दिल्लीचे तख्त आणि मराठे : अभी तो दिल्ली दूर है !

सतीश ज्ञानदेव राऊत 
Friday, 14 June 2019

शेवटी १७०७ मध्ये अहमदनगर जवळच्या भिंगार येथे म्हातारा औरंगजेब हताशपणे मेला आणि खुल्ताबादला पुरला गेला. मुघल साम्राज्याचेच कंबरडे मोडले आणि त्याच्या वारसांमध्ये गादीवरून कापाकापी सुरू झाली. 

वयाच्या १६ व्या वर्षी शिवबाने रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आदिलशाही-निझामशाहीच्या जोखडातून रयतेची मुक्तता करून, मुघल सम्राट औरंगजेबाचा अहंगंड जिरवून सह्याद्रीच्या कडाकपाऱ्या कोरून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. दक्षिणेची मोहिम फतेह करून दिल्लीच्या तख्ताला गवसणी घालण्याचा महाराजांचा मनसुबा अकाली निधनाने पुर्णत्वास गेला नाही. नियतीचा खेळ पहा महाराजांना ५० वर्षांचं अल्प आयुष्य लाभलं आणि औरंगजेबाने नव्वदी पाहिली. कल्पनेत रमू नये. पण हे एकदम उलटं झालं असतं तर भारताचं काय रम्य चित्र आज दिसलं असतं !

महाराजांच्या मृत्यूनंतर प्रत्यक्षात आलमगीर दख्खनेत लक्षावधींची फौज घेऊन उतरला. दिल्लीचं तख्त दूर , हिंदवी स्वराज्यंच अस्तंगत होऊल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत झुंझावं लागलं. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठ्यांच्या चिवट प्रतिकारामुळे औरंगजेबाचा मराठ्यांना नेस्तनाबूत करण्याचा इरादा सफल झाला नाही. २७ वर्षे त्याने कंबर कसली पण मराठे हाती लागले नाहीत. शेवटी १७०७ मध्ये अहमदनगर जवळच्या भिंगार येथे म्हातारा औरंगजेब हताशपणे मेला आणि खुल्ताबादला पुरला गेला. मुघल साम्राज्याचेच कंबरडे मोडले आणि त्याच्या वारसांमध्ये गादीवरून कापाकापी सुरू झाली. 

छत्रपती राजाराम महाराजांची प्रशासनावरील पकड सैल असली तरी दिल्ली जिंकावी आणि जिंकेल त्या सरदाराना त्याचा कारभार पाहावा असा मनसुबा हनमंतराव घोरपडे ह्या सरदाराला लिहिलेल्या पत्रात व्यक्त केला होता. पण राजारामाने सरदारांना दिलेली मोकळीक राजांनाच दुबळी करून गेली. पुढे पेशव्यांना दिल्ली खुणावू लागली . पण दिल्लीच्या तख्तावर बसायचे कुणी. त्यापेक्षा समशेरीच्या जोरावर मुलूखमैदान गाजवावे. परमुलूखातून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करावी. ज्याला जमेल त्याने तशी खंडणी वसूल करावी. असा सरळसोपट मार्ग पत्करला. रजपूत आणि जाटांना मराठे दिल्लीच्या गादीवर बसावेत हे रूचत नव्हते. त्यापेक्षा खिळखिळी झालेल्या मुघलशाहीतला कमकुवत सम्राट बरा अशी भुमिका मराठ्यांनी घेतली. सोन्याचे अंडी देणारी कोंबडी खाण्यापेक्षा गरज वाटेल त्यावेळी अंडी हिसकावून घ्यावीत हा व्यवहार्य विचार मराठे करत राहिले. मुघल सत्ता दुबळी झाल्याने सत्ताकारण धर्माधिष्ठीत राहिले नव्हते. त्यामुळे धर्माच्या आधारावर हिंदूची एकजूट कधी झाली नाही. 

