चोरट्याचा लोकपमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

मंगेश शेवाळकर
Tuesday, 20 August 2019
  • कळमनुरीजवळ माळेगाव फाटा येथून त्याने पोलिस वाहनातून उडी मारून पलायन केले.
  • पोलिसांना संशय आल्याने त्याला पांघरून काढण्यास भाग पाडल्यानंतर गळ्यातून रक्त येत असल्याचे आढळून  आले. पोलिसांनी  त्याला तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील मोरवाडी शिवारात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेला दुचाकी चोराला पकडल्यानंतर त्याने मंगळवारी (ता.२०)  आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यातील लॉकअप मधे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या गळ्याला  जखम झाल्याने त्याला उपचारासाठी  नांदेडे येथे हलविण्यात आले आहे. 

येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देगलूर (जि.नांदेड) येथील देविदास बाबुराव कांबळे (वय३०) याला अटक करून आखाडा बाळापूर पोलिसांच्या हवाली केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला रविवारी (ता.१८) सेनगावच्या न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर रात्री परत आखाडा बाळापूर येथे आणत असतांना कळमनुरीजवळ माळेगाव फाटा येथून त्याने पोलिस वाहनातून उडी मारून पलायन केले. त्यानंतर दहा तास कोंम्बींग ऑपरेशन केल्यानंतर सोमवारी (ता.१९) दुपारी तो एका शेतात लपलेला आढळून आला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.  

दरम्यान, त्याला आखाडा बाळापूर येथील  लॉकअपमधे ठेवण्यात आले होते. या ठिकाणी त्याने आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास  गळ्यावर फरशी मारून घेतली. त्यानंतर अंगावर पांघरून घेतले. यावेळी पोलिसांना संशय आल्याने त्याला पांघरून काढण्यास भाग पाडल्यानंतर गळ्यातून रक्त येत असल्याचे आढळून  आले. पोलिसांनी  त्याला तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. या प्रकारामुळे आखाडा बाळापूर पोलिस पुन्हा अडचणीत सापडले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News