येथे कविता विकत मिळतात...

मनीषा चारटे
Friday, 5 July 2019

एक वेळ तीन हजार रुपये भरून कायमस्वरूपी सभासद झाले असताना काव्यसंग्रहाची प्रत मला विनामूल्य देणार होते. मग हे पैसे कशासाठी द्यायचे?

एके दिवशी वृत्तपत्रात एका साहित्य मंडळाचं निवेदन वाचले. काव्यस्पर्धेसाठी कविता पाठवा. स्पर्धेत पाच नंबर काढणार होते. वीस हजार, पंधरा हजार, दहा हजार, सात हजार आणि पाच हजार रुपये, अशी रोख बक्षिसे होती. याशिवाय निवड झालेली कविता काव्यसंग्रहात छापली जाणार असून सहाशे रुपये किमतीच्या काव्यसंग्रहाच्या दोन प्रती पाचशे रुपये एक प्रमाणे दिल्या जातील. तसेच तीन हजार रुपये भरून लाईफ टाइम सभासद झालात, तर प्रत्येक वेळी निघणारा काव्यसंग्रह आपल्याला विनामूल्य घरपोच पाठविला जाईल. 

हे सर्व नियम मला योग्य वाटल्यामुळे मीही त्या साहित्य मंडळात कविता पाठविण्याचा निर्णय घेतला आणि एक स्वरचित कविता पाठविली. कविता पोहोचल्यानंतर काही दिवसांत ‘तुमचा तिसरा नंबर आला असून काव्यसंग्रहात तुमची कविता छापली जाणार आहे. तरी आपण तीन हजार रुपये भरून कायमस्वरूपी सभासद व्हावे, असे सविस्तर पत्र आले.
 
विषय बक्षिसाच्या पैशाचा नसून आपली कविता बक्षिसाला पात्र ठरली, हेच फार मोठे बक्षीस होते. नाहीतरी तिसऱ्या क्रमांकाचे रुपये दहा हजारांचे बक्षीस आपल्याला मिळणार आहे. मग त्यातून तीन हजार रुपये भरून सभासद होण्यास काय हरकत आहे, असा विचार करून मी तीन हजार रुपयेचा चेक साहित्य मंडळाच्या नावे पाठविला. त्यानंतर मी चार ते पाच वेळा स्पर्धेचा निकाल केव्हा आहे, या चौकशीसाठी फोन केला. त्यावेळी साहित्य मंडळाच्या एका संचालकांनी सांगितले, की ‘तुमचा स्पर्धेत नंबर आला नाही, तर काव्यसंग्रहात कविता घेण्यासाठी जे नंबर काढले जातात, त्यात तुमच्या कवितेचा तिसरा नंबर आला आहे. 

काव्यसंग्रहात आपली कविता छापली जाणार आणि स्पर्धेच्या रकमेपेक्षा सुद्धा ती कायमस्वरूपी आपल्या नावाने पुस्तकात राहणार, याचेच समाधान वाटून स्पर्धेत नंबर न आल्याबद्दल मला काहीच वाटले नाही. पुढे बरेच दिवसांनी ज्या काव्यसंग्रहाची किंमत सहाशे रुपये, तर नाहीच पण पाचशे रुपयेसुद्धा नसून फक्त शंभर रुपये आहे. अशी त्याची एक प्रत, सहभागाबद्दल एक छोटीशी लाकडी ट्रॉफी व सहभागाचे सर्टिफिकेट पोस्टाने आले. तो काव्यसंग्रह सुद्धा शंभर लोकांच्या प्रत्येकी एकप्रमाणे शंभर कवितांचाच शंभर पानी होता. 

हे झाले पहिल्या वेळचे, या स्पर्धेपुरते रामायण; पण खरी गंमत तर पुढेच आहे. ती म्हणजे, संग्रहात कविता घेण्यासाठी नंबर काढणे, कायमस्वरूपी सभासदत्व घेण्यासाठी एकवेळ तीन हजार रुपये भरणे, हे सर्व बक्षिसांची अपेक्षा न करता केले. त्याविषयी काहीच तक्रार नाही. पण जेव्हा पुढील वर्षी त्याच काव्य स्पर्धेचे वृत्तपत्रात निवेदन आले. स्पर्धेचे नियम पहिल्या वेळीच सांगितलेले होते आणि हजार रुपये भरून कायमस्वरूपी सभासद पण झाले होते. म्हणून मी पुन्हा एक स्वरचित कविता पाठवली. आपल्या कवितेची काव्यसंग्रहात छापण्यासाठी निवड झाली आहे, असे संचालकांनी फोनवरून सांगितले. स्पर्धेतील नंबरच्या बाबतीत काहीच बोलणे झाले नाही. काही दिवसांनी त्यांचे तीन हजार रुपये भरा, अशा आशयाचे पत्र आले. फोनवरून चौकशी केली असता, ते म्हणाले, ‘तुमची कविता काव्यसंग्रहात छापण्यासाठी आणि तो काव्यसंग्रह तुम्हाला पाठविण्यासाठी लागणारा तो खर्च आहे. स्पर्धेत तुमचा नंबर येईलच, असे सांगू शकत नाही. तो निर्णय सर्वस्वी परीक्षक लोकांचा असतो. 

एक वेळ तीन हजार रुपये भरून कायमस्वरूपी सभासद झाले असताना काव्यसंग्रहाची प्रत मला विनामूल्य देणार होते. मग हे पैसे कशासाठी द्यायचे? आता मात्र माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काव्यस्पर्धेतील नंबर आणि मिळणारे बक्षीस याची मला अपेक्षा नाही; परंतु संग्रहात कविता छापणे आणि संग्रहाची एक प्रत कवींना पाठवणे, यासाठी जर प्रत्येक वेळी एका कवितेसाठी तीन हजार रुपये मोजावे लागत असतील तर ते मला मान्य नव्हते.) याचीच दुसरी बाजू अशी की, तीन हजार रुपये जर कवींकडून एका कवितेसाठी मिळत असतील तर त्या कवितेच्या दर्जाकडे न पाहता केवळ पैशाकडे पाहून कवितेची निवड केली जात आहे, असे समजले तर वावगे ठरू नये. 

असे जेव्हा माझ्या लक्षात आले, तेव्हा मी दुसऱ्यांदा तीन हजार रुपये न पाठविण्याचा निर्णय घेतला; परंतु संचालकांच्या मते ज्यावेळी काव्यसंग्रहाची एक प्रत आणि सहभागाचे सर्टिफिकेट पार्सलने पाठवू त्यावेळी मी ते पार्सल पोस्टात तीन हजार भरून घेईन, असे त्यांना वाटले. आणि काही दिवसांतच ते पार्सल पोस्टाने आले. मी पार्सल घेण्यासाठी पोस्टात गेले, तर पोस्टमास्तरांनी तीन हजार रुपये भरून हे पार्सल घ्या, असे सांगितले. मला ते मान्य नसल्यामुळे मी ते स्वीकारले नाही. आणि त्याच क्षणी ते जिथून आले होते, तेथे परत पाठवले. त्यानंतर त्या संचालकांचा त्याविषयी फोन सुद्धा आला नाही व पत्रही आले नाही. अशा तऱ्हेने तीन हजार रुपये भरून मी एक कटू साहित्यिक अनुभव विकत घेतला. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News