शाहूंच्या काळात बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या काळात दिल्ली जिंकण्याची पहिली संधी चालून आली. १७१३ मध्ये फारूख सियार सईद बंधूंच्या मदतीने चुलत्याला मारून मुघल सम्राट झाला. पुढे फारूखला सईद बंधू डोईजड झाले. सईद अब्दुल्ला अली खान याची भिती जरा जास्तच वाटू लागली. म्हणून त्याला रजपूत किंवा मराठ्यां विरूद्ध लढाईला पाठवून मरू द्यायचे हा फारूखसियारचा बेत केला. पण सईद बंधू काही कच्चे खिलाडी नव्हते. सईद अब्दूल्ला अली खान ह्याने दख्खनच्या मोहिमेवर असताना बाळाजी विश्वनाथ पेशव्याशी तह केला. सप्टेंबर १७१९मध्ये बाळाजी विश्वनाथ पेशव्याने परसोजी भोसले सरदाराच्या अधिपत्त्याखालील १६००० घोडदळासह दिल्लीवर चाल केली. दोन हजार मराठे मारले गेले पण दिल्ली काबीज झाली. पेशव्यांना दिल्लीचे तख्त जिंकायचे नव्हते केवळ चौथाई-सरदेशमुखी मिळवायची होती. सईद बंधूनी फारूखसियारला पकडले, त्याचे डोळे काढले आणि बांबूच्या भाल्यावर त्याचे शीर नाचवले. 

मराठ्यांना दिल्लीचे तख्त ताब्यात घेण्याची दूसरी संधी आली होती ती मार्च,१७३७ मध्ये ! मार्चच्या अखेरीस थोरल्या बाजीरावाने थेट दिल्लीवर चाल केली. मराठा फौजा दिल्लीच्या बारापूला व काल्काच्या देवळापर्यंत धडकल्या. मुहम्मद शाह सम्राटाची पाचावर धारण बसली. दिल्लीच्या रकाबगंज भागात मुघलांच्या ८००० सैनिकांच्या पलटणीचा पराभव केला. (रकाबगंज ह्या भागातच सध्याची संसदेची ऐतिहासिक इमारत उभी आहे.) बाजीरावाने नंतर तालकटोरा मैदानकडे तंबू हलवला. मुघल सरदार कमरूद्दीन खान चालून आला पण बाजीरावाने त्याचे सगळे हत्ती-घोडे ताब्यात घेतले. बाजीरावाचा दिल्ली जाळण्याचा इरादा होता पण ‘नाहक नुकसान कशाला ?’ आणि शाहूंना ते आवडणार नाही’ ह्या विचाराने तो रद्द केला . मुघल घराणे नष्ट केले असते तर भारतातील राज्यांना जोडणारा राजकीय धागा नष्ट झाला असता असे ही बाजीरावाला वाटले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल सम्राटाने ओलीस ठेवलेल्या शाहूची व आई येसूबाईची सन्मानपूर्वक सुटका केली होती. ती कृतज्ञता शाहूच्या मानसिकतेत ठाण मांडून बसली होती. ही जाण थोरल्या बाजीरावाला होती म्हणून दिल्ली वाचली. 

