संस्कार संवर्धन करणारा श्रावण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 4 August 2019
  • श्रावण म्हटले, की लगेच आल्हाददायक वाटते. मांगल्य, पावित्र्य, भक्तिभाव यांनी युक्त महिना म्हणजे श्रावण. निसर्ग हिरवा, पिवळा, लाल अशा अनेक रंगांत प्रकटलेला असतो.

श्रावण म्हटले, की लगेच आल्हाददायक वाटते. मांगल्य, पावित्र्य, भक्तिभाव यांनी युक्त महिना म्हणजे श्रावण. निसर्ग हिरवा, पिवळा, लाल अशा अनेक रंगांत प्रकटलेला असतो. निसर्गात अनेक सुवासांची उधळण असते. पावसाचे स्वरूप बाल्यावस्थेतील अवखळ बालिकेसारखे न राहता आयुष्यात स्थिरावलेल्या पुरंध्रीसारखे रिमझिम असते.

श्रावण म्हणजे वाण-वशांचा, सणावारांचा, पूजा-अर्चांचा, धार्मिकतेचा महिना. घरोघरी निरनिराळ्या पूजा, वाणवसे चालू असतात. श्रावणी सोमवारी नवविवाहिता शंकरास शिवामूठ वाहतात. सासरच्या घरी प्रेमाच्या आणि मानाच्या स्थानाची शंकराकडे मागणी करतात. श्रावणातल्या चार मंगळवारी नवविवाहिता मंगळागौरीची पूजा करतात. देवीकडे अखंड सौभाग्याची मागणी करतात. नटून-सजून शालू सावरत पूजेला निघालेल्या सुवासिनी हे दृश्‍य खरोखरच श्रावणाचे वैभव आहे. श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमी. या दिवशी नागाची पूजा केली जाते. श्रावण वद्यअष्टमी म्हणजे श्री कृष्ण जन्म. या दिवशी गोकुळाची पूजा होते. दुसऱ्या दिवशी दहीहंडी असते. ही दहीहंडी सर्वत्र फार उत्साहात आणि जल्लोषात पार पडते. महिनाभर सत्यनारायणाची पूजा होत असते. 

समाजाच्या निरोगी मानसिकतेसाठी संस्कारांचे जतन आणि संवर्धन यांची अतिशय आवश्‍यकता आहे. श्रावणातील व्रतवैकल्ये सण-वार, पूजा या सर्वांत प्रामुख्याने धार्मिक भावनेसच प्राधान्य आहे. ही धार्मिक भावना समाजावर सुसंस्कार घडविते. श्रावणातील प्रत्येक व्रताची सांगता ही कहाणीवाचनाने होते. या कहाण्यांचे वाचन महिला बऱ्याच ठिकाणी सामुदायिकरीत्या करतात. कहाण्यांनी समाजावर चांगले संस्कार करण्यात फार मोठा वाटा उचलला आहे. या कहाण्यांत सदाचरण, त्याग, धार्मिक वृत्ती यावर भर दिलेला दिसतो. अनेक कहाण्यांत अतिथी सत्कारास फार महत्त्व दिले आहे. अशा प्रकारे श्रावण सणावारांनी सजलेला, संस्कारांचे संवर्धन करणारा महिना आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News