विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 June 2019

येथील महाविद्यालयांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आजपासून प्रवेश अर्ज विक्री सुरू झाली आहे.

चाळीसगाव - येथील महाविद्यालयांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आजपासून प्रवेश अर्ज विक्री सुरू झाली आहे. अर्ज घेण्यासाठी विद्यार्थ्यांची आज गर्दी दिसून आली. विज्ञान शाखेत गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिला जाणार असला तरी बहुतांश विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेच्या प्रवेशाकडे असल्याचे दिसून येत आहे. 

शहरातील नानासाहेब य. ना. चव्हाण महाविद्यालयासह चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात दरवर्षी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी गर्दी होते. आजपासून या महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्जांचे वाटप सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी अर्ज घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. प्रथम वर्षाला प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थ्याला कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या ‘ऑनलाइन’ संकेतस्थळावर अर्ज भरणे आवश्‍यक आहे. हा अर्ज भरल्यानंतरच तो प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. याशिवाय बारावीचे गुणपत्रक, शाळा सोडण्याचा दाखल (एल. सी.), जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्डची झेरॉक्स प्रत व रॅगिंग अर्ज जोडून प्रवेश दिला जाणार आहे. 
 

विज्ञान शाखेसाठी गुणवत्ता यादी
प्रथम वर्ष विज्ञान (एफ. वाय. बीएस्सी) शाखेसाठी विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीनुसारच प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करताना अर्जासोबत बारावीच्या गुणपत्रकाची झेरॉक्स व जातीचा दाखला जोडून महाविद्यालयात २५ तारखेच्या आत संपर्क साधावा. त्यानंतर प्रथम गुणवत्ता यादी २७ तारखेला तर अंतिम यादी १ जुलैला महाविद्यालयांमध्ये लावण्यात येणार असल्याचे महाविद्यालयांच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासोबत वरील आवश्‍यक ते सर्व कागदपत्रे जोडून आपला प्रवेश निश्चित करावा. द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेशासाठी आपले प्रथम वर्षाचे गुणपत्रक जोडून प्रवेश घ्यावा, असे महाविद्यालयाने कळविले आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News