'सुपर पैलवान’ दादूमामा!

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Monday, 21 October 2019
  • डब्बल महाराष्ट्र केसरी, रुस्तम ए हिंद, महानभारत केसरी हे मानाचे किताब पटकाविले. विशेष असे, की त्यांनी १९७० व ७१ ला सलग दोनदा महाराष्ट्र केसरीचा किताब मिळविला होता. सामान्य कुटुंबातून आलेल्या दादूमामांची ही उल्लेखनीय कामगिरी कोल्हापूरसाठी अभिमानाची बाब ठरली.

दादूमामा माझा सहकारी. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान. त्यांच्या अंगाला सुरवातीला शाहूपुरी तालमीतली माती लागली. मोतीबाग तालमीत त्यांच्या कुस्तीकलेला आकार आला. वस्ताद गणपतराव आंदळकर, बाळ गायकवाड व बाळू बिरे यांचा हा पठ्ठ्या. त्यांच्या करड्या शिस्तीत दादूमामांचं अंग पीळदार झालं. हजारो दंड-बैठका, जोर, योग्य आहाराच्या त्रिसूत्रीतून ते घडले. सरावात चुकारपणा त्यांना कधी ठाऊकच नव्हता. प्रतिकूल परिस्थितीची जाण ठेवून ते मेहनत घेत होते. कुस्ती कोणाविरुद्ध आहे, हे त्यांच्यादृष्टीने गौण होते. लढताना हार-जीतची पर्वा त्यांनी कधी केली नाही. मैदानात जिंकले तर त्याचा गर्व नाही, की हरल्यास त्याचे दुःखही नाही, अशी त्यांची प्रवृत्ती होती, त्यामुळेच ते 'सुपर पैलवान' होते.

त्यांनी डब्बल महाराष्ट्र केसरी, रुस्तम ए हिंद, महानभारत केसरी हे मानाचे किताब पटकाविले. विशेष असे, की त्यांनी १९७० व ७१ ला सलग दोनदा महाराष्ट्र केसरीचा किताब मिळविला होता. सामान्य कुटुंबातून आलेल्या दादूमामांची ही उल्लेखनीय कामगिरी कोल्हापूरसाठी अभिमानाची बाब ठरली. त्याचा परिणाम कुस्ती क्षेत्रावर झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील त्याकाळातील पिढी कुस्तीकडे आकर्षित झाली. दादूमामांना पाहायला गावोगावची मुले यायची. उंचेपुरे, पीळदार शरीरयष्टी व बोलण्यात वजन असलेल्या या मल्लाला पाहायला आलेला त्यांच्या प्रेमात पडत असे. यशाची शिखरं चढत असताना, ते कुस्तीच्या प्रसारासाठी कायम झटत राहिले. दादूमामाने आखाड्यात शड्डू ठोकल्यानंतर प्रेक्षकांची नजर त्यांच्यावरून हटत नसे. त्यांनी कुस्ती जिंकल्यानंतर प्रेक्षकांचा त्यांच्याभोवती गराडा पडत असे. त्यांनी अनेक मैदाने अक्षरशः गाजवली. ग्रामीण भागातील मुलांना घडविताना, मुलगा विनोद व अमोल यांना घडविण्यात त्यांनी कोणतीच कसूर ठेवली नाही. त्यांच्या फटक्‍यांमुळेच विनोद हिंदकेसरी, तर अमोल महाराष्ट्र चॅम्पियन झाला. मोतीबाग तालमीचे वस्ताद म्हणून दादूमामांचा दरारा आजपर्यंत कायम होता.

कुस्ती लढती बंद केल्यानंतर सहसा मल्ल कौटुंबिक होतो. दादूमामांचं मात्र तसं नव्हतं. राधानगरी तालुक्‍यातील अर्जुनवाडाचे दादूमामा कोल्हापूरचे झाले. अखेरच्या श्‍वासापर्यंत मोतीबागेत ते कुस्तीचे धडे देत राहिले. दीडशेवर मल्लांचा ते आधारवड होते. गरीब कुटुंबातील मल्ल असेल, तर त्यास ते मदत करायचे. आर्थिक स्थिती नाही म्हणून कोणी कुस्तीला रामराम ठोकू नये, ही त्यांची भावना होती. दररोज सकाळी व सायंकाळी दादूमामा मल्लांना मार्गदर्शन करायचे. कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी उत्तमरीत्या पेलली. संघाच्या माध्यमातून त्यांनी कुस्तीचा प्रसार केला. अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मल्लांनी कोल्हापूरचा झेंडा फडकवावा, ही त्यांची तळमळ होती. मोतीबागेतील मल्ल ऑलिंपिकचे पदक मिळवेल, असा विश्‍वास त्यांच्या ठायी होता. नातू अर्जुन यालाही त्यांनी कुस्तीचे धडे देण्यास सुरवात केली. त्यांचे जाणे कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रात पोकळी निर्माण करणारे आहे. लाल मातीतल्या या मल्लाला मनापासून सलाम.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News