देववाणी ‘संस्कृत’कडे विद्यार्थ्यांचा कल 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 3 July 2019

भारतीय साहित्यातील श्रेष्ठ रचनाकार म्हणून ख्यात असलेले कवी कालिदास यांनी रामटेकच्या रामगिरी टेकड्यांवर ‘मेघदूत’ या संस्कृत खंडकाव्याची रचना केली. 

रामटेक - महाकवी कालिदासांची कर्मभूमी असलेल्या रामटेकच्या कविकुलगुरू संस्कृत विश्‍वविद्यालयामध्ये कालिदासांच्या साहित्य अभ्यासासह संस्कृत भाषेतील प्राचीन व आधुनिक युगातील शास्त्रांशी ज्ञानाचा मेळ घालून आंतरविद्याशाखीय संशोधनाचे कार्य करण्यात येणार आहे. अलीकडे देववाणी असलेल्या संस्कृत भाषेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.

संस्कृत शिकू इच्छिणाऱ्या तसेच आधुनिक विज्ञानासह योग, ज्योतीष, वास्तू व आतिथ्य (हॉस्पिटॅलिटी) हे अभ्यासक्रमही राबविण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा संस्कृत विद्यापीठातून पदवी मिळविण्याकडे कल वाढू लागला आहे.

भारतीय साहित्यातील श्रेष्ठ रचनाकार म्हणून ख्यात असलेले कवी कालिदास यांनी रामटेकच्या रामगिरी टेकड्यांवर ‘मेघदूत’ या संस्कृत खंडकाव्याची रचना केली. संस्कृतचा प्रचार-प्रसार देश-विदेशात व्हावा व संस्कृत साहित्याचा अभ्यास व्हावा, यासाठी रामटेकमध्ये कविकुलगरू कालिदास संस्कृत विश्‍वविद्यालयाची स्थापना करण्यात आली. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे महाराष्ट्रात स्वतंत्र संस्कृत विद्यापीठ असावे, असे स्वप्न होते. हे स्वप्न माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या प्रयत्नांनी व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले.

संस्कृत विद्वान डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय समितीने रामटेक येथेच संस्कृत विद्यापीठाची स्थापना व्हावी, असा अहवाल दिला. १८ सप्टेंबर १९९७ मध्ये रामटेकमध्ये संस्कृत विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. संस्थापक कुलगुरू म्हणून डॉ. पंकज चांदे यांनी विद्यापीठाला नावलौकिक मिळवून दिला. त्यानंतर डॉ. उमा वैद्य यांनी व आता प्रो. श्रीनिवास वरखेडी हे कुलगुरू आहेत. 

रामटेक येथे होणाऱ्या कालिदास महोत्सवात विद्यापीठाने ‘मेघदूत’ या खंडकाव्यावर आधारित नृत्यनाटिका सादर करून संस्कृत विषय लोकाभिमुख करण्यास सुरुवात केली. या वर्षीच्या कालिदास महोत्सवात ‘अभिज्ञान शाकुंतलम’ या संस्कृतमध्ये सादर झालेल्या नृत्यनाटिकेचा उल्लेख करावा लागेल.
 विद्यापीठांतर्गत ३६ महाविद्यालये संलग्न आहेत.

२०१८-२०१९ पासून प्राकशास्त्री, शास्त्री, आचार्य इ. अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. तर, वारंगा येथे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय ज्ञान केंद्राला मान्यता मिळाली आहे. त्याद्वारे संस्कृत भाषेतील प्राचीन, आधुनिक युगातील शास्त्राशी ज्ञानाचा मेळ घालून आंतरविद्याशाखीय संशोधनाचे कार्य करण्यात येणार आहे. संस्कृत शिकू इच्छिणाऱ्या तसेच आधुनिक विज्ञानासह योग, ज्योतिष, वास्तू, आतिथ्य तसेच स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासनात अधिकारी पदावर कार्य करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता बी.ए. सिव्हिल सर्व्हिसेस हा नवीन अभ्यासक्रम संस्कृत विश्‍वविद्यालयात उपलब्ध आहे. संस्कृत अध्ययन-अध्यापन-संशोधनाचे निरंतर कार्य विश्‍वविद्यालयात सुरू आहे. 

गोळवलकर गुरुजी प्रकल्प
गुरू-शिष्य परंपरेतील कर्तव्याची जाणीव ठेवून विश्‍वविद्यालयाने भावी पिढ्यांच्या ज्ञानपोषणाची जबाबदारी ओळखून गुरुकुल प्रकल्पाची उभारणी केली आहे. श्रवण, मनन, निदिध्यासन याद्वारे शिष्याने ज्ञान प्राप्त करायचे. परंतु, त्याचे उपयोजन व उपयोग कुटुंब, समाज, देश, राष्ट्र यांच्यासाठी करावा. पारंपरिक शास्त्राध्ययनाबरोबरच आत्मसंयमन, सामाजिक भानाची जाणीव करून देणे हे उद्देश यामागे आहे.

या गुरुकुलात प्राकशास्त्री (अकरावी, बारावी), शास्त्री (पदवी), सन्मानित शास्त्री (पदविका), आचार्य (एम.ए.), विशिष्टाचार्य (एम.फिल) व विद्यावारिधी (पीएच.डी) पर्यंत दर्शन, व्याकरण, साहित्य, ज्योतीष, योग या शास्त्रांमध्ये शिक्षण देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने विद्यापीठाला ‘ज्ञान संसाधन केंद्र’ (नॉलेज रिर्सोस सेंटर) म्हणून मान्यता दिली आहे.

गुरुकुल प्रकल्पाद्वारे विद्यापीठ ‘प्राचीन ज्ञानस्रोत केंद्र’ कार्यान्वित करण्याकडे अग्रेसर होत आहे. आगामी काळात विविध शाखीय संदर्भांचे, ज्ञानस्रोतांचे प्रामाणिक व विश्‍वासार्ह केंद्र म्हणून कविकुलगुरू कालिदास विश्‍वविद्यालय मार्गदर्शक ठरेल हे निश्‍चित.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News