असे घ्या 'या' विषयांबाबत जाणून
पदवीच्या फिजिक्स व केमिस्ट्री यांवर विस्ताराने याआधी पाहिले. तसाच प्रकार गणित व संख्याशास्त्रासंदर्भात आहे. निवडणुकांची धमाल नुकतीच संपली. गणिती व संख्याशास्त्रीय विश्लेषकांचा हा चलतीचा काळ होता. मात्र, गेल्या वर्षी संख्याशास्त्रात ७६ टक्के मिळवून पास झालेला पदवीधर मागच्याच आठवड्यात ‘मी पुढे काय करू?’ म्हणून माझ्यासमोर येऊन बसला होता.
पदवीच्या फिजिक्स व केमिस्ट्री यांवर विस्ताराने याआधी पाहिले. तसाच प्रकार गणित व संख्याशास्त्रासंदर्भात आहे. निवडणुकांची धमाल नुकतीच संपली. गणिती व संख्याशास्त्रीय विश्लेषकांचा हा चलतीचा काळ होता. मात्र, गेल्या वर्षी संख्याशास्त्रात ७६ टक्के मिळवून पास झालेला पदवीधर मागच्याच आठवड्यात ‘मी पुढे काय करू?’ म्हणून माझ्यासमोर येऊन बसला होता. मी त्याला विचारले, ‘सध्या रोजचा पेपर वाचतोस ना? टीव्हीवरच्या चर्चा, विविध आकडेवारी ऐकतोस ना?’ थंडपणे त्याचे उत्तर होते, मला राजकारणात रस नाही. मी पुढे काय शिकू याचे उत्तर द्या ना.
मार्केट रिसर्च करणाऱ्या विविध कंपन्या, इन्शुरन्स कंपन्या, संशोधन करणाऱ्या संस्था, वित्तीय संस्था या साऱ्यांमध्ये तल्लख व व्यवहारी गणिती वा संख्याशास्त्रीय पदवीधरांची मागणी असते. मात्र, यांचे कामकाज कसे असते, त्या काय करतात याकडे त्या विषयातील पदवीधरांनी अभ्यासू वृत्तीने, चौकसपणे पाहायला तर हवे. याउलट मी एमबीए करतो असा व एवढाच ध्यास हे घेतात. बायोलॉजी व त्याच्या उपशाखा यावर तर अक्षरशः लाखो स्वयंसेवी संस्था, संशोधन संस्था कार्यरत आहेत. पर्यावरण व त्या संदर्भातील असंख्य घटकांबद्दल हे विषय प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाष्य करत असतात. मात्र, मी व माझा विषय व त्याचाच अभ्यास असे करणारे निरुपयोगी ठरतात. झुलॉजीच्या पदवीधराला महाराष्ट्रातील जंगली प्राणी, त्यांचे अधिवास, त्यातील नामशेष होऊ घातलेल्या जाती, त्याची कारणे यावरचे, पुस्तकाबाहेरचे, दैनंदिन वृत्तपत्रीय अभ्यासपूर्ण असे लेख माहीतच नसतात. त्याने स्टडी टूर फक्त एन्जॉय करून मैत्रिणी मिळवलेल्या असतात.
भीमाशंकरचा शेकरू सांगणारा पदवीधर सोलापूरच्या माळढोकाबद्दल त्याच्या अधिवासाबद्दल काही बोलले का? औषधी वनस्पतींची इंग्रजी नावे सांगून पोपटपंची करणारा तुळस, कोरफड, गुळवेल यांच्यातील कोणते घटक कशात लागतात याबद्दल बोलला तर त्याचे करिअर सुरू होऊ शकते. आजवर दरवर्षी विविध विषयांतील बऱ्या मार्कांचे, बरा अभ्यास असलेले पदवीधर वा पदव्युत्तर पदवी घेतलेले विद्यार्थी भेटल्यानंतरच जाणवलेले येथे नोंदवीत आहे. पालकसुद्धा याबद्दल आपल्या मुलामुलींना जागरूक करतील ही त्यामागची साधीही अपेक्षा.