शिक्षक आंदोलनात; शाळांत शुकशुकाट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 10 July 2019
  • विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा संप; जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा 

बेळगाव - अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे पुकारलेल्या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला. मंगळवारी  शहर आणि जिल्ह्यातील सर्व सरकारी प्राथमिक शाळा बंद राहिल्या. त्यामुळे नेहमी गजबजणाऱ्या शाळांच्या आवारात शुकशुकाट पाहावयास मिळाला. तर संपावर असलेले शिक्षक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले.

शिक्षक संपावर जाणार असल्यामुळे शाळा बंद राहणार असल्याची माहिती सोमवारीच देण्यात आली होती. बेळगाव शहर आणि तालुक्‍यातील शिक्षक मोर्चात सहभागी होण्यासाठी महात्मा गांधी भवन येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
या ठिकाणी शिक्षकांना मार्गदर्शन करताना प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार हेबळी यांनी, शिक्षकांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात यासाठी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे अनेकदा शिक्षणमंत्री व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. तसेच अनेकदा आंदोलन करण्यात आले. मात्र, सातत्याने सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळांचे शिक्षक सहभागी झाले असून शिक्षकांची ऐकी दिसून आली आहे. यापुढेही संघटीतपणे लढा देऊन आपल्या मागण्या मान्य करुन घेऊया, असे मत व्यक्‍त केले. शहराध्यक्ष एम. जी. पाटील, सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगदीश पाटील यांनीही शिक्षकांना मार्गदर्शन केले.

दुपारी १२ वाजता गांधी भवन येथून शिक्षकांच्या मोर्चाला सुरुवात झाली. कॉलेज रोड, चन्नम्मा सर्कलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शिक्षकांनी मोर्चा काढला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. शिक्षण खात्याने २०१४ पूर्वी भरती झालेल्या शिक्षकांना इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शिकविण्याचे बंधनकारक केले आहे. हा नियम शिक्षकांवर अन्याय करणारा असून शिक्षण खात्याच्या नव्या नियमामुळे बीए, बीएड केलेल्या अनेक शिक्षकांना बढतीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे पहिली ते पाचवीपर्यंतची अट रद्द करावी, सरकारी शाळांमध्ये एलकेजी, युकेजी सुरु करावी, सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना बढती देण्यात यावी, मुख्याध्यापकांना १५, २०, २५ व ३० वर्षाने बढती देण्यात यावी, नवीन निवृत्ती योजना रद्द करावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या. जिल्हाधिकारी एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी निवेदनाचा स्वीकार केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News