महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषद निवडणुकीची लगबग सुरू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 July 2019
  • महाविद्यालयांत २७ वर्षांनंतर निवडणूक; विद्यार्थी, प्राध्यापकांमध्ये उत्सुकता

इचलकरंजी - येथील सर्व वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी परिषद निवडणुकीची लगबग सध्या सुरू आहे. महाविद्यालयांत २७ वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीची उत्सुकता विद्यार्थी, प्राध्यापकांमध्ये दिसून येत आहे. यंदा शहरातील सर्व महाविद्यालयांतील सुमारे ७५०० हून अधिक विद्यार्थी या निवडणुकीत मतदानाची प्रत्यक्ष भूमिका पार पाडणार आहेत. 

नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची ओळखपत्रे तयार करणे, एकूण प्रवेश मर्यादा स्थिर करणे अशा कामांना महाविद्यालयांनी गती दिली आहे. या निवडणुकांची पूर्ण जबाबदारी प्राचार्य व संबंधित प्रशासनावर असल्याने निवडणुकीची पूर्वतयारी चांगल्या प्रकारे सुरू असल्याचे दिसून येत आहे.

प्दीर्घ कालावधीनंतर कॉलेज कॅम्पसमध्ये सार्वत्रिक मतदानाद्वारे निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. या निवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेपास मनाई केली आहे. निवडणुका निर्विघ्नपणे होण्याची प्रमुख जबाबदारी प्राचार्य आणि संबंधितांवर सोपवली आहे. त्यामुळे कॉलेज प्रशासनामध्ये थोडेफार चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. चालू शैक्षणिक वर्षात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या स्थिर करणे हा सर्व महाविद्यालयांपुढे चिंतेचा प्रश्‍न आहे. विद्यार्थ्यांचे ओळखपत्रही प्रत्यक्ष मतदानावेळी बंधनकारक आहे. त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तयार करण्याचे काम लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी कॉलेज प्रशासनावर असणार आहे. त्यामुळे एकूणच निवडणुकीची पूर्वतयारी शहरातील सर्व महाविद्यालयांत जोमाने सुरू आहे.

प्रदीर्घ कालावधीनंतर होणाऱ्या या निवडणुकीची जागृकता व भान विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याची जबाबदारी सध्या महाविद्यालयांची आहे. विद्यार्थी परिषद निवडणुका काय आहेत, निवडणुकीसाठी नियमावली, आचारसंहिता याची तंतोतंत माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी कॉलेज प्रशासनाकडून कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यापीठ कायद्यानुसार या निवडणुका राजकीय पक्षांचा हस्तक्षेप टाळून खेळीमेळीत व सकारात्मक व्हाव्यात यासाठी सर्व महाविद्यालयांचे जोरदार प्रयत्न असणार आहेत. 

निवडणुकीसाठी लागणाऱ्या संबंधित बाबींची पूर्तता लवकरच केली जाईल. कॉलेज निवडणुकांबाबत विद्यार्थ्यांची निर्माण झालेली संभ्रमावस्था कार्यशाळेच्या माध्यमातून दूर करून या विषयी जागरुकता निर्माण करण्याचे काम चालू आहे.
-अनिल पाटील, 
प्राचार्य, कन्या महाविद्यालय, इचलकरंजी 

 

शहरातील महाविद्यालय     विद्यार्थी संख्या
  डीकेएएससी कॉलेज              ३१००
  व्यंकटेश महाविद्यालय        १८००
  कन्या महाविद्यालय           १०००
  जयवंत महाविद्यालय          ८३०
  नाईट कॉलेज                       ७००

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News