सुप्रिया पतंगेचे कराटे स्पर्धेत दैदिप्यमान यश
- सुप्रियाने राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावुन कांस्य पदाकावर आपले नाव कोरले
नांदेड: मनात जिद्द असली की, आपण कोणतेही काम यशस्वी करु शकतो. याचं उदाहरण म्हणजे कुमारी सुप्रिया विलास पतंगे..! सुप्रियाने राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावुन कांस्य पदाकावर आपले नाव कोरले. तिच्या दैदिप्यमान यशामुळे नांदेडकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
नुकत्याच पुणे जिल्ह्यातील बारामती येथे राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धा संपन्न झाली. त्या स्पर्धेत सुप्रियाने तिसरा क्रमांक पटकावून कांस्य पदक मिळवले. सुप्रिया नांदेड बुद्रुक येथील सांदिपानी पब्लिक स्कूल मधील इयता आठवी वर्गात शिकत आहे. तीने मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुनिल राठोड, प्राचार्य क्रांती कुलकर्णी, क्रिडा शिक्षक कैलास राठोड, किरण स्पोर्टस असोशिएशनचे प्रमुख लक्ष्मण फुलारी, रोहन गायकवाड, अमोल कांबळे, नेहा सुरनर यांनी अभिनंदन केले आहे. तीने मिळविलेल्या यशाचे श्रेय आई- वडील, शिक्षक, प्रशिक्षक यांनी दिला आहे. सुप्रियावर सर्व स्तरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे.
कराटे हा खेळ आहेच, मात्र कराटे या खेळातून स्वरक्षणाचे धडे मिळतात. त्यामुळे मुली कराटे खेळ प्रकाराकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. लहानपणापासून जिमनॉस्टीक खेळाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांनी घेतले पाहिजे, हे वय शरिराला एक वळण देण्यासाठी योग्य असते. लहान वयातच शरिराला स्पीड, लवचिकता निर्णाम होऊ शकते. त्याचबरोबर दररोज 3- 4 तास व्यायाम करावा लागतो.
सुप्रिया ही अतिशय मेहनती, जिद्दी हुशार मुलगी आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून ती प्रशिक्षण घेत आहे. सुरुवातीला तीन वर्षाचा जिमनॉस्टीक बेसीक डेव्हलपमेंट कोर्स केला. त्यांनतर 4 वर्षापासून ती कराटे स्पर्धेत प्रशिक्षण घेत आहे. अनेक कराटे स्पर्धेत तीने नेत्रदीप यश मिळवले आहे.
-लक्ष्मण फुलारी, प्रशिक्षकशिक्षणाबरोबर मुलींना खेळाची संधी दिली पाहिजे. त्यामुळे मुलींमध्ये एक जिद्द, आत्मविश्वास निर्माण होतो. करिअरला एक नवी दीशा मिळते. मुलींने मिळविलेल्या दैदिप्यमान यशामुळे आम्हाला सुप्रियाचा आभिमान वाटतो. राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करेल याची खात्री आहे.
-आम्रपाली पतंगे, आई