'मी आहे, होईल सगळं नीट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ )
Saturday, 17 August 2019

सुषमा स्वराज यांचा चेहरा हा मुखवटा नव्हता. अतिशय शालीन, आपलासा वाटणारा, हसतमुख, बघितल्यावर विश्वास वाटावा असा मायाळू चेहरा असलेली ही बाई राजकारणी कधी वाटलीच नाही, आई वाटली.

जन्माला येताना आपण एक चेहरा घेऊन जन्माला येतो. कळायला लागल्यावर आपण सोयीनुसार त्याच्यावर मुखवटे चढवतो, बाळगतो, वापरतो, सराईत होतो. शालीनतेचा, सोज्वळतेचा, ज्ञानाचा मुखवटा मात्र कायमस्वरूपी सांभाळता येत नाही, वागवता येत नाही. सिंहाची कातडी कधीतरी उघडी पडते आणि कोल्हा दिसू लागतो तसं होतं. सुषमा स्वराज यांचा चेहरा हा मुखवटा नव्हता. अतिशय शालीन, आपलासा वाटणारा, हसतमुख, बघितल्यावर विश्वास वाटावा असा मायाळू चेहरा असलेली ही बाई राजकारणी कधी वाटलीच नाही, आई वाटली.

राजकारण म्हणजे कोळश्याच्या खाणीत पांढरे स्वच्छ कपडे घालून डाग लागू नये याची काळजी घेत काम करण्यासारखं आहे. शालीनतेचा, सज्जनतेचा, चारित्र्याचा एक दबदबा असतो जो त्यांच्याकडे होता. आदळआपट न करता, वैर न धरता, अभ्यासपूर्ण, मार्दवतेने बोलून मुद्दा मांडणं यासाठी स्वभाव हवा, त्वरीत यशाची अपेक्षा धरणा-या माणसाला ते शक्य नसतं. राजकारणात सगळेच गरजेचे असतात, पन्नास चेंडूत शंभर करणारा काहीवेळा गरजेचा असतोच पण सावरणारा, कठीण प्रसंगी ठाम उभा रहाणारा, संयम बाळगून प्रतिपक्षाला नामोहरम करणारा द्रविड लागतोच. सुषमा स्वराज तशा होत्या, पेशन्स असलेल्या. अटलबिहारी, पर्रीकर अशी काही हाताच्या बोटावर मोजण्यासारखी सुसंस्कृत माणसं राजकारणात होती, त्यातलं एक बोट अजून कमी झालं.

यश, सुख, आनंद मिळाला तरी तो भोगण्याचं नशिबात लागतं. ज्या विचारधारेला त्यांनी आपलंसं केलं त्याचा विजय होत असताना, एकेक स्वप्नं सत्यात येत असताना ते बघण्याचा आनंद मोठा असतो. अशी अनेक अधुरी स्वप्नं उराशी बाळगून असतील त्या. ३७० चा आनंद त्यांना फार काळ साजरा करता नाही आला पण उराशी समाधान असणारच शेवटचा श्वास घेताना. 'राष्ट्र प्रथम' हे वागण्यात दाखवून देणा-या, जात, पक्ष, धर्म, देश या पलीकडे जाऊन अनोळखी माणसाच्या मदतीला धावून जायला मोठं मन लागतं, ते त्यांच्याकडे होतं. सची बाराखडी लिहावी तसे गुण आणि नाव बाळगलेल्या सहृदयी, सन्माननीय, सोज्वळ, सुंदर, संयमी, सुसंस्कृत, सज्जन सुषमा स्वराज आज एक अभिमान वाटावा असा वारसा ठेवून घाईघाईने निघून गेल्या. नात्यागोत्यातल्या नसलेल्या, ज्यांना कधीही समक्ष पाहिलं नाही अशा माणसाच्या जाण्याने डोळ्यात अश्रू येईल अशी माणसं आता दुर्मिळ आहेत. आज मात्र परवानगी न घेता डोळे ओलावलेच. आदर्श ठेवणा-या माणसांसाठी हे झालं नाही तर आपण माणूस नाही हे नक्की.

प्रकाश काजव्यामुळे पण मिळतो, सूर्यामुळे पण मिळतो, एक क्षणिक तर एक दीपवणारा पण गरजेचा. आपल्याला या सगळ्यात भावतो, गरजेचा वाटतो तो शांत, आश्वासक प्रकाश समईचा असतो. समईची ज्योत मोठी नसते पण ती 'मी' आहे हे सांगणारी असते, आशादायी असते. अज्ञानाचा, असत्याचा, दुष्टपणाचा तम जेंव्हा अवकाश पादाक्रांत करतो तेंव्हा या ज्योतीचा उपयोग असतो. नंदादीप जाहिरात करत नसतात तर 'मी आहे, होईल सगळं नीट' असं मूक आश्वासित करत असतात. जगण्यासाठी अशा नंदादीपासारख्या तेवणा-या समया गरजेच्या असतात. आज एक समई शांत झाली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News