पूरग्रस्तांसाठी राज्याला हवी ६,८०० कोटींची मदत

सकाळ (यिनबझ)
Wednesday, 14 August 2019
 • पूरग्रस्तांसाठी केंद्राला साकडे;
 • वेळेत नुकसानभरपाई मिळणार
 • महापूर सोसला; आता नुकसान कळा !
 • रोगराई रोखण्यासाठी शासकीय योजना

मुंबई : राज्याच्या विविध भागांत आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकार केंद्र सरकारकडे ६,८०० कोटींच्या मदतीची मागणी करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की २००५ च्या घटनेशी तुलना केली तर यंदा थोड्याच काळात अभूतपूर्व पाऊस पडला आहे. प्राथमिक अंदाजानुसार केंद्र सरकारला पहिल्या टप्प्यातील मदतीचे निवेदन पाठवण्यात येणार आहे. कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी २,१०५ कोटी आणि कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांसाठी ४,७०० कोटींची मागणी केंद्राकडे करणार आहोत, एकंदर ६,८०० कोटींची मागणी केंद्र सरकारकडे करणार आहोत.

महापुरात मोठ्या प्रमाणात जनावरे मरण पावली आहेत. पोलिस पाटील किंवा सरपंच यांनी जनावरांच्या नुकसानीबद्दल सांगितलेली माहिती ग्राह्य धरून तशी नागरिक, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल. विशिष्ट मर्यादित वेळेत पूरग्रस्त भागांची पुनर्बांधणी करण्यात येईल.

मंत्रिमंडळमधील काही मंत्री वेळोवेळी तिथे उपस्थित असतील. त्यासाठी एक विशेष तज्ज्ञ समिती तयार करण्यात येईल, वातावरणातील बदल वगैरे यांचा अभ्यास समितीत केला जाईल, तसेच या अनुषंगाने काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याबाबतही समिती शिफारस करेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले.

कोल्हापूर हळूहळू पूर्वपदावर
कोल्हापूर : शहरासह जिल्ह्याला पडलेला पुराचा विळखा हळूहळू सैल होतानाच जनजीवनही पूर्वपदावर येत आहे. शिरोळ तालुक्‍याला मात्र पुराचा वेढा कायम असून, आज या परिसरात रस्ते सुरू झाल्याने हवाईमार्गे सुरू असलेली मदत बंद करण्यात आली.

महापूर सोसला; आता नुकसान कळा !

सांगली : महापूर ओसरू लागल्यानंतर कृष्णाकाठी पूरग्रस्तांच्या नुकसानीच्या कळांनी पुन्हा एकदा धाकधूक सुरू झाली आहे. पूर सोसला, आता नुकसानीच्या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठीची मानसिकता पूरग्रस्त करीत आहेत. सांगलीसह जिल्हाभरात शासकीय मदतीचे वाटप सुरू झालेले आहे.

येथील आयर्विन पुलापाशी आज पाणीपातळी ४४ फुटांवर म्हणजे धोक्‍याच्या पातळीखाली आहे. शहरातील पूर्ण पाणी नदीपात्रात जाण्यासाठी आणखी एखादा दिवस जाणार आहे. दरम्यान, वीजपुरवठा सुरू करताना दूधगाव (ता. मिरज) येथील एक वायरमनचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. पुरात हॉटेल बुडाल्याने त्याच्या चालकाने आत्महत्या केली. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल महापालिकेच्या एका कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यावरील महापुराचे संकट हटले आहे. शहर तसेच जिल्हाभरात आरोग्याची साथ पसरू नये, यासाठी स्वच्छता मोहीम महापालिका व ग्रामपंचायतींतर्फे सुरू करण्यात आली आहे. शहरात पाणी उतरू लागल्यानंतर घरांसह दुकानगाळ्यांची स्वच्छता सुरू झाली आहे. महापालिकेचे ८०० कर्मचाऱ्यांचा राबता सुरू झाला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, आधुनिक स्वच्छता यंत्रांकडून काम युद्धपातळीवर सुरू झालेले आहे. 
 

कोल्हापूर ही अमित शहांची सासुरवाडी आहे. त्यामुळे त्यांनी थोडी जास्त मदत करावी; फक्त हवाई पाहणीच करू नये.

- बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
 

सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करत चार हजार कोटींची रक्कम पहिल्या टप्प्यात द्यावी. जून २०१९ पर्यंत शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करावे. 

- धनंजय मुंडे, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

केंद्राकडे राज्याची निधीची मागणी
अशी असेल मदत (आकडे कोटी रुपयांत)

सातारा, सांगली कोल्हापूर जिल्ह्यांतील आपदग्रस्तांच्या कुटुंबीयांसाठी ३००
मदतकार्यासाठी २५
तात्पुरत्या निवारा केंद्रांतील नागरिकांसाठी २७
स्वच्छतेसाठी ७०
पीक नुकसानीपोटी २०८८
जनावरांच्या जीवितहानीपोटी ३०
मत्स्यव्यवसायिकांसाठी ११ 
घरे दुरुस्तीसाठी २२२
रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी ८७६
सिंचन आणि जलसंपदा विभागाच्या कामांसाठी १६८
आरोग्यविषयक उपक्रमांसाठी ७५
शाळा आणि पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी १२५
छोट्या व्यावसायिकांच्या नुकसानीपोटी ३०० 

(कोकण, नाशिक आणि इतर जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागांतही याच पद्धतीने २१०५.६७ कोटींची मदत प्रस्तावित करण्यात आली आहे.)

देणारे हात हजारो

 • ‘राष्ट्रवादी काँग्रेस’कडून पूरग्रस्तांना ५० लाख
 • मुख्यमंत्री, मंत्र्यांचा महिनाभराचा पगार पूरग्रस्तांना
 • पिंपरीतील वडेवालाही देणार एक दिवसाची कमाई
 • जे. जे. रुग्णालयाकडून पूरग्रस्तांसाठी औषधे
 • मुंबईतील डबेवालेही मदतीसाठी सरसावले
 • भाजपकडून पूरग्रस्त सहाय्यता समिती स्थापन
 • जालना जिल्हा परिषद पूरग्रस्तांना एक कोटींचा निधी देणार
 • पुरातील मृतांच्या नातेवाइकांना चार लाखांची भरपाई
 • प्रताप सरनाईकांनी पूरग्रस्त मजरेवाडी गाव घेतले दत्तक
 • अमिताभ बच्चनही पूरग्रस्तांना मदत करणार
 • तुळजाभवानी देवस्थानही ५० लाख रुपये देणार

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News