हिंगोलीत दगडफेकीने तणाव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 12 August 2019
  • सोमवारी (ता.१२) दगडफेकीच्या घटना घडल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते
  • 50 पेक्षा अधिक वाहनांचे नुकसान 
     

हिंगोली: शहरांमध्ये सोमवारी (ता.१२) दगडफेकीच्या घटना घडल्याने वातावरण तणावपूर्ण झाले असून सुमारे 50 पेक्षा अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. पोलीस प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. 

हिंगोली शहरांमध्ये नांदेड नाका भागामध्ये आज नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. दोन्ही गट समोरासमोर आल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला. त्यामुळे एकच गोंधळ उडाल्याने अवघ्या काही वेळातच बाजारपेठ बंद झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांवरही दगडफेक झाल्याचा प्रकार घडला आहे. 

नांदेड औंढा मार्गावरील वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याने सुमारे 50 पेक्षा अधिक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. कार व इतर वाहनांमधून विटकरींचा खच पडला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे पोलीस उपअधीक्षक सुधाकर रेड्डी, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

शहरांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनातर्फे शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिस विभागातर्फे करण्यात आली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News