प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना लिहिता-वाचताही येईना!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 July 2019

गतवर्षी खानापूर तालुक्‍यातील ३० हून अधिक माध्यमिक शाळांचा निकाल ३० टक्‍क्‍यांहून कमी लागला. त्या शाळांवर कारवाईचा बडगा उचलताच मुख्याध्यापकांनी याचे खापर प्राथमिक शाळांवर फोडले.

खानापूर : प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील सामान्य माहिती तर सोडाच; पण, मातृभाषेतून लिहिता-वाचताही येत नसल्याची बाब चक्क डाएटच्या प्राचार्यांसमोरच उघड झाली. नुकतीच डाएटचे प्राचार्य एम. एम. सिंदूर आणि त्यांच्या सहकारी प्राध्यापकांनी खानापूर तालुक्‍यातील ५० शाळांची पाहणी केली. यादरम्यान तालुक्‍याचा शैक्षणिक दर्जा चव्हाट्यावर आला.

गतवर्षी खानापूर तालुक्‍यातील ३० हून अधिक माध्यमिक शाळांचा निकाल ३० टक्‍क्‍यांहून कमी लागला. त्या शाळांवर कारवाईचा बडगा उचलताच मुख्याध्यापकांनी याचे खापर प्राथमिक शाळांवर फोडले. त्याची खातरजमा करून घेण्यासाठी डाएटचे प्राचार्य एम. एम. सिंदूर यांनी २४ आणि २५ जुलै रोजी तालुक्‍यातील ५० मराठी-कन्नड शाळांची पाहणी केली. त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी थेट संवाद साधला. यादरम्यान त्यांच्यावरच कपाळाला हात लावण्याची वेळ आली. सुमारे ८० टक्के शाळांतील ९० टक्के विद्यार्थ्यांना साधे लिहिता-वाचताही येत नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली.

नंदगड येथील संत मेलगे आणि सरकारी कन्नड शाळेतील एकेका वर्गातील ३० पैकी २५ विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. अशीच स्थिती इतरही शाळांमध्ये असल्याचे श्री. सिंदूर यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे. काही ठिकाणी तर शिक्षकांनाच प्रश्नाची उत्तरे आली नाहीत. त्यामुळे शाळांची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांचा चांगलाच संताप झाला. बहुतांश शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. श्री. सिंदूर यांनी शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या सूचना शिक्षकांना केल्या आहेतच, शिवाय त्यांनी कारवाईचा इशाराही दिला आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News