तिसरी संधी आली होती ती १७५७ साली. त्यावेळी दिल्लीच्या तख्तावर आलमगीर दूसरा हा नेभळट मुघल सम्राट राज्य करीत होता. अहमदशाह अब्दालीच्या दुसऱ्या स्वारीनंतर नजीब उदौला हा कपटी-गोडबोल्या रोहिलाच खऱ्या अर्थाने राज्यकारभार पाहत होता. त्यामुळे इमाद-उल-मुल्क ह्या मुघलांच्या वझीराने रघुनाथरावांशी संधान बांधले. मल्हारराव होळकर देखील उशीराने आघाडीत सामील झाले. जुलै महिन्याच्या पावसात सखाराम बापूंनी पटपडगंज काबीज केले. रघूनाथरावांनी लाहोर गेटच्या दिशेने चाल केली तर मल्हारराव आणि विठ्ठल सदाशिव यांनी काश्मीरी गेट ( उत्तरेकडून) कडून हल्ला चढवला; मानाजी पायगुडेंनी काबूलगेटच्या दिशेने मोर्चाबांधणी केली. मराठ्यांनी लाल किल्ला चोहीकडून वेढल्याने नजीबच्या पायातलं अवसान गळालं. त्याने वकिल मेघराज मल्हाररावांकडे पाठवून तहाची बोलणी करण्यात वेळ काढूपणा केला. रघूनाथरावांचा संयम सुटला. त्यांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस दिल्ली गेटवर आणि इमाद-उल-मुल्क ने लाहोर गेटवर स्वारी केली. नजीबने गयावया करून सप्टेंबर महिन्यात रघूनाथरावांना टाळून मल्हाररावांशी तह केला. ह्या तहाने रघुनाथरावांना मल्हाररावांचा राग आला. मात्र नंतर दोघांत दिलजमाई झाली आणि त्यांनी लाल किल्ला फतेह केला. पुन्हा तेच ! मराठ्यांना यावेळी ही दिल्लीच्या तख्तामध्ये रस नव्हता.दोघांनी पंजाब प्रांतात राज्यविस्तार करण्याकडे मोर्चा बांधला. 

चौथी संधी आली ती १७५९ मध्ये ! गाझीउद्दीन सरदाराने आलमगीर दूसरा याचा खून केला. आलमगीर दूसरा चा मुलगा अली गौहर पाटण्याला पळून गेला. त्याने सदाशिव भाऊ पेशव्याची मदत मागितली. सदाशिवभाऊंनी दिल्लीवर चाल केली शहा जहान तिसरा याला पदच्यूत केले आणि अली गौहरला शाह आलम दूसरा नावाने मुघल सम्राट म्हणून सिंहासनावर बसवले. शाह आलम दूसरा नावापूरताच सम्राट होता. कारण दिल्लीची सल्तनत इतकी आकुंचीत झाली होती की, ‘’ सल्तनत ए शाह आलम – दिल्ली -ता- पालम’’ अशी मुघल साम्राज्याची चेष्टा केली जाई. सदाशिवभाऊंना दिल्ली तख्त जिंकणे अगदीच सोपे होते पण ती इच्छाच त्यांच्या ठायी नव्हती.१७६१ मध्ये पानीपतची सक्रांत मराठेशाहीवर कोसळली. त्यात सदाशिवभाऊ गेले. शाह आलम दूसरा याने राज्यविस्तारासाठी बंगालकडे मोर्चा वळवला. पण १७६४ साली बक्सारच्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीच्या रॉबर्ट क्लाईव्ह विरूद्ध त्याचा पराभव झाला. कंपनीने त्याला दिल्लीत प्रवेश करण्यास बंदी घातली. 

पाचवी संधी आली महादजी शिंदे यांना ! बक्सारच्या पराभवानंतर शाहआलम दूसरा वणवण फिरत होता.१७७२ मध्ये महादजी शिंदेनी शाह आलम दूसरा ह्यास पुन्हा दिल्लीच्या गादीवर बसवले. स्वत: गादी ताब्यात घेतली नाही. दरम्यान महादजी रजपूतांशी तंट्यात व्यस्त असताना पानीपतातला गद्दार नजीब उदौला ह्याचा नातू अत्याचारी नराधम गुलाम कादीर हा रोहिलाखंडचा नवाब सरळ दिल्लीत घुसला. त्याने शहा आलम दूसरा कडून जबरदस्तीने वझीर पदाचे अधिकार घेतले. शाह आलम दूसरा याचा नेभळटपणा हेरून त्याने लाल किल्ल्यातील सम्राटाच्या जनानखाण्यातील स्त्रीयांवर अन्वनित बलात्कार केले. अब्रू लुटल्या आणि खजिना ही लुटला. शाह आलमचे डोळे काढले; दाढ्या सोलून काढली. महादजी शिंदे पर्यंत वार्ता जाईपोवेतो दहा आठवडे लोटले. शेवटी महादजीनेच गुलाम कादीर ह्या रोहिल्याचा खात्मा केला. 

