शिकायला हवं तुला हे सारं

तू शिकलास रे सगळ
खूप मोठा झालास तू 
एकटा राहायला लागलास
स्वतः चे प्रश्न सोडवायला लागलास
मी मात्र आज संभ्रमात सापडले आहे
तुझ्याशिवाय कसं राहायचं
हे मला कोणीतरी शिकवायला हवंय

 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News