योग प्रशिक्षण वर्गात शिक्षक बनले विद्यार्थी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 June 2019

येथील पंचायत समितीचा शिक्षण विभाग व पतंजली योग समितीतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन पूर्व प्रशिक्षण वर्ग आज पार पडला.

चाळीसगाव - येथील पंचायत समितीचा शिक्षण विभाग व पतंजली योग समितीतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन पूर्व प्रशिक्षण वर्ग आज पार पडला. या प्रशिक्षण वर्गात शिक्षक विद्यार्थी बनले होते. सहभागी शिक्षकांनी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून योगाचे प्रशिक्षण घेतले. 
शहरातील हिरापूर रोडवरील चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणावर शुक्रवारी (२१ जून) जागतिक योगदिन साजरा करण्याच्या उद्देशाने पूर्व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यात नगरदेवळा येथील प्रशिक्षित योग शिक्षक पुंडलीक कोळी यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून सुक्ष्म व्यायाम,  प्राणायाम व आसनांबाबत माहिती दिली.

योगाचे फायदे सांगून त्यांनी सहभागी शिक्षकांकडून योगाचे प्रात्यक्षिक करून घेतले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, शिक्षण विस्तार अधिकारी विलास भोई, केंद्र प्रमुख तथा योग शिक्षक दिलीप सावंत, योग शिक्षक शालीग्राम निकम व क्रीडा शिक्षक अजय देशमुख उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गात तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या क्रीडा शिक्षकांनी सहभाग नोंदवला. भय्यासाहेब वाघ यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी श्री. लांबट, कोमलसिंग जाधव, पप्पू नागवाणी, गणेश ठाकूर आदींचे सहकार्य लाभले. 

पाचोऱ्यात मार्गदर्शन 
पाचोरा येथील ‘पीटीसी’ संस्थेच्या गो. से. हायस्कूलमध्ये आयोजित एक दिवशीय योग प्रशिक्षण शिबिरात शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक सहभागी झाले होते. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विकास पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र महाजन, समाधान पाटील उपस्थित होते. शहर व परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना योग शिक्षक डी. डी. कुमावत यांनी प्रात्यक्षिकांसह योग प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाच्या आधारे सहभागी शिक्षक योग दिनी विद्यार्थ्यांकडून योगाचे प्रात्यक्षिक करून घेणार आहेत. यशस्वितेसाठी क्रीडा शिक्षक एन. आर. ठाकरे, महेश चिंचोले व शिक्षकांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापक एस. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी आभार मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News