शिष्यवृत्ती परीक्षांकडे विद्यार्थ्‍यांची पाठ

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Friday, 18 October 2019
  • २०१७ पासून यामध्ये सुधारणा करून पाचवी व आठवीच्या वर्गासाठी ही परीक्षा घेतली जात आहे. मात्र, हे दोन्ही वर्ग माध्यमिक शाळांना संलग्न असून, अनेक ठिकाणी मुख्याध्यापक व शिक्षकांना परीक्षेबाबत माहितीच नसल्याने दोन वर्षांत या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थी संख्येत निम्म्याने घट झाली आहे.

खामखेडा - शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व आठवीच्या वर्गांसाठी झाल्यापासून विद्यार्थ्यांनी या परीक्षांकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी राज्यात आठवीच्या वर्गातील फक्त १८ टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. विद्यार्थ्यांचा सहभाग कमी होत असल्याने या परीक्षेबाबत प्रबोधन करण्याचा निर्णय शिक्षण संचालकांनी घेतला असून, या वर्गांतील पटाच्या निम्म्या विद्यार्थ्यांना सक्तीने परीक्षेस बसवण्याचा निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हा व तालुकास्तरावर देण्यात आल्या आहेत.

राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची योजना राज्यात १९५४ पासून सुरू आहे. पूर्वी पूर्व माध्यमिक परीक्षा चौथीसाठी व माध्यमिक परीक्षा सातवीच्या वर्गासाठी घेतली जात होती. परंतु २०१७ पासून यामध्ये सुधारणा करून पाचवी व आठवीच्या वर्गासाठी ही परीक्षा घेतली जात आहे. मात्र, हे दोन्ही वर्ग माध्यमिक शाळांना संलग्न असून, अनेक ठिकाणी मुख्याध्यापक व शिक्षकांना परीक्षेबाबत माहितीच नसल्याने दोन वर्षांत या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थी संख्येत निम्म्याने घट झाली आहे.

यंदा ही परीक्षा १६ फेब्रुवारी २०२० ला होणार असून, १ ऑक्‍टोबरपासून परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यास सुरवात झाली आहे. राज्यातील पुणे, ठाणे, पालघर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, नगर, सोलापूर, लातूर, परभणी या जिल्ह्यांत जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून व मुंबई, उल्हासनगर, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निधीतून विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्याचा निर्णय झालेला असतानाही परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा सहभाग दिसत नव्हता. शिक्षण संचालकांतर्फे वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.

शिक्षण विभागातर्फे तालुकास्तरावर विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांची कार्यशाळा घेण्यासह परीक्षेसाठी विद्यार्थी संख्या वाढावी, यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. सर्वच शाळांना पन्नास टक्के विद्यार्थी प्रवेशित करण्याची सूचना देण्यात आली आहे.
-सुनीता धनगर, गटशिक्षणाधिकारी, देवळा

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News