मराठा समाजाला मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Friday, 12 July 2019
  • मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही

  • दोन आठवड्यांनी पुढील सुनावणी

नवी दिल्ली: मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास कोर्टाने तुर्तास नकार दिला आहे. दोन आठवड्यादरम्यान याचिकाकर्ते पुन्हा याचिका करु शकतात, असंही कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नोटीस पाठवून दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहे. दोन आठवड्यांनी या प्रकरणी पुन्हा सुनावणी होईल.

मराठा आरक्षणाविरोधात डॉ. जयश्री पाटील यांच्यावतीने अॅड. डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राजकीय फायद्यासाठी नियमबाह्य स्वरुपात दिलेलं एसईबीसी प्रवर्गाचं आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मराठा आरक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य प्रतिवादी करण्यात आलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाविरोधातील दोन याचिकांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्य पीठापुढे आज महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. कुणबी आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) संघटनांकडूनही दोन आव्हान याचिका सादर करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाकडून आरक्षणाला स्थगिती मिळू नये, यासाठी माजी अ‍ॅटर्नी जनरल व ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकिलांची फौज बाजू मांडली.

काय आहे हायकोर्टाचा निकाल?

काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणावर हायकोर्टाने निकाल दिला. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण वैध ठरलं. पण, 16 टक्के आरक्षण देता येणार नाही. आरक्षणाची मर्यादा 12 ते 13 टक्के आणली पाहिजे, असं कोर्टानं सांगितलं आहे. हा निर्णय म्हणजे मराठा आंदोलनाचा विजय असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच दुसरीकडे 'राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिलं जाऊ शकतं,' असा महत्त्वाचा निर्णय देखील मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. तसंच मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. हा निर्णय आल्यानंतर राज्यभरात जल्लोष साजरा करण्यात आला होता.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News