पुन्हा असे काही घडू नये म्हणून १७८८ पासून पुढे दोन दशके मराठ्यांची पलटण लालकिल्ल्याचे रक्षण करण्यासाठी तंबू टाकून राहिली. मराठे संरक्षक झाले पण सिंहासनाधिपती झाले नाहीत.१८०३ च्या दूसऱ्या इंग्रज-मराठे युध्दात मराठ्यांनी दिल्लीचा ताबा गमावला. मल्हारराव होळकरांनी दिल्ली जिंकायचा प्रयत्न केला पण त्याला माघार घ्यावी लागली. 

पेशव्यांच्या देदिप्यमान कारकीर्दीला काळीमा फासणारा दूसरा बाजीराव लंपट आणि नालायक ठरला. यशवंतराव होळकर मराठ्यांच्या इतिहासातील एक महापराक्रमी पुरूष म्हणावा लागेल. पण शिंदे-होळकर-पेशवे आपापसात झगडत राहिले. त्यांच्यात शिवाजी महाराजांप्रमाणे द्रष्टेपण नव्हते. हिंदवी स्वराज्य स्थापून महाराजांना रयतेचे राज्य आणावयाचे होते. पण ह्या तिघांच्या भांडणात रयत नाडली गेली ; लूटली गेली. यशवंतरावांमध्ये ब्रिटीशांना दिल्लीतून हुसकावून लावण्याची धमक होती. लॉर्ड वेलेस्ली ज्याने पुढे जाऊन वॉटर्लू युद्धात नेपोलियनचा पराभव केला, त्याने यशवंतरावां पुढे हात टेकले होते. यशवंतरावाने इंग्रजांविरूद्ध रजपूत, रोहिला ,शिख , मराठा ,जाट एकत्र करण्याचा प्रयत्न केला. यशवंतरावांना दिल्ली ब्रिटीशांच्या ताब्यातून सोडवायची होती. पंजाबचे महाराजा रणजितसिंह मदतीला तयार ही झाले पण चाणाक्ष इंग्रजांनी बेत हाणून पाडला. शिंदे-होळकर-पेशव्यांत समेट घडवणारे दुर्दैवाने कुणी नव्हते. नाहीतर इंग्रजांचा प्रभाव वाढल्यानंतर दिल्लीचे तख्त सर करण्याची संधी आली नव्हती. पण एकजूट व पराक्रमाने ते तख्त जिंकण्याची शक्यता होती. 

पुढे १८५७ सालची क्रांती असफल झाली. आसेतू -हिमालय ब्रिटीश अंमलाखाली आला. भारत गुलामगिरीच्या अंध:कारात ढकलला गेला. लोकमान्य टिळकांनंतर महात्मा गांधींकडे स्वातंत्र्य संघर्षाची सुत्रे आली. स्वातंत्र्योत्तर भारतात मराठी माणसांचा दबदबा राहिला. पण दिल्लीच्या सत्तेची सुत्रे कधी हाती आली नाहीत. यशवंतराव चव्हाण साहेब , शरद पवार साहेब , प्रमोद महाजन हे दिल्ली दरबारी वजन असणारे नेते. पैकी दोघे निवर्तले. साहेब अजूनही जोमाने उभे आहेत. गडकरी साहेब देखील एक कार्यक्षम नेते आहेत. प्रतिभाताई पाटील देशाच्या राष्ट्रपती झाल्या. पण खऱ्या अर्थाने दिल्लीचे तख्त हे पंतप्रधानपद आहे हे आपण जाणता. महाराष्ट्र भुमी ही कर्तबगारांची भुमी आहे त्यामुळे भविष्यात इतर नेते देखील अचानक मुसंडी मारतील अशी आशा करूया. सध्या ‘’अभी तो दिल्ली दूर है..!’’ असेच म्हणावयास हवे. 

(टीप :मराठे/मराठा हा शब्द इथे जातिवाचक अर्थाने घेऊ नये. महाराष्ट्राच्या मातीत जन्मला तो मराठा हाच अर्थ इतिहासकारांना अभिप्रेत आहे.)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News