राज्य सरकारचे पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 June 2019
  • वाढत्या मुंबईची गरज भागविण्याचे नियोजन 
  • पायाभुत सुविधांच्या विकासाकरीता राबविण्यात येत असलेल्या अन्य प्रकल्पांची देखील मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला माहिती दिली​

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या आणि त्या तुलनेत तयार होणारे वाहतुक व पायाभूत सुविधांचे प्रश्न लक्षात घेता भविष्याच्या दृष्टीने सर्व आवश्‍यक तरतुद करण्यात आली असल्याची माहिती मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधीमंडळ अधिवेशनादरम्यान दिली. 

मुंबई शहर आणि महानगर प्रदेश क्षेत्राच्या विकासाच्या योजना सरकार गतीने राबवित आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले, जून २०१४ मध्ये केवळ ११.४० कि.मी.ची मेट्रोसेवा सुरू झाली होती. गेल्या तीन वर्षात २२० कि.मी. लांबीचे एकूण १ लाख १ हजारहून अधिक रकमेच्या मेट्रो मार्गाला मंजुरी देण्यात आली असून बहुतांश मेट्रोसेवा २०२० ते २०२२ या कालावधीत कार्यान्वित होतील. विशेषत: कुलाबा ते सीप्झ या ३३.५० कि.मी. लांबीच्या महत्त्वपूर्ण अशा मेट्रो मार्गाचे ४० टक्के काम पूर्ण झाले असून या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे काम २०२१ मध्ये तर दुसऱ्या टप्प्याचे काम जून २०२२ मध्ये पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिली.

यासोबतच मुंबई महानगर प्रदेशातल्या पायाभुत सुविधांच्या विकासाकरीता राबविण्यात येत असलेल्या अन्य प्रकल्पांची देखील मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला माहिती दिली. वसई- भाईंदर जोडणारा खाडीपूल (सी-लिंक) आणि ट्रान्सहार्बर लिंक यामुळे मुंबई शहराशी उपनगरे आणि नवी मुंबई जोडले जाऊन प्रवासाचे अंतर आणि वेळ कमी होणार आहे. वसई-भाईंदर जोडणाऱ्या खाडीपुलाच्या बांधकामासंदर्भातील सर्व परवानग्या मिळाल्या असून १ हजार ८१ कोटी रुपयांच्या निविदा निघाल्या आहेत. २२ किमीच्या ट्रान्सहार्बर लिंकने मुंबई व नवी मुंबई जोडण्यात येणार आहे.

मेट्रो ३ व ट्रान्सहार्बर लिंकसाठी मिळून ४१ हजार कोटींचे दीर्घ कालावधीचे कर्ज जपानच्या ‘जायका’ या संस्थेकडून अत्यल्प व्याज दराने मिळाले आहे. विरार- अलिबाग बहुद्देशीय कॉरिडॉर जागतिक बॅंकेच्या मदतीने विरार-अलिबाग हा १२३ कि.मी. चा बहुउद्देशीय कॉरिडॉर विकसित करण्यात येणार आहे.  पुढच्या २० ते २५ वर्षांची महाराष्ट्राची वाढ ही मुंबई प्रदेशाच्या विकासामुळे होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग ३, ४, ४ब, ८, १७, मुंबई पुणे एक्‍सप्रेस वे, भिवंडी बायपास यांना जोडणार. या कॉरिडॉरमध्ये विरार, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल, उरण आणि तळोजा येथे ७ विकास केंद्र तयार होणार आहेत. नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी बंदर यांनाही हा कॉरिडॉर जोडणार आहे. जेएनपीटीकडे नवी मुंबई व ठाण्यातून जाणारी वाहतूक बाहेरुन जाणार आहे.

पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन
मुंबई शहर आणि महानगर प्रदेश क्षेत्रासाठी पुढील काळाचे पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेशासाठी सूर्या पाणीपुरवठा योजनेतून ४०३ एमएलडी पाणी दररोज पुरवण्याचे काम होणार आहे. एमएमआरडीए काळू धरणासाठी ४०३ कोटी रुपये सिंचन विभागाला देणार आहे. मुंबईसाठीची २०६० पर्यंतची पिण्याची पाण्याची सोय करतो आहोत. दमणगंगा-पिंजाळ नदीजोडच्या माध्यमातून मोठी सोय होणार असून त्याचाही डीपीआर करण्यात येत आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News