दांपत्य घेताहेत "वन स्टॉप'

विशाल पाटील
Thursday, 11 July 2019
  • कुटुंब नियोजनावर भर; युवा पिढीची सकारात्मक पावले पडती पुढे 

सातारा - "अष्टपुत्र भव..' असा एकेकाळचा आशीर्वाद आज जर कोणी दिला, तर त्या व्यक्‍तीकडे आश्‍चर्याने पाहिले जाते. बदलत्या काळात कुटुंब नियोजनाला महत्त्व आले आहे. शैक्षणिकदृष्ट्या साक्षर झालेल्या साताऱ्यात गत आर्थिक वर्षात तब्बल 17 हजार 303 दापंत्यांनी एका अपत्यावरच थांबणे पसंत केले आहे. 
भारतीय समाज हा बहुपुत्र संस्कृतीतून पुढे आला आहे. घरात भावंडांची संख्याही खूप असायची. त्यामुळे बहिणी, भावंडे मिळून काही कुटुंबांनी दोन आकडी संख्याही गाठलेली असते. सध्याही अशी अनेक कुटुंबे पाहण्यास मिळत आहेत. मात्र, बदलत्या आर्थिक, शैक्षणिक, भौतिक परिस्थितीमुळे ही स्थिती झपाट्याने बदलली आहे. "मुलगी झाली होय...' पहिल्याच प्रसूतीला असे शब्द कानावर पडले, की नाक मुरडले जात असे. "दुसरीपण मुलगीच' हे ऐकले तर त्या मातेला आयुष्यभर त्रास सोसावा लागे. समाजात त्या कुटुंबाची मान खाली जाई... परंतु, हे आता मागे पडत चालले आहे. वंशाला दिवा म्हणजे मुलगा हवाच, ही विचारधाराही बदलत आहे. ही बदलती परिस्थिती म्हणजे युवा पिढीचे, समाजाचे सकारात्मकतेकडे पडलेले पाऊलच आहे. 

शस्त्रक्रिया कमीच 
"हम दो, हमारे दो' ही रुढ संकल्पना मागे पडू लागली आहे. आधुनिकतेच्या युगात "हम दो, हमारा/ हमारी एक' ही संकल्पना रुढ होत आहे. आर्थिक स्तर ढासळणे, समाजात वाढलेली साक्षरता, तसेच उशिरा विवाह होणे, स्त्री-पुरुषांतील समस्या यास कारणीभूत ठरत आहेत. एप्रिल 2017 ते मार्च 2018 पर्यंत एका अपत्यावर 17 हजार 303 जोडपी, तर दोन अपत्यांवर 11 हजार 363 जोडपी थांबली आहेत. मात्र, यामध्ये शस्त्रक्रियेचा अवलंब मात्र कमी प्रमाणात असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली. 

एका अपत्यावर थांबलेल्या 
जोडप्यांची संख्या (2017-18) 

सातारा :   3126 
पाटण :    2355 
फलटण :  2302 
खटाव :    2017 
माण :     1671 
कऱ्हाड :   1407 
कोरेगाव : 1316 
खंडाळा :   915 
वाई :        819 
जावळी :   789 
महाबळेश्‍वर : 586